Tuesday, November 10, 2015

लालू रिलोडेड

आठ नोव्हेंबरची सकाळ.
आज बिहारचा निकाल आहे. देशाचं लक्ष पाटण्याकडे आहे.
लालू सकाळी सातच्या सुमारास घराच्या गेटपाशी येतात. 
"गुड मोर्निंग. वुई आर विनिंग." असा बाईट देतात आणि आत जातात. 
---

मग निकाल सुरूवातीला विरोधात जायला लागतात. वाचाळ लालू तोंडावर आपटणार असं वाटायला लागतं. कारण नितीश दोन दिवस तोंड शिवून गप्प आहेत आणि लालूंचे इमले 190 पर्यंत वर चढलेत.

दीड तासांत फासे उलटतात, आकडे फिरतात. लालू-नितीश विजयाच्या पल्याड जाऊन पोहोचतात. सर्क्युलर रोडच्या लालूंच्या घराबाहेर गाणीबजावणी, घोषणा सुरू होतात. लालू आत गप्प आहेत. त्यांचा सगळा परिवार आतल्या अंगणात मजेत गप्पा मारतोय. खूष आहेत. लालू मात्र कुठेच नाहीत.

विजय निश्चित होतो. शेजारीच राहणारे नितीश अगोदर घराबाहेर येतात. पण त्यांना जाणीव आहे की आज पहिल्यांदा बोलायचा अधिकार आपला नाही. ते पलिकडे लालूंकडे येतात. गळाभेट होते. पत्रकारांना दोघे सामोरे जातात. विजयाचं पहिलं वाक्य लालू उच्चारतात. नितीश फार काही बोलत नाहीत. लालू त्यांना सोडायला हात धरून गाडीपाशी येतात.

नितीश गेल्यावर लालूंच्या घराचं भलमोठं गेट उघडतं. आणि बाहेरचे शेकडो कार्यकर्ते आत शिरतात. ढोलवाले, घोषणावाले, झेंडावाले, बायका, पोरं, म्हातारे, पांढ-या शुभ्र कपड्यांचे, फाटक्या कपड्यांचे, गुच्छवाले, दारू पिऊन आलेले, अगणित जातींचे सारे एकच आत शिरतात. कोणालाही अडवायचं नाही. दोन पाय-या चढून गैलरी आहे. लालू तिथं जाऊन उभे राहतात आणि एखाद्या नवराज्याभिषेक झालेल्या राजासारखे अभिनंदन स्विकारायला लागतात. जे होतं ते खास लालू स्टाईलमध्ये. लोक पाया पडतात, हार घालतात, फोटो काढतात, लालू एक हात हवेत फिरवत त्यांना पुढे सारत राहतात. आणि हे चालूच राहतं. लालू थकत नाहीत. त्यांना ते आवडतं. ते असं सतत पाच तास करत राहतात.

मग पुन्हा घरासमोरच्या अंगणात फिरायला लागतात. गर्दी तशीच असते. लोकांना हटकत राहतात. अंधार होतो. लोकांची वर्दळ काही थांबत नाही. हळूहळू त्यात लालू एकटे पडतात. एक खुर्ची मागवून एकटेच बसून राहतात.

मध्यरात्री कधीतरी दिवस संपून जातो.
---


दुसरा दिवस उजाडतो आणि पुन्हा लालूंचा दरबार सुरू होतो. लालू तयार होऊन, आवरून घरासमोरच्या अंगणात येऊन बसतात. भेटायला येणा-यांची रीघ लागते. आज कोणकोण बिहारच्या लांबवरच्या भागातूनही आलेत. जे काल पहिल्या दिवशी पोहोचू शकले नाहीत. लालू बोलत कुणाशीच नाहीत. धड एक संपूर्ण वाक्यही बोलत नाहीत. फक्त हुंकार भरत राहतात. लोक पाया पडत राहतात, हार पायाशी ठेवत राहतात, काही लोक गुच्छ, मिठाई घेऊन येतात.

मध्येच जाऊन पाटण्यातल्या 'मौर्य' फाईव्ह स्टार हाँटेलात पत्रकार परिषद करून येतात. घरी आल्यावर परत दरबार सुरू. खुर्चीवर एक पाय वर घेऊन पान चघळत लालू लोकांना भेटत राहतात. मध्येच पान संपलं की नवं मागवून तोबरा भरतात. देशभरातून आलेले पत्रकार लालूंना मुलाखतीची विनंती करत राहतात. पण लालू हुंकारानं त्यांनाही नकार  देत राहतात. दिल्लीतल्या एक प्रसिद्ध पत्रकार ज्या सकाळपासून लालूंची मुलाखतीसाठी पाठ सोडत नाहीयेत, त्या परत परत आळवत राहतात.लालू शब्दही उच्चारत नाहीत. त्या शेवटी किमान एका सेल्फ़ीसाठी लालूंना विचारतात. लालू तोंडातलं पान सावरत कसबसं हसत पोज देतात. सेल्फ़ी होतो आणि लालू परत गर्दीतल्या शून्यात बघत राहतात. 

आता कोणीतरी उत्साही कार्यकर्ता मणभर मिठाई घेऊन येतो. गणपतीला वाहावी तशी वाहतो. लालू मिठाईला फक्त हात लावून स्वीकार करतात आणि मण हलवला जातो. लालूच्या खुर्चीमागे एव्हाना हार, मिठाई, पुष्पगुच्छ यांचा डोंगरभर ढीग तयार झालेला असतो.

थोड़ा वेळ गर्दी तशीच सोडून ते आत घरात निघून जातात. वामकुक्षी घेण्यासाठी. लोक तसेच बसून राहतात. त्यात शत्रुघ्न सिन्हा भेटायला आल्यानं लालूंची झोप चाळवते. सिन्हा गेल्यावर दरबार पुन्हा सुरू.या दरबारात आता अनेक शासकीय अधिकारी असतात. दोन तपांनंतर त्यांची आता लालूंशी गाठ पडणार असते. त्यांना माहिती आहे इकडेही एक सीएम राहणार आहे. त्यांना मुजरा करावा.बाहेरगांवचे कार्यकर्ते त्यांच्या भागातले रिपोर्टस् देत राहतात. अंधार होतो तरी लालूंचा दरबार आटत नाही.
---

लालू एखाद्या राजासारखे सत्ता हाकायला सुरू झालेत. पण ब-याच काळ जंगलाबाहेर राहिल्यावर आणि मग परतल्यावर सिंहाला ते जंगल जसं एकाच वेळेस ओळखीचं आणि अनोळखीही वाटत असेल, तसं लालूंचं झालंय. परत फिरून आलेल्या सत्तेचा ते रवंथ करत राहतात. तिचा जुना वास, चव या गर्दीत आठवत, शोधत राहतात. एकेकाळी बिहारवर त्यांचं बेबंद राज्य होतं. त्यानंतर दूर सारले गेले. आज सत्ता पुन्हा दाराशी आली. तिच्याशी नवी ओळख शोधत ती चघळत अंधारात बसून राहतात.

त्यांच्याकडे असं पाहत राहणं आपल्यालाच काहीतरी विचारत राहतं.
हे सर्व कुठून येतं?  
---

Sunday, October 19, 2014

बदललेल्या अर्थव्यवहारांची राजकीय कसोटी

ज्या दिवशी मतदान झालं, १५ तारखेला, त्या दिवशी हे लिहिलं होतं. आकड्यांची भाकितं सगळ्यांनी केली.पण येऊ शकणा-या आकड्यांमागे काय प्रक्रिया असेल त्याबद्दल लिहिलं होतं. काही मित्रांना तेव्हाच पाठवलं होतं. ते आज निकाल आल्यावर पोस्ट करतो आहे.
---------------------------------------------------------------------------------

सगळे ओपिनियन पोल्स आले आहेत आणि प्रत्येकानं आपापली गणितं मांडली आहे.  प्रत्येकाच्या विश्लेषणाला निरिक्षणांचा, तर्कांचा आधार आहे. उद्या निवडणूक झाल्यावर आणि निकाल आल्यावर तर बोलूच, पण आता काही निरिक्षणं नोंदवून ठेवतो.  

आतापर्यंतची सगळी चर्चा, मतं, आडाखे हे राजकीय आहेत. पण निवडणूक ही सर्वस्वी राजकीय प्रक्रिया असते का? किंबहुना ती दुय्यम राजकीय घटना असते आणि प्रामुख्याने दीर्घ ,चालू अशा आर्थिक प्रक्रियेचा एक टप्पा असते. या मतानुसार महाराष्ट्रातल्या निवडणूकीचे काय होईल? 

ही निवडणूक भावनिक मुद्द्यांकडे ढकलली गेली आहे. ढकलली यासाठी म्हटलं, की ती तशी होणं अपेक्षित नव्हतं आणि नाही. मराठी-अमराठी , महाराष्ट्रवादी-गुजरातवादी, मुंबई-विदर्भ तोडणारे-अखंड महाराष्ट्रवाले , अफ़झलखानाच्या फ़ौजेतले-शिवाजींच्या सैन्यातले. हे मुद्दे नवे निश्चितच नव्हेत. किंबहुना हे तेच जुने भावनिक मुद्दे आहेत जे प्रत्येक पक्षाने यापूर्वी महाराष्ट्रात कधी जातींच्या, कधी धर्माच्या, कधी प्रांताच्या तांब्यात घालून नाण्यासारखे वाजवले आणि नाणं त्या त्या वेळेस खणखणीत वाजलं. प्रश्न हा आहे की ती नाणी आजच्या काळाची करन्सी आहे किंवा नाही !  

भावनेच्या मुद्द्यांवर मतदान करणारा महाराष्ट्र उरला आहे का ? ती पिढी आता शिल्लक आहे का?  जर तो उरला आहे असं म्हटलं तर घडणा-या आर्थिक प्रक्रियेच्या विरोधातलं ते विधान होईल. 1991 नंतरच्या आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेचे प्रत्यक्ष डोळ्यांना सर्वप्रथम ज्या प्रदेशांत दिसले त्यापैकी महाराष्ट्र एक होता. मग आय टी इंडस्ट्री, सर्व्हिस इंडस्ट्री, आधुनिक शेती हे सगळे प्रकार आले. परदेशी गुंतवणूक वाढत गेली, फ़ाईव्ह स्टार एम आय डी सी आल्या. कपडे बदलले, आर्किटेक्चर बदललं, गाड्या बदलल्या, शाळा बदलल्या आणि इंटरनैशनल स्कूल्स आली, मोबाईल्स बदलले. सगळे आर्थिक व्यवहार बदलले आणि भावना या अर्थव्यवहावरच आधारलेल्या असल्याने भावनाही बदलल्या. या पंधरा ते वीस वर्षांच्या झपाट्याच्या आर्थिक प्रक्रियेत ५५ टक्के महाराष्ट्र हा नागरी, शहरी बनला आणि जुने आर्थिक हितसंबध मोडून नवे, ग्लोबल हितसंबंध आले. अमर्त्य सेन म्हणतात तशा नव्या अर्थव्यवस्थेत  नव्या 'संधी' येतात आणि त्या अगदी निम्न मध्यमवर्गापर्यंत ओघळत आल्या. 

राजकारण, मग ते स्थानिक असो वा राष्ट्रीय, हे त्या त्या काळातल्या आर्थिक हितसंबंधांनाच जपणारं असलं , तर ते टिकतं. त्याचा चेहरा भावनेनं कळवळणारा वा खुललेला असतो, पण आत मात्र कालानुरूप आर्थिक हितसंबंध जपणाराच मेंदू असतो. म्हणून आर्थिक प्रक्रियेच्या एका टप्प्यात जमीनदारांची राजकीय सद्दी असते, एका टप्प्यात साखर कारखानदारांची, एका टप्प्यात इंडस्ट्रिआलिस्टची आणि सध्याच्या टप्प्यात बिल्डर्सची. बाळासाहेबांचं असो वा नव्वदीच्या दशकातलं भाजपाचं राजकारण, ही जुन्या अर्थव्यवस्थेतल्या हितसंबंधांचं होतं, जिथं संधींचं समान वाटप नव्हतं.  पण आता प्रक्रिया बदलली, हितसंबंध बदलले आणि त्यानुसार भावना बदलल्या. मग जुने भावनिक मुद्दे जिवंत राहिले तरी मतं मिळतील का? त्याला उत्तर नाही असं आहे.

ते तसं असतं तर भाजपाचा राम मंदिराचा मुद्दा मागे पडला नसता. बाबरी पडण्याइतकीच अतिगंभीर आणि सेन्सिटिव्ह घटना त्या प्रकरणाचा तीन वर्षांपूर्वी आलेला निकाल होता. तेव्हाही दंगली होतील या भितीनं देशभरच्या रस्त्यांवर पोलिस होते, निमलष्करी दलं होती, काही ठिकाणी आर्मीही होती. पण निकाल आला आणि देशभरातल्या एकाही गल्लीत खुट्टही वाजलं नाही. जणू काही घडलंच नाही, कोणाला काही देणघेणंच नाही, जणू हा तो देशच नव्हे ज्यानं या घटनेमुळे पुन्हा एकदा फ़ाळणीची स्थिती अनुभवली होती. असं का झालं? धर्म तेच होते, धर्मभावना त्याच होत्या, धार्मिक व्यवहारही तेच होते. मग बदललं काय होतं? बदलले होते आर्थिक व्यवहार आणि त्यामुळे बदलले होते भावनांचे व्यवहार. उदारीकरणाच्या आर्थिक प्रक्रियेतून तयार झालेल्या आपल्या नव्या पिढीच्या आर्थिक हितसंबंधांना ती जुनी भावना सुसंगत नव्हती, परवडणारी नव्हती. सो, शी डाईड.

हेच राज ठाकरेंच्या मागच्या पाच वर्षांतल्या आंदोलनांच्या बाबततीत म्हणता येईल. मुद्दे आर्थिक होते, चेहरा भावनिक होता. स्थलांतर, विस्थापन, नोक-या, स्वस्त लेबर हे नव्या आर्थिक प्रक्रियेचेच परिणाम, पण त्यांच्यावर उत्तर शोधतांना आतले आणि बाहेरचे या द्वेषभावनेचं औषध. हा भावनिक उमाळा तात्पुरते राजकीय यश देऊन गेला, पण कायमस्वरूपी उत्तर हे आर्थिक व्यवहारांमध्येच दडले असल्याने लवकरच ओसरला. त्यानंतर राज चुकीची राजकीय पावलं टाकताहेत असं नाही, तर त्यांचं राजकीय अस्तित्व ज्या आर्थिक मुद्द्यांवर आधारलेलं आहे, त्यांच्यासाठी ते भावनांची उत्तरं शोधताहेत. जी मिळणं शक्य नाही. हीच चूक बाळासाहेबांनी केली होती. शिवसेना विस्तारली, तिचं अस्तित्व टिकलं, पण ती सत्ताकारणात कधीच स्थिर राहिली नाही. भावनेच्या आधारानं अस्तित्व राहतं, नेतृत्व नाही. ती चूक कॉंग्रेसनं नाही केली. यशवंतरावांनी आणि नंतर शरद पवारांनी अगोदर सहकारी चळवळीतून एक आर्थिक घडी बसवली आणि मग त्यावर राजकारण उभं केलं. त्यांनी केलेलं भावनेचं (जातीच!) राजकारण हे या भक्कम आर्थिक व्यवहारांवर उभं होतं, म्हणून कायम मतपेटीत विजयी झालं, सत्तेत राहिलं. आणि आता जेव्हा बदलल्या आर्थिक प्रक्रियेत जेव्हा सहकारी चळवळी असुसंगत होताहेत, तेव्हा पवारांच्या (कॉंग्रेसी आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्रातल्या) राजकारणालाही उतार लागला आहे.

मोदींचा उदय हा या बदललेल्या आर्थिक प्रक्रियेच्या अनुषंगाने पाहिला पाहिजे, ना की त्यांनी कसे भाजपातल्या वृद्धांना हटवले, कसे संघाला सोबत घेतले, हार्डलाईनरची इमेज तयार केली वगैरे वगैरे. मोदींचा उदय हा या आर्थिक प्रक्रिय़ेचा टप्पा आहे. नव्या अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या प्रत्येक वर्गाच्या नव्या हितसंबंधांना जपणारं नेतृत्व ही या टप्प्याची गरज होती, ती गरज मोदींमध्ये पूर्ण झाली. आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरु करून सुद्धा नवनव्या कायद्यांमधून, लायसन्सेस मधून समाजवादी अर्थव्यवस्थेची आठवण करून देणारे मनमोहन सिंग नको झाले होते. भ्रष्टाचाराविरोधातल्या भावनेचा उल्लेख लोकसभा निकालाबाबत सगळे करतात, पण आर्थिक हितसंबंध जपले जातात तेव्हा भ्रष्टाचारही मान्य व्यवहार होतो. म्हणून कोर्परेटस, बिल्डर्स, नोकरदार, शेतकरी हे सगळे वर्ग मोदींच्या बाजूने उभे राहिले. जोपर्यंत हे हितसंबंध जपले जातहेत वा ते जपले जातील असा विश्वास जोपर्यंत लोकांच्या मनात आहे,  तोपर्यंत ती 'मोदी लाट' जिवंत राहिल. जेव्हा मोदी या हितसंबंधांच्या आड येतील, तेव्हा बाजूला सारले जातील.  

बहुमतातल्या सरकारची गरज हीही आर्थिकच असते. भारतीय आर्थिक उदारीकरणाने जोपर्यंत स्पष्ट आकार घेतला नव्हता तोपर्यंत आपल्याकडे आघाड्यांचीच सरकारं होती. कारण कोणत्याच वर्गाचं आर्थिक उद्दिष्ट नेमकं नव्हतं. आपली इंडस्ट्री कोणत्या दिशेला जाते आहे, गुंतवणूकीचं काय होणार याचं नेमकं गणित कोणाकडेच नव्हतं. पण जेव्हा तो आकार यायला लागला, रस्ता दिसायला लागला आणि आघाडी सरकार त्यातला अडथळा आहे हे स्पष्ट झालं, तेव्हा अशक्य वाटणारं बहुमतातलं सरकार सहज प्रत्यक्षात आलं.

मग यंदाच्या निवडणूक उद्धव ठाकरेंनी ज्या जुन्याच भावनिक मुद्द्यांवर आणून ठेवली आहे, ते मुद्दे नेहमीप्रमाणे (मर्यादीत) यश देतील का? महाराष्ट्राच्या बदललेल्या पिढीच्या अर्थव्यवहारांवर अखंड महाराष्ट्र, वेगळा विदर्भ, मुंबई वेगळी  करण्याचं कटकारस्थान, पाठीत खंजीर खुपसण्याची तक्रार, गुजराती अफ़झलखानाची दिल्लीहून महाराष्ट्रावर चाल या मुद्द्यांचा कुठे परिणाम होतो? दोन भाऊ एकत्र आल्याने कुठले आर्थिक फ़ायदे मराठी माणसाला मिळणार असतात? मराठी अस्मिता ही भाषिक भावना नसून अर्थव्यवहारावर आधारलेली भावना आहे आणि ती नवीन पिढीची भावना आहे. एकेमेकांमध्ये व्यवसाय वाढून आर्थिक फ़ायदा होत असतो तेव्हा मराठी अस्मिता आणि गुजराती अस्मिता वा तमिळ अस्मिता हे समानार्थी शब्द असतात. जातीय अस्मितेचा उल्लेखही वारंवार केला जातो, पण त्यामागे आरक्षणातून सुटणा-या आर्थिक अडचणींचीच अपेक्षा असते. अभिमान वगैरे बिल्कुल नसतो.  यंदाच्या निवडणूकीत केंद्रस्थानी आलेले भावनिक मुद्दे हे नव्या काळातली  कोणतीही आर्थिक गणितं सोडवतील असं दिसत नाही, त्यामुळे त्यांचा राजकीय प्रभावही दिसणार नाही.

अर्थात हे असं विधान मुंबईबद्दल सरसकटपणे करता येणार नाही. कारण आर्थिक संधी आणि लोकसंख्या यांच्या अतिव्यस्त प्रमाणातून  तिथं हे भावनिक मुद्दे आजही धारदार बनतात. पण त्याची कारणं निव्वळ आर्थिक आहेत, केवळ राजकारणाची झालर भावनेची. 

एका प्रकारे ही निवडणूक ही या अर्थानं अतिमहत्वाची आहे की ती ठरवेल की महाराष्ट्र बदलला आहे की नाही. या परदेशी गुंतवणूकीचा, ग्लोबलायझेशनचा, अर्बनायझेशनचा, त्यातून बदललेल्या जीवनशैलीचा आपल्या राजकीय मतांवर काही परिणाम झाला आहे की नाही हे ठरवलं जाईल.
  
---------------------------------------------------------------------------------
ता. क. :  विधानसभा निवडणूकीचे निकाल आले आहेत. वरील निरिक्षणांनुसार जो कल दिसणं अपेक्षित होतं तो दिसला आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वर्गांतील मतदारांनी भावनेकडे न पाहता बदललेल्या वैयक्तिक आर्थिक निकषांनुसार मतदान केलं आहे असं एकंदरीत चित्र दिसतं आहे. 

Wednesday, December 4, 2013

राजस्थान डायरीतली चार पानं

दिवसाचा प्रचार धूळभरल्या राजस्थानातून संपला की सगळे नेते रात्री जयपुरातल्या घरट्याकडे परततात. अशाच एका थकल्या रात्री परतलेले डॉ.किरोडीलाल मिणा त्यांच्या घरी भेटतात. त्यांना भेटणं आवश्यक आहे. कारण या विधानसभा निवडणुकीत राजस्थानात वसुंधराची लाट आहे की मोदींची की गेहलोतांची की राहुलची हा प्रश्न जरी सगळ्यांना असला तरीही, लाट कुणाचीही असो, या प्रत्येका इतकीच, किंबहुना जरा जास्तच चर्चा डॉ.किरोडीलाल मिणांची असते. 'मिणा क्या करेगा' हा सर्वांच्या कुतूहलाच्या विषय असतो आणि त्यामुळेच बाहेरून आलेल्या पत्रकारांना अगोदर भाजप विरूद्ध काँग्रेस अशीच लढाई दिसत असते, त्यांना अचानक या मिणांच्या तिसऱ्या सैन्याचा साक्षात्कार होतो.

"
हम तो किंगमेकर बनेंगे. हमारे सपोर्ट बिना राजस्थान की गव्हर्नमेंट नही बनेगी. और ना हम वसुंधरा को सी एम बनने देंगे ना गहलोत को?"

तोंडात पान नसतांनाही तोबरा भरल्यासारखं बोबडं बोलावं तसं किरोडीलाल बोलतात, जरा चिरक्या आवाजात.

त्यांच्या चिरक्या आवाजातल्या उत्तरात बेमालूमपणे मिसळलेला उसना राजकीय आत्मविश्वास असतो, जो प्रत्येक निवडणुकीअगोदर डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवाराकडेही असू शकतो. पण इथं तसं सरधोपटपणे तसं म्हणता येणार नाही. एक निश्चित, मिणा आणि त्यांची 'नॅशनॅलिस्ट पीपल्स पार्टी' म्हणजे 'एनपीपी' ही राजस्थानात तिसरा महत्वाचा पक्ष झालेली आहे.

डॉ.किरोडीलाल मिणा अगोदर 'भाजपा'त होते. राजस्थानातील सर्वात मोठी अनुसूचित जमात असलेल्या मिणा समाजाचा हा सर्वमान्य नेता. ते वसुंधरा राजे शिंदे यांच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्री होते. पण त्यांचं आणि राजेंचं कधीच जमलं नाही. जातींच्या अभिमानातून फ़ुललेला 'पोलिटिकल इगो' हे राजस्थानच्या राजकारणाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. 2008 च्या निवडणूकीत राजेंनी डॉ.किरोडीलाल यांच्यासह त्यांच्या सगळ्या समर्थकांची तिकिटं कापली. मग किरोडीलाल भाजपातून बाहेर पडले, अपक्ष उभे राहिले आणि स्वत:सह आपल्या साधी अक्षरओळखही नसलेल्या पत्नी गोलमा देवींसह निवडून आले. नंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीतही अपक्ष निवडून आले आणि आता शरद पवारांची साथ सोडून स्वत:ची एनपीपी काढणाऱ्या माजी लोकसभा अध्यक्ष पी ए संगमांचा हात धरून या पक्षातर्फे राजस्थानात भाजपा आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांना आव्हान देत उभे आहेत. त्यांचा पक्ष इथल्या 200 पैकी 147 जागा लढवत आहे आणि स्वत: डॉ.किरोडीलाल मिणा सवाई माधोपूर आणि लालसोट या दोन जागांवरून लढताहेत.

एसटी दर्जा मिळालेला आणि त्यामुळे सरकारी नोकऱ्यांसह शिक्षणात आरक्षण मिळालेला मिणा समाज कोणाकडे झुकतो यावर विकासापेक्षा केवळ जातींमध्येच अडकलेल्या राजस्थानच्या निवडणुकीची गणितं आधारलेली आहेत. तो जर डॉ.किरोडीलाल मिणांच्याच खिशात राहिला तर ते म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेस वा भाजपाला त्यांच्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही. सध्या तरी भाजपात अपमानास्पद वागणूक मिळालेल्या मिणांची काँग्रेसबरोबर अधिक सलगी आहे. वसुंधरा राजे तर जाहीर आरोप करतात की किरोडीलाल मिणांच्या प्रचाराच्या हेलिकॉप्टरसह सर्व खर्च काँग्रेसच करत आहे.

किरोडीलालांनी राज्यभर तिकिटं वाटली आहेत. पण उत्तर राजस्थानात मिणा समाज मोठ्या संख्येनं आहे. त्यामुळे तिथं त्यांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे.

"
कितनी सींटे आएगी आपकी?" प्रश्न.

"30 
से 40 आएंगी". मिणांचं उत्तर.  दोनशेमध्ये चाळीस जागा म्हणजे किल्ल्या यांच्याच कनवटीला.

"
क्या आप खुद सी एम बनने की कोशिश करेंगे?" प्रश्न.

"
क्यो नही, जरूर करेंगे."

म्हणजे किंगमेकर किरोडीलालांना किंग सुद्धा बनायचं आहे तर!

***

इकडे यंदाच्या निवडणुकीत किंगमेकर बनण्याची स्वप्नं पाहणारे हे डॉक्टर किरोडीलाल, तर तिकडे गेल्या निवडणुकीत असंच स्वप्न पाहणारे, पण तेव्हाही आणि आताही केवळ सत्ताधाऱ्यांच्या खेळातलं प्यादं झालेले दुसरे कर्नल किरोडीलाल. म्हणजे कर्नल किरोडीलाल भेंसला. गुर्जर समाजाचे नेते. यांचा चेहरा तर उभा देश कधीच विसरू शकणार नाही. 2008 मध्ये आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह रेल्वे ट्रॅक्सवर ठाण मांडून सरकारी नोकऱ्यांमध्ये गुर्जर समुदायाला पाच टक्के आरक्षणाची मागणी करणाऱ्या या कर्नल किरोडीलाल भेंसलांचा भरदार पांढऱ्या मिशांचा चेहरा तर देशातल्या घराघरात पोहोचला. रेल्वे बंद करून संपूर्ण उत्तर भारत त्यांनी जागेवर उभा केला. दगडफेक झाली, जाळपोळ झाली, गोळीबार झाला, रक्ताचे पाट वाहिले. सगळं झाल्यावर वर मग आश्वासनांची खैरात झाली. हेच सगळं पुढे 2010 मध्ये फ्लॅशबॅक दाखवावा तसं घडलं.

पण या कर्नल किरोडीलालांचं पुढे झालं काय?

सत्तेच्या सलगीला लागलेल्या सगळ्या आंदोलनांचं होतं तेच झालं. त्यांची भीती आता कोणाला वाटत नाही. वसुंधरा राजेंच्या सरकारने बंदुकीच्या गोळ्या दिल्या, मग पाच टक्के आरक्षणाच्या वाटाण्याच्या अक्षता दिल्या म्हणून गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडे गेले. त्यांचं सरकार आल्यावर आश्वासन पूर्ण होत नाही म्हणून पुन्हा आंदोलनाला बसले आणि आता पुन्हा यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला त्यांनी पाठिंबा जाहीर केला. परिस्थिती आता इतकीच आहे की गुर्जरांची तेव्हा झालेली एकी आता फ़ुटली आहे. कर्नल भेंसला जरी काँग्रेसकडे गेले तरी त्यांच्या आंदोलनातून फ़ुटलेले बाकी गुर्जर नेते भाजपाने ओढून नेले आहेत. मतं फ़ुटली आहेत. जातीच्या झेंड्याखाली एकत्र टिकलात तरच तुम्हाला किंमत आहे हे राजस्थानच्या राजकारणाचं सूत्र ते विसरले आहेत.

तरीही काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गुर्जर समाजाला पाच टक्के आरक्षणाचं आश्वासन आपापल्या जाहिरनाम्यांमध्ये ठेवलं आहे. ते कसं प्रत्यक्षात येणार हे कोणालाच माहित नाही. कर्नल भेंसलांनाही नाही. एकूण 50 टक्के आरक्षणाची लक्ष्मणरेषा कधीही ओलांडता येणार नाही हे माहित असूनही ते देऊ अशा शपथा घेतल्या जातात. अशी खोटी आश्वासने राजस्थानातच मतं मिळवून देऊ शकतात जिथं जात पाहूनच प्रत्येक मत पडतं.

कर्नल किरोडीलाल भेंसला मात्र काँग्रेसच्या प्रचारात व्यस्त असतात. मी त्यांना शंभर एक फोन करतो. मात्र प्रत्यक्ष भेट कधीही होत नाही.


***


राजस्थानचं एक मात्र बरं आहे. ते लपवून नाही ठेवत की जात हाच उमेदवारी देण्याच्या एकमेव क्रायटेरिया आहे. तसा भारतात एकही प्रदेश नाही की जिथं जातविरहीत राजकारण होतं. पण बाकी सगळे ताकाला जाऊन भांडं लपवणारे. इथं सगळं खुल्लम खुल्ला. नाव विचारण्याअगोदर जात विचारणार.

राजस्थानचं भंवरी देवी हत्याकांड देशभरात प्रत्येकाला ठाऊक असेल. गेल्या काही वर्षांत आरूषी प्रकरणानंतर टेलिव्हिजनवर सर्वात जास्त चाललेली क्राईम स्टोरी होती ती. मंत्री, आमदार, एक स्त्री, सेक्स स्कँडल सिडी, शेवटी मर्डर आणि त्याची मिस्ट्री. काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री महिपाल मेदरना त्याच अडकले होते, त्यांना अटकही झाली. त्याबरोबर आलेलं राजकीय वादळही इतकं मोठं होतं की वाटलं आता हे वादळ काँग्रेसचं सरकार इथून घेऊन जाणार. वाटलं हेही होतं की तो यंदाच्या निवडणुकीतला विरोधी पक्षांचा सर्वात महत्वाचा मुद्दा असणार कारण इतकी नाचक्की झाली होती काँग्रेसची या प्रकरणात.

पण प्रत्यक्षात परिस्थिती कल्पनेपेक्षा वेगळी होती. जातीच्या राजकारणानं आपल्यातल्या (पुस्तकी?) संवेदनशीलतेला हरवलं होतं.

महिपाल मेदरना हे काँग्रेसचे मंत्री भंवरी देवी प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांनीच तिची हत्या घडवून आणली. पण ते जोधपूर भागातले जाट समाजाचे नेते आहेत. त्यांचा मतदार त्यांना जातीने मानतो, इतर कृत्यांनी नाही. ते तुरुंगात म्हटल्यावर काँग्रेसने त्यांची पत्नी लीला मेदरना यांना त्यांच्या ओसियन मतदारसंघातून तिकीट दिलंय. म्हणजे खरं तर मेदरनाच तुरुंगातून निवडणूक लढवताहेत.

याच भंवरी देवी प्रकरणात काँग्रेसचे अजून एक आमदार तुरुंगात आहेत, मल्खन सिंग बिश्नोई. त्यांनी आणि मेदरनांनी मिळून भंवरी देवीला मारण्याचा कट रचला असा आरोप आहे आणि जोधपूरच्या याच भागात बिश्नोई समाजाची मतं सर्वाधिक आहेत. मल्खनचे वडिल रामसिंग बिश्नोई या समाजाचे मोठे नेते होते, आमदारही होते. त्यांच्यानंतर ती जागा मल्खनने घेतली. त्याने हत्येचा कट रचला काय किंवा अजून काय केलं काय, बिश्नोई समाजाची मतं त्यांच्याकडेच जाणार. म्हणून मग काँग्रेसनं मल्खन सिंगच्या 82 वर्षांच्या अक्षरओळखही नसलेल्या आईला, अमरी देवींना, लुनी मतदारसंघातून तिकीट दिलं.

आता याला काय म्हणावं? रोज उठसूठ महिलांच्या हक्कावरून दिल्लीतल्या आपल्या वकील पक्षप्रवक्त्यांमार्फ़त महिला सबलीकरणाचे ट्विट्स करवणाऱ्या राष्ट्रीय पक्षाने दोन सबल महिलांना दिलेली उमेदवारी म्हणावी? का आपापल्या जातींचे नेते असणाऱ्या दोन नेत्यांच्या सावल्यांना उमेदवारी दिली? आणि मग भंवरी देवीचं काय करायचं?


***


राजस्थानात होणार काय?

गेल्या चार निवडणुका पाहिल्या तर तामिळनाडूनंतर हेच एमकेव राज्य असावं जिथं सत्तेत असलेल्या पक्षाला पायऊतार व्हावं लागतं. तामिळनाडूत स्थानिक पक्षांचच (डीएमके आणि एआयडीएमके) अस्तित्व आहे तर राजस्थानात फ़क्त दोन राष्ट्रीय पक्षांचं, भाजपा आणि काँग्रेस. याला म्हणायचं काय? सर्वात जागरूक मतदार? आदर्श लोकशाही?

पण विरोधाभास हा आहे की देशभरात अस्तित्व असलेल्या दोन राष्ट्रीय पक्षांना इथे स्थानिक जातींच्या टोळ्यांना घेऊनच लढावं लागतं. राष्ट्रीय मुद्दे वगैरे इथे बिनकामाचे आहेत. ज्याच्याकडे जेवढ्या जास्त टोळ्या, तो विजेता. वसुंधरा राजे आणि अशोक गेहलोत दोन पक्षांचे नेते असतील, पण दोघंही अगोदर आपापल्या समाजांचे नेते आहेत. राजस्थानात तसं पाहिलं तर दोनदाच तिसऱ्या पक्षाची पोलिटिकल स्पेस तयार झाली आणि तीही तयार झाली जातीच्याच आधारावर. पहिल्यांदा राजमाता गायत्री देवींनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता तेव्हा. कधीकाळी सत्तेच्या जवळ पोहोचलेला हा पक्ष राजपुतांचा, राजघराण्यांचाच पक्ष होता. आणि दुसऱ्यांदा ही पोलिटिकल स्पेस तयार होते आहे डॉ.किरोडीलाल मिणांमुळे यंदाच्या निवडणुकीत. जरी पक्ष असला राष्ट्रीय, तरीही भाजपावर नाराज असलेल्या मिणा समाजातल्या नेत्यांचाच हा पक्ष आहे. म्हणजे परत आधार जातच.

त्यामुळे चर्चा जरी एंन्टी इन्कबन्सी काँग्रेसला भोवणार का, नरेंद्र मोदी फॅक्टर राजस्थानसारख्या रा.स्व.संघाचं मोठं नेटवर्क असणाऱ्या राज्यात चालणार का अशा विषयांवर होत असली तरीही निवडणूक मात्र नेहमी काँग्रेसलाच मदत करणारे जाट भाजपाकडे येणार का, गुर्जरांची मत विखुरणार का, राजपूत राजघराणी संस्थानं राखणार का या जातीगणितांवरच लढवली जाते.

वास्तविक गेहलोतांच्या सरकारनं शेवटच्या काळात घेतलेले मोफ़त वैद्यकीय सुविधा आणि औषधं असो, वा ज्येष्ठांसाठी पेन्शन योजना असो, या निर्णयांचे दृष्य परिणाम निवडणुकीअगोदर दिसू लागले. शहरापेक्षा ग्रामीण भागात लोकांना या योजनांचा चांगलाच फ़ायदा झाला आहे आणि लोक तसं बोलूनही दाखवतात. प्रश्न इतकाच सगळ्यांना आणि काँग्रेसलाही आहे की, जातीय अभिमानाच्या वर उठून लोक मतदान करणार का? बाहेरून ऐश्वर्यसंपन्न दिसणाऱ्या महालांच्या आत मात्र लागलेली जातीय राजकारणाची बुरशी हे राजस्थानचं वास्तव आहे.

असो. विक्रमी 74 टक्के मतदान राजस्थानात झालं आहे. 8 तारखेला पेटारा उघडेल तेव्हा निकाल समजतील आणि वरील निरिक्षणांची मीमांसा करता येईल. त्या दिवशी डायरीतलं शेवटचं पान लिहिता येईल.



***************************************************

राजस्थानच्या या निवडणूकीसाठी फिरतांना इतर राज्यांपेक्षा निराळ्या गोष्टी दिसल्या, त्याचे रिपोर्ट केले. त्यातल्या काही लिंक्स देतो आहे. 

गुलजारांची 'रावीपार' फ़ाळणीवेळी घडली असेल.
पण ते 'रावी-झेलम-सतलज'पार होणं आजही थांबलं नाही आहे.
दर रविवारी कराची-जोधपूर थार एक्स्प्रेस सीमा ओलांडून येते आणि राजस्थानातल्या विस्थापित हिंदूंची संख्या वाढवते.
जन्म घेतलेल्या भूमीवरची ओळख पुसत हे सारे धर्माच्या आधारानं इकडं नवी ओळख शोधतात.
आणि त्या संघर्षात केवळ वाढत्या संख्येमुळे निवडणूकीतली एकगठ्ठा मतं बनतात,
भारत-पाकिस्तानातलं प्रत्येक युद्ध, प्रत्येक दंगल विस्थापितांची आणि पर्यायानं मतदारांची संख्या वाढवत जाते.
या विस्थापितांची कैफियत 

लोकशाहीतली व्होटिंग मशीन्स राजस्थानातली राजेशाही मजबूत करतात.
त्यामुळेच खालसा झालेली संस्थानंही इथली राजघराणी निवडणूक जिंकून राखू शकतात.
राजेही शाबूत, राज्यही शाबूत आणि त्यांच्या आधारानं निवडून आलेलं सरकारही शाबूत.
हे राज्य वर्तमानात इतिहास जगतं.
राजस्थान की राजपुताना?
***************************************************************************

Friday, August 3, 2012

पावसाच्या मागावर: दक्षिणायन



पावसाची अशी वाट यापूर्वी कधीही पाहिली नसेल. किमान मी तरी. पण मे उजाडला आणि माणदेशातूननेहमीप्रमाणेचपाण्यासाठी पहिली आर्त हाक उठली. बातम्या सुरु झाल्यादौरे सुरू झाले. तात्या माडगूळकरांच्या बनगरवाडीत वाचलेले ते शुष्क दिवस डोळ्यांना पहायला मिळाले. जोडीला चाराडेपोदुष्काळसदृष छावण्यापैकेज असले सरकारी शब्द आणि समोर वास्तव. माझ्या शहरी आयुष्याला ते नवीन होतंघाबरवणारं होतं. पिण्यासाठी आणि आन्हिकांसाठी सोय झाल्यावर उरलेलं पाणी नकळत उधळणा-या शहरी आयुष्याला ती भीषणता घुसळवून टाकणारी होती. इथल्या जाहीर झालेल्या योजना कुठे गेल्याधरणांमधून इकडे यायला निघालेले कॅनॉल कुठे गायब झालेत्याचे पैसे कुठे गेले या अशा बातमीच्या प्रश्नांबरोबरच शेकडो वर्षांपासून अवर्षणात असलेल्या या भागात माणूस मुळी वस्ती करायलाच आला कसा आणि का असे प्रश्नही सतावायला लागले. पण जसजसे दिवस जायला लागलेतसा प्रश्नांचा रवंथही टोचायला लागलातशी पावसाची ओढ वाढत गेली. पाऊस हवालगेच हवा. माणदेशातून डोळे केरळकडे वळले. मॉन्सून आम्हाला वाचवणार. गेली हजारो वर्षं वाचवत आलायपाणी घेऊन आलाय. यंदाही तेच करेल. आणि तो येईलमग थोड्या दिवसांनी माझ्या घराशी पोहोचेल. पण अशी वाट पाहत नाही बसायचं. मग आमचंएबीपी माझा"चं ठरलंकी त्याच्याबरोबर प्रवास करायचात्याला इथे आणायचा. अंदमानवर मॉन्सूनच्या दाट ढगांचं आवरण पडलं आणि निरोप आल्यासारखे आम्ही केरळकडे निघालो. तहान घेऊन मॉन्सूनच्या पहिल्या घराकडे निघालो. त्या दिवसापासून माझा सुरु झाला आठ हजार किलोमीटर्सचा प्रवासआशा-निराशेचाअसलेल्या-नसलेल्या-येणा-या पावसाबरोबर.

पुण्याहून निघालो तेव्हा खंबाटकी घाट ढगांनी भरला होतासाता-यात तो धो-धो कोसळत होता. कोल्हापूर दिवसा अंधारात बुडालं होतं. दक्षिणेकडे निघालो तसे काळे ढग अधिकच गडद होत चालले. वाटलंयंदा आपली ओढ अधिकगरज अधिकतर हाही पठ्ठ्या जोरात कोसळणार. बहुतेक चांगल्या मॊन्सूनचा हवामान खात्याचा अंदाज यंदा खरा ठरणार. बंगळूरूहून जरा तामिळनाडूच्या दिशेनेकोईम्बतूरकडेगेलो तेव्हा पुन्हा निरभ्र आकाश डोक्यावर आले. पण पालघाटमार्गे केरळमध्ये शिरल्यावर पुन्हा एकदा रस्ता अंधारला. त्रिचूरमध्ये पोहोचलो होतो आणि ऒफ़िसमधून फ़ोन आला की आय एम डी ने जाहीर केलंयमॉन्सून केरळमध्ये दाखल झालाय. आलाजूनच्या पहिल्या दिवशी न येता पाचव्या दिवशी आलाइतकच. पण पाऊस कुठायत्रिवेंद्रम पर्यंत अजून तीनेकशे किलोमीटरचं अंतर कापायचं होतं. मधे कुठेतरी सापडेलच. जोरात निघालो. मनोमन ठरवलं होतं की काहीही झालं तरी आज दिवस बुडायच्या आत केरळच्या त्या धो-धो पावसातून् भिजतउसळत्या समुद्रावरूनकैमे-यासमोर उभं राहून एक तरी लाईव्ह करायचंच आणि दुष्काळातल्या महाराष्ट्रासाठी वर्दी द्यायची कीफ़ार तापू नकोसकण्हू नकोसतो आलाय. बस्स. आता अगदी थोडा अवधी शिल्लक आहे. गाडीचा वेग वाढलाआणि पहिल्या पावसाकडे जाण्याच्या आवेगही. त्रिचूर सुटलंएर्नाकुलम गेलंकोची मागे पडलं. समुद्रकिना-यानं आमचा प्रवास सुरु झाला. डोक्यापासून ते क्षितीजाच्या समुद्राला टेकणा-या रेषेपर्यंत काळ्या ढगांचं साम्राज्य होतं. पावसाची चाहूल लागून समुद्राच्या लाटा पुरूषभराहून जरा अधिकच उसळत होत्या. सोसाट्याच्या वा-यात नारळाच्या झाडांची ती जंगलं आपलं डोकं आपल्याच पायाला लावायच्या प्रयत्नात होती. कुठं जाता जाता एखाद्या पट्ट्यात ओली माती दिसायची. वाटायचं की आता हाकेच्या अंतरावर असणार पाऊस. पण तो नसायचा. हा काय लपाछपीचा खेळ आहेत्रिवेंद्रमची वस्ती सुरु झाली. सूर्यास्त होत असावाकारण अधिकच दाट अंधारायला लागलं. हिरमुसून त्रिवेंद्रमच्या अलिकडे २० किलोमीटर अंतरावर एका किना-यावर थांबलो. कैमेरा सुरु केला. लाईव्ह झालं. दिमतीला मॊन्सूनचे वारे होतेत्यांनी वाहून आणलेले काळे ढग होतेउसळणा-या लाटांचं संगीत होतंनव्हता फ़क्त धो-धो पाऊस. पहिल्याच दिवशी पावसाविना पावसाची वर्दी शब्दांचेच ढोल वाजवत मी केरळहून महाराष्ट्रासाठी दिली.


लाईव्ह झाल्यावर जवळच्या चहाच्या टपरीवर थांवलो. तिथं एक वयस्क गृहस्थ होते. पांढ-या लुंगीला आणि सद-याला बराच चिखल लागला होता. उगाच अंदाज केला की हे शेतकरी असावेत. काहीतरी हिंदी-इंग्रजी मिसळून विचारलं,
" मॉन्सून आलाय म्हणतात. पण पाऊस का नाही?"
त्यांनी आभाळाकडे पाहत म्हटलं,
"अजून पाच दिवस काहीही नाही."
माझ्या पोटात गोळा आला. पण पाच दिवसांनंतरची आशा घेऊन मी त्रिवेंद्रम मुक्कामी निघालो. तेव्हा काय माहित होतं की पाच दिवस नाहीतर पावसाचा हा शोध आठ हजार किलोमीटर चालणार आहे!  

त्रिवेंद्रम हा मॉन्सूनचा नगारखाना आहे. ढगांनी तिथे ढोल वाजवले की भारतीय भूमीवर मॉन्सूनचं आगमन झालं असं जाहीर होतं. आम्ही शिरलो तेव्हा एखाद दुसरी सर पडून गेली होती. ओलावा होता. सकाळी उठून पाहतो तो लख्ख प्रकाश होता. आकाश निरभ्र होते. सोबतीला अखंड घामाच्या धारा होत्या. तो मॉन्सून वगैरे म्हणतात तो खरंच आलाय नाहा प्रश्न वेधशाळेत जाऊन विचारल्याशिवाय पर्याय नव्हता. त्रिवेंद्रमची वेधशाळा ऎतिहासिक आहे. ती भारताची पहिली वेधशाळा आहे. १८३७ साली कार्यरत झालेली. केरळ हे तेव्हा त्रावणकोर साम्राज्य होतं. त्या भूमीवर युरोपिअनांचं आगमन कधीच झालं होतं. त्यांच्याबरोबर व्यापार करण्याबरोबरच तेव्हाच्या या साम्राज्याच्या राजालाराजे स्वातितिरूनाल यांना ज्ञानाच्या देवाणघेवाणीतही रस होता. खरं तर त्यांना जास्त रस होता खगोलशास्त्रात. त्यामुळे एक ऒब्झर्व्हेटरी उभी करावी असं त्यांच्या मनानं घेतलं. आणि तशी ती इथल्या एका टेकडीवजा उंच भागावर उभी राहिली. अर्थातखगोलशास्त्रीय निरिक्षणांपेक्षा हवामानशास्त्रीय निरिक्षणांसाठीच तिचा वापर पहिल्यापासून अधिक झाला. परिणामी  मॉन्सूनचे सर्वाधिक जुने रेकॊर्डस असणारी ती वेधशाळा आहे. सध्या ती जुनी इमारत नुसती उभी आहेपण समोर हवामानखात्याची अद्ययावत वेधशाळा तयार आहे. इथून अधिकृतरित्या सांगितलं जातं की मॊन्सून आला.

मी गेलो तेव्हा मुख्य संचालक कुठे दौ-यावर गेले होते. डॉ.बिजू म्हणून एक प्रभारी होते. पहिला प्रश्न त्यांना हाचकी पाऊस कुठं आहेते म्हणालेआलाय की. त्यांच्या ब्झर्व्हेशन सेंटरमध्ये घेऊन गेले. तेव्हा समजलं की मॉन्सून येतो म्हणजे काय होतं ते. या मुख्य केंद्राच्या अखत्यारित केरळमध्ये एकूण १४ अशी मापनकेंद्रे आहेत. त्यातली काही अंदमान बेटांवरही आहेत. यापैकी कोणत्याही ४ केंद्रांवर सलग ४८ तास ४ मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली की मॉन्सूनचे आगमन झाले किंवा या विभागीय केंद्राच्या अखत्यारित असलेल्या एकूण क्षेत्रापैकी ६० टक्के भागात जर सलग २४ तास २.५ मिलीमीटर पाऊस पडला की मॉन्सून आला. म्हणजे त्यांच्या भाषेत नसेटआणि मुख्य म्हणजे मॉन्सून म्हणजे नैऋत्य मोसमी वारेपाऊस नव्हे. ते वारे वहायला लागले याच अर्थ पाऊस पडेलच असे नाही. तो पडण्यासाठी जो योग्य दाबाचा पट्टा तयार होणं अपेक्षित असतंजी नेमकी वातवरणाची परिस्थिती तयार होणं गरजेचं असतंती लगेच तयार होईल असे नाही. प्रत्येक वेळेस ते वारे बाष्प असलेले ढग आणतीलच असे नाही आणि आणले मग कमी दाबाचा पट्टा तयार होऊन बरसतीलच असे नाही. म्हणजे एकंदरीत कायतर ते मला सांगत होतेजास्त उत्साही होऊ नकाधीर धरा. त्यांच्या हातातल्या सगळ्या केंद्रांच्या यादीमध्ये मोजक्या चार-पाच केंद्रांवर चांगला पाऊस झाल्याचे आकडे तरी दिसत होते. त्यामुळे  मॉन्सून आला होतापसरायला नी बरसायला तो त्याचा वेळ घेणार होता. त्याला नाही म्हणणारे आपण कोणआणि म्हटलंतरी उपयोग काय

त्रिवेंद्रमच्या प्रसिद्ध कोवलम बीचवर जाऊन बसलो. समुद्र खवळला होता. लाटा उंच उसळत होत्या. जसं काही त्या वरच्या ढगांना खाली आपल्या पोटात ओढू पाहत होत्या. पण आभाळाच्या पोटात काही निराळंच होतं.





त्रिवेंद्रममधले पुढचे दोन दिवस असेच कोरडे गेले. वाटलंकी जरा इथं थांबूया. भले सगळ्या पश्चिम किनारपट्टीवर नाहीपण किमान केरळच्या समुद्रकिना-यावर सगळीकडे पाऊस सुरु होईल. मग त्याच्याबरोबर पुढे निघता येईल. म्हणून वाट बघत थांबलो. ठरलेली दिशा सोडून उलट्या दिशेला कन्याकुमारीला जाऊन आलो. त्या त्रिवेणी संगमावरचे तीनही समुद्र स्थिरचित्त होतेविवेकानंदांच्या मुद्रेसारखे. तिथून परततांना मार्गातच असणा-या पद्मनाभपुरम राजमहालात जाऊन आलो. त्रावणकोर साम्राज्याचे १४ राजे पाहिलेला हा महालसंपूर्णपणे लाकडामध्ये कोरलेला. आज साडेतीनशे पावसाळे या लाकडी महालाने पाहिलेएक बुंधाही हलला नाही. ना कधी बुरशी चढली ना कधी वाळवी. हे लाकूड पावसाला कधी भ्यालं नाही. पण यावर्षी अजूनही कोरड्यात उभा होता. पावसात तो कसा दिसतो हे पहायला मिळालं नाही. केरळची एक खासियत डोळ्यात भरून राहिली. केवळ हा शेकडो वर्षांपूर्वीचा महालच नव्हेतर आजच्या आधुनिक वास्तूरचनेत लाकडाला केवढं स्थान आहे. फ़णसाचं लाकूड ते जास्त वापरतात. मी जरा अतिषयोक्तीनेच म्हणत असेनपण केरळमध्ये किमान दर चार किलोमीटरनंतर एक लाकडी फ़र्निचरचं दुकान लागतं. आणि ते फ़र्निचरही आपल्याकडचं केवळ काटकोनातलंकॊर्पोरेट स्टाईल नव्हे. तर राजेशाहीकारागिरी केलेलं. एवढ्या पावसाच्या प्रदेशात लाकडाचा हा वापर डोळ्यात भरतो.

त्रिवेंद्रमला परत आलो. नारळाच्या जंगलामध्ये वसलेलं हे शहर मॉन्सूनच्या आगमनाच्या वर्दीनंतर तीन दिवसांनीही कोरडं होतं. आता मला पुढे निघण्यावाचून पर्याय नव्हता. कोणीतरी म्हणालं की तसा इकडे त्रिवेंद्रमला कमीच पडतो पाऊस. पुढे जाआलेप्पीच्या बैकवॊटर्समध्ये पूर आला असेल आत्तापर्यंत. तडक निघालोस्वत:लाच नावं ठेवत. पाऊस तिकडे कोसळतोय आणि मी इकडे काय करतोय?

आलेप्पी मोठं गोड शहर आहे. त्याला व्हेनिस ऒफ़ द ईस्ट म्हणतात. कारण व्हेनिससारखे इथंसुद्धा पाण्याचे रस्ते आहेत आणि त्यातून बोटीने प्रवास करत तुम्ही केरळच्या प्रसिद्ध बैकवॊटर्समध्ये शिरता. एखाद्या पेंटिंगसारखं रेखीव शहर आहे. केरळला येणा-या पर्यटकांसाठी सर्वात मोठं आकर्षण. केरळच्या कम्युनिस्टांचं तर हे तीर्थस्थान आहे आलेप्पी. ४० च्या दशकातल्या केरळच्या कम्युनिस्ट क्रांतीचं हे केंद्र होतं. आजही व्ही एस अच्युतानंदांसारखे सर्वात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते या भागातूनच निवडून येतात.

डोळ्यांमध्ये भरलेल्या आभाळाची आशा घेऊन इथं आलो खरा पण प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारं आकाश मोकळंच होतं. आलेप्पीला पाऊस झाल्याचे आकडे हवामान खात्याकडे दिसत होतेसॆटेलाईट इमेजेसवर ढग तर भरून आलेत असं दिसत होतंकदाचित आतल्या भागात बॅकवॉटर्समध्ये पाऊस सुरु असेलम्हणून तिकडे निघालोकुट्टनाडकडे. इथल्या समुद्रसपाटीखालच्या भातशेतीबद्दल बरंच काही ऎकलं होतं. आता भातशेती म्हणजे पाऊस तर भरपूर हवाच. खाचंर पाण्या-चिखलानं भरल्याशिवाय पेरणी करणार कशीइकडं आमच्या राज्यातला शेतकरी ती खाचरं भरण्यासाठी पावसाची वाट पाहतोयमग इकडचे शेतकरी काय करताहेतकुट्टनाड म्हणजे जमिन कमी आणि पाणी जास्त असला प्रकार आहे. आणि आहे तीसुद्धा जमिन कसलीजरा ऊंचीवर होती म्हणून पाण्याखाली न गेलेल्या बेटांचा समूह म्हणता येईल. या सगळ्या बेटांवर हे लोक राहतात. पाण्यामध्येचपाण्यानं वेढलेलंपाण्यामुळेच यांचं आयुष्य. खा-या पाण्याच्या समुद्राला वाकुल्या दाखवत असलेल्या गोड्या पाण्याचा हा प्रदेश. गेल्या अनेक वर्षांमध्ये थोडा थोडा करत आता बराचसा भाग रेक्लमेशनने जोडण्यात आलाय खरा. ब-याचशा भागाचं शहरीकरण झालंय. पण आजही पावसाळ्यात इथे पूर येतातबंधारे वाहून जातातरस्त्यांवरून पाणी वाहून जातेकधी कधी बरोबर रस्तेच घेऊन जाते. बेटांवरच्या घरांमध्ये पाणी शिरते. मग लोक त्याच घरातल्या वरच्या मजल्यांवर रहायला जातातपण घर सोडत नाहीत. चारेक महिन्यांनी पाऊस थैमान घालायचं थांबतो. मग सामान्य पाण्यातलं आयुष्य पुन्हा सुरु होतं. पण या सगळ्या पाण्यात हे लोक भातशेती कशी काय करतात?

कुट्टनाड मध्ये आत शिरत होतोतेव्हापासूनच पावसाशी झगडण्याची त्यांची तयारी दिसत होती. पाण्यातून जाणा-या रस्त्यांना काथ्यांचा आधार द्यायची कामं चालली होती. नारळाच्या झावळ्यांपासून केलेल्या काथ्यांनी विणलेली काथ्यांची लांबच्या लांब आयताकृती किंतानं तयार केली होती. आणि ती रस्त्या दोन्ही बाजूच्या उतारांवर लावली जात होती. कारण हे की काथ्यांचं हे आवरण पूरातही माती धरून ठेवतंरस्ता खचत नाही आणि वाहून जात नाही. एकदा हे आवरण लावलं की मग पाच वर्षं चिंता नाही. जवळपास गावं जोडणा-या सगळ्या रस्त्यांवर हे काम चाललं होतं. मुख्यत्वे बायकाच हे काम करत होत्या. विचारलं तेव्हा समजलं की रोजगार हमी योजनेत हे काम चाललं आहे.




पुढे जायला लागलोनी हिरवीगार भाताची खाचरं दिसायला लागलीआणि मग मला समजलं की हिला समुद्रसपाटीखालची शेती का म्हणतात ते. आमची नाव पाण्यातून चालली आहेबाजूला बंधारा आहे आणि बंधा-याच्या पलिकडे ही खाचरं आहेत. बंधा-यावर उभं राहून अदमास घेतला तरी समजतं की एका बाजूचं पाणी जमिनीपेक्षा अडीच ते तीन इंचानी उंचीवर आहे. म्हणजे पाणी वर आणि शेती खाली. आणि हे काही नैसर्गिक नाहीतर मानवी उपायांनी तयार केलेली परिस्थिती आहेत्याचं एक तंत्र आहे जे अनेक वर्षांपासून विकसित झालं आहे आणि इथे माणूस पाण्याच्या पोटात जागा करून भातशेती करतोय. ब-याच ठिकाणी पेरणी झाली होती. हिरवीगार खाचरं गुडघाभर वाढली होती. काही ठिकाणी पेरणी सुरु होतीतर काही ठिकाणी भातशेतीसाठी जमिन तयार केली जात होती ! तंत्र असं आहेकी जिथं सखल जमिन आहेपाण्याची खोली जास्त नाहीअशा ठिकाणी पाणी शिरायला मज्जाव करून वा असलेलं पाणी बाहेर काढून शेतजमिनीचा पट्टा तयार करायचा. इतक्या वर्षांचा गाळ आहेचजमिन सुपीक आहेचपाण्याची कमतरता अजिबात नाहीमग हे भातशेतीचं नंदनवन. पण त्यासाठी अक्षरश: हातानं पाणी बाहेर काढलं जातं. नंतर पायानं मारायच्या मोटेचं काही तंत्रही विकसित झालं. आत्ता मी समोर पाहत होतोतर अनेक ठिकाणी पाण्याखालचा गाळ काढून या शेतपट्ट्याला चारही बाजूंनी बांध घालायची कामं चाललेली होती. म्हणजे आता पाऊस जरी जोरात सुरु झाला आणि थोड्याच दिवसात पूर आला तरीही शेतात पाणी घुसणार नाही.

शेकडो वर्षांपासून ही अशी समुद्रसपाटीखालची शेती इथं चालू आहे. त्याला ते कायल शेती असंही म्हणतात. कायल म्हणजे बॅकवॉटर्स' . अशा प्रकारची शेती म्हणे युरोपातल्या एका भागात होतेनंतर इथंच. आज कुट्टनाडचा जवळपास ३५ हजार हेक्टर भाग अशा शेतीखाली आहे. या शेतीतंत्राला आता जागतिक हेरिटेज दर्जा सुद्धा मिळालाय. ही कायल शेती मॊन्सूनच्या चार महिन्यात होते. पण इथं अजून एका प्रकारची भातशेती होते. एवढ्या पाण्यामुळे इथे चिखलाचेदलदलीचे भाग सुद्धा तयार झालेत. त्यातही भात लावला जातो. पावसाळ्याबरोबरच डिसेंबरनंतरसुद्धा या चिखलात अजून एकदा भात घेतला जातो.

पण पावसाच कायपावसाने ओढ दिल्यानं इथली भातशेती सुद्धा रेंगाळणार कायअनेक शेतक-यांची बोललो. पण चिंतेची आठी त्यांच्या कपाळावर दिसली नाही. उलट पावसाला उशीर झालाय म्हणून ते खूष वगैरे आहेत की काय असंच वाटलं. "उशीर झालायपण अजून थोडा झाला तरी हरकत नाही "त्यातला एक जण मला सांगतो. "त्यामुळे किमान आमची बंधा-यांची कामं तरी पूर्ण होतील. आणि भातलावणीसाठी बक्कळ पाणी आहे इथं. उलट पाऊस आल्यावर पूर लवकर येतात आणि नुकसान आमचंच होतं." पाऊस उशीरा यावा म्हणतांना तो निर्विकार होता. मी म्हटलंभारी आहे बुआ. निसर्ग कोणाची अवस्था कशी करून ठेवेल सांगता येत नाही. तो वरचा आपल्याकडचा शेतकरी पाऊस पाऊस म्हणून ओरडतोयआणि इकडचा शेतकरी त्याला जरा सबूरीनं घ्यायला सांगतोय. अर्थातप्रत्येक जण आपलीच सोय बघतो म्हणा. पण कुट्टनाडमधून बाहेर पडतांना हा प्रश्न सतावत होताकी यंदाचा पाऊस नक्की कोणाची सोय पाहून येत होता वा नव्हतातो त्याची सोय कशी ठरवतोजोरात आला उगाच तर सोयीचं पडावं म्हणून आम्ही आमच्या नावेला पावसासाठी छत वगैरे लावून गेलो होतो. निराशेनं ते काढून टाकावं लागलं. कुट्टनाडला अजून तरी फ़ार काही फ़रक पडत नव्हताआम्हाला मात्र पाऊस सापडत नव्हता.




आलेप्पीची अजून एक खासियत सांगितल्याशिवाय पुढे जाववणार नाही. ते म्हणजे छत्र्या ! इथल्या छ्त्र्या पाहिल्या आणि वाटलं की आपल्याकडे ही दृष्टीच नाही. आपण निव्वळ उपयुक्ततावादी. पाऊस ज्याला म्हणतात त्या आकाशातून पडणा-या पाण्यामुळे लज्जारक्षणासाठी उपयुक्त ठरणारे कपडे नामक आवरण भिजू नये यासाठी उपयुक्त ठरते ती छत्रीही आपली कल्पना आणि तसा वापरही. पण छत्री ही निव्वळ वापरायची गोष्ट नसून ती मिरवण्याचा अलंकार आहे हे मला आलेप्पीत आल्यावर समजलं. छत्रीवर प्रेम करतात हे लोक. भारतातलं छत्र्या तयार करण्याचं आलेप्पी हे खूप मोठं केंद्र आहे. तसा हा उद्योग वर्षभर सुरु असतोपण मॉन्सूनचे चार महिने म्हणजे त्यांची दिवाळी. केवळ या सिझनचा त्यांचा टर्नओव्हर दोनशे कोटीहून जास्त जातो.

"तुम्हाला सांगूआमच्याकडे छत्र्यांची साडेसहाशे डिझाईन्स आहेत आणि सगळी मार्केटमध्ये आहेत."
आलेप्पीच्या 'जॉन्स' या प्रासिद्ध ब्रॆन्डचे मालक जॉर्ज थाईल माझ्यासमोर हे पहिलंच वाक्य टाकतात तेव्हा मी डोळे विस्फ़ारून फ़क्त "काssss? इतकंच विचारू शकतो.

"आणि दरवर्षी नवनवी डिझाईन्स तयार करण्यासाठी आमच्याकडे खास रिसर्च एंड डेव्हलपमेंट विभाग आहेत. आमचे आर्टिस्ट नवी आकर्षक डिझाईन्स शोधून काढतात. वेगवेगळ्या मटेरिअल्समध्ये प्रयोग केले जातात."
थाईल सांगत असतात.

छत्र्यांसाठीही आर एण्ड डी असतं ही गोष्ट माझ्यासाठी तरी नवीन होती. त्यांच्या ज्या शोरूममध्ये आम्ही होतो तिथं त्यापैकी अनेक छत्र्या होत्या. आठ माणसांना सामावून घेईल एवढ्या मोठ्या छत्रीबरोबरच अर्धा वितभर असलेली पाच फ़ोल्डची छत्री तिथं होती. कापडाच्या छत्रीबरोबर अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून रक्षण करणारी छत्री तिथे होती. वर्षभराच्या मुलांसाठी हनुमानछत्रीपासून आजोबांसाठी काठी म्हणूनही उपयोग करता येईल अशीही छत्री तिथे होती. मुळात त्यांच्यावर असलेले कारिगरीचे संस्कार दिसत होतेलाकडाचा वापर तसाही केरळात भरपूर होतोचतसा तो छ्त्र्यांसाठीही होतो. अफ़लातून कारिगरी असणा-या वेगवेगळ्या आकाराच्या लाकडी मुठींच्या छ्त्र्या तर दिमाखदार होत्या. त्या वापरण्यापेक्षा मिरवायलाच जास्त आवडतील.

आलेप्पीचा हा छत्र्यांचा व्यवसाय जगभर पसरलाय. जगभरातल्या विमानतळांवर आलेप्पीच्या एलिट छत्र्या वेगवेगळ्या ब्रॆन्ड्सच्या नावाने तर असतातचपण अनेक कॊर्पोरेट कंपन्या इथे लाखालाखांच्या ऒर्डर्स देतात. या व्यवसायाचा व्यापच इतका आहे आता त्यांच्या कुटुंबातच दोन ब्रॆन्ड्स आहेत. एक जॉन्स आणि दुसरा पॉपी'. पण यंदा तेही चिंतेत होते कारण पावसाचा उशीर. ओर्ड्स् आल्या होत्यामाल तयार होतापण पाऊसच अद्याप न आल्यामुळे कोणी तो माल उचलायला तयार नव्हता. "अजून १५ दिवसांत माल नाही उचलल गेलातर नुकसान जास्त आहे." जॉर्ज चिंतित स्वरात सांगताततेव्हा आलेप्पीला फ़क्त ऊन असते. बाहेर रस्त्यावर लोकांच्या हातात छत्र्या दिसतातपण त्या पावसासाठी नसतात तर कडक उन्हासाठी असतात. आम्हीही विकत घेतलेल्या भरपूर छत्र्या व्यवस्थित पॅक करायला सांगतो. कारण अजून तरी त्याचा उपयोग लगेच करावा लागेल अशी आशा वाटत नाही.

पावसाच्या शोधात चाललेल्या आमच्या मॉन्सून एक्स्प्रेसचा पुढचा पडाव असतो कोची. भारताचं पश्चिम जगताशी असलेल्या पुराणसंबंधांचा साक्षीदार असलेलं पश्चिम किना-यावरचं व्यापारी बंदर. त्याच्या आणि त्याच्यासारख्या अनेक व्यापारी बंदरांच्या अस्तित्वाचं कारणही मुळात मॉन्सूनच. मॉन्सूनच्या वा-यांना धरूनच युरोप-आफ़्रिकेतले व्यापारी भारताच्या किना-याकडे आले. म्हणता असंही येईल की मॉन्सूनच्या वा-यांच्या दिशेला धरून भारताचा शोध पश्चिमजगताला लागला. केरळच्या मसाल्यांच्या चवीवर ग्रीक-रोमन-पोर्तुगिज-ब्रिटिश भाळलेआणि स्पाईस रूटचं महत्वाचं केंद्र बनलं केरळ. भारतासाठी ते पहिलं जागतिकीकरण होतं. आणि या जागतिकीकरणाच्या पहिल्या साक्षीदारांपैकी एक होतं कोची. म्हणून तिथं जाऊन पहायचं होतं की यंदाच्या मॊन्सूनच्या वा-यांनी तिथं तरी पाऊस आणलाय की नाहीकाय हा मसाल्यांचा व्यापार अजूनही पावसावर आधारलाय काका स्पाईस रूटची चव आता पावसावर फ़ारशी अवलंबून नाही?

कोचीजुनं कोची किंवा कोची फ़ोर्टहे फ़ारच टुमदार शहर आहे. हेरिटेज म्हणून घोषित असल्यानं तेच जुनं आर्किटेक्चर अजूनही जपलं गेलंय. ती लाकडी खांबांचीउतरत्या कौलांची घरंत्या घरांच्या लांबच्या लांब गल्ल्यागल्ल्या कसले बोळच तेत्या घरांच्य मधे मधे असलेली मसाल्यांची प्रशस्त गोडाऊन्स. त्या बोळांतून फ़िरतांनासुद्धा आल्याचामिरपूडीचावेलचीचा वास असा नाकातून थेट घशात जातोठ्सका लागतो. आणि त्या मसाल्यांच्या वासात मिसळलेला अत्तरांचा वास ही एक जुन्या कोचीची खासियत. खूप सारी अत्तरांची दुकानं या बोळांमध्ये आहेत. आणि एक गंमत सांगूइथला बहुतांश अत्तरांचा व्यापार हा मराठी माणसांनी चालवलाय. शंभर दीडशे वर्षांपूर्वी व्यापाराच्या निमित्ताने महाराष्ट्रातूनविषेशत: कोकणातूनआलेली बरीच मराठी मंडळी इथेच स्थायिक झाली. कोचीतच अशी तीसहून अधिक मराठी कुटुंबं आहेत जी आता इथलीच बनून गेली आहेत. त्यातलेच प्रकाश देव मला कोचीत ओळख झालेली पहिलीच व्यक्ती. त्यांचाही इथे अत्तराचा व्यापार आहे. जेव्हा राजापूर-कोची असा समुद्री व्यापाराचा वर्दळीचा मार्ग होता तेव्हा त्यांचे पूर्वज कोचीला आले आणि इकडचेच बनून गेले. पण प्रकाशरावांचा जन्म जरी कोचीचा तरी मराठी उत्तम बोलतात. इथल्या महाराष्ट्र मंडळाचे ते सचिव आहेत आणि सर्वात एक्टिव्ह मेंबर. घरात सगळेच मराठी बोलतात. इतकच कायकोचीच्या राजघराण्यातल्या असलेल्या त्यांच्या पत्नीही आता मराठीच बोलतात.

आम्ही केरळचा पाऊस पहायला आलोयत्याच्याबरोबर प्रवास करणार आहोत हे नेहमीचे प्रवचन केल्यावर म्हणाले,
"मग कोचीला आलात हे उत्तम केलेत. कोचीचा पाऊस म्हणजे घागरीतून बदाबदा पाणी ओतल्यासारखा पाऊस."
"मग आहे कुठे तो? " मी विचारले.
"यंदा मात्र अडलाय कुठेतरी. फ़ारच उशीर झालाय."

पाऊस हा आता आमची दुखरी नस झाला जसा काही. घागरीसारखा कोसळणारा पाऊस आता शिंपडल्यासारखा पडायलाही तयार नव्हता. प्रकाश देवच मग आम्हाला मसाल्याच्या व्यापा-यांकडे घेऊन गेले. आम्ही राजकुमार गुप्तांकडे गेलो. जसे मराठी लोक अत्तरांच्या व्यापारात आहेत ,तसा हा कोट्यावधी डोलर्सचा मसाल्यांचा व्यापार पिढ्यान पिढ्या गुजराती-मारवाडी समाजाने चालवला आहे. गुप्तांच्या गेल्या तीन पिढ्या या व्यवसायात आहेत. त्यांच्यबरोबरच आम्ही मसाल्यांच्या गोडाऊन्समध्ये गेलो. पावसाची चाहूल लागून ती गोडाऊन्स ताडपत्र्यांनी शाकारली होती. कच्च्या मसाल्यांच्या त्या तिखट वासाबरोबर एक ओलसरपणाचाही दर्प जोडीला होता. बारीक सरी कधी येऊन गेल्या असतील.

"पूर्वी असेलपण आता किमान व्यापार तरी पावसावर अवलंबून नाही. पूर्वी जहाजांच्या प्रवासवर परिंणाम व्हायचाआता तसे काही नाही. आलेले मसाले प्रिझर्व्ह करण्यासाठी सुद्धा आता सोय आहे. पण यंदा वर घाटांमध्येही पाऊस नाही. त्यामुळे उत्पादनच कमी होण्याची चिंता आहे. तुम्ही खरं वर घाटात जाऊन शेती पाहून यायला हवं".

राजकुमारांनी मला आवर्जून बजावलं. आम्ही त्यांच्या बंदरातल्या जेट्टीवरच बोलत उभे होतो. मागे बंदरात येणारी मोठमोठी व्यापारी जहाजे दिसत होती. बोलता बोलता साधारण दहाएक मिनीटांत अचानक भरून आलं. सूर्य काही मिनीटांपूर्वी इथे होता की नव्हता हे विचारण्याइतपत अंधारून आलं. आणि त्याला काही प्रतिक्रिया देण्याअगोदरच धो धो पाऊस कोसळायला लागला. बघता बघता मागची जहाजं आणि बंदर पुसून टाकल्यासारखं दिसेनासं झालं. आख्खं कोची बंदर पावसात बुडून गेलं. गुप्ता म्हणालेहा यंदा मी इथं बंदरात बसून पाहिलेला पहिला मोठा पाऊस आहे. तो खरंच इतका धोद्या होता की देवांची घागरीची उपमा मनोमन पटली. आणि मुख्य म्हणजे ती उगाच एखादी चुकार सर नव्हती. त्यानंतर किमान तास-दीड तास तो पाऊस तसाच लागून राहिला. वाटलंझाला बहुतेक एकदाचा तो मॊन्सून सक्रीय. घाईघाईने ऒफ़िसला फ़ोन केलाम्हटलं आला बहुतेक पाऊस पुन्हा फ़ॊर्मात. लगेच लाईव्ह करू. पण तेव्हा दिल्लीत राष्ट्रपती निवडणूकीच्या राजकारणाचे फ़ासे पडायला सुरुवात झाली होतीआणि निराश केलेला पाऊस मागे पडला होता. त्यादिवशी नंतरही पाऊस कोचीमध्ये लागून राहिला. रात्रभर चालू राहिला. त्या आवाजातच मी पेरियारच्या डोंगरराजीतल्या मसाल्याच्या शेतीत काय पहायचे याचा प्लान करत राहिलो.




दुस-या दिवशी पहाटे पहाटे थेक्कडीला जाण्यासाठी निघालो तेव्हा कोचीत पाऊस कोसळतच होता. हायसं वाटलं. म्हटलंइथे आता इतका जोरात पाऊस सुरु झालात तर वरती घाटात विचारायलाच नको. पण मनातले मांडे मनात म्हणातात ते तसं झालं. घाटाला गाडी लागून जंगलातून प्रवास सुरु झालादमटपणा जाऊन थंडी वाजायला लागलीथोड्याच वेळात आम्ही ढगांमधून प्रवास करायला लागलोपण पावसाचा एकही थेंव अंगावर पडेना. इथे पाऊस थोडाफ़ार पडून गेला असणारकारण हिरव्याकंच जंगलात दुसरा म्हणून रंग डोळ्यांना दिसत नव्हता. अधूनमधून छोटे धबधबे दिसत होते. डोंगराच्या टोकांवर ढगच ढग होते. पण बरसत मात्र नव्हते. मुन्नार चा मार्ग न पकडता आम्ही थेक्कडीचा रस्ता पकडला. मध्येच रबराची शेती दिसत होतीमध्ये कुठे डोंगरउताराने चहाचे मळेही दिसत होते. नुसत्या कुंद वातावरणात आम्ही थेक्कडीला पोहोचलो. मनु अब्राहम भेटला. त्याचा संदर्भ कोचीहूनच मिळाला होता. तो मसाल्यांचा शेतकरी नव्हतापण एक छोटा व्यापारी होता. आमचं येण्याचं प्रयोजन सांगितलं. पावसाबरोबरच्या प्रवासाची टेप पुन्हा वाजवली.

"तुम पूना से कायको आया हमारा बारीश भगाने के लिये?" मनूने हसत हसत त्याच्या तो टिपिकल मल्ल्याळी हेल काढत पहिलाच वार माझ्यावर केला.

म्हणजे इकडेही पावसाची बोंबच होती तर. खरं तर उभं राहू देणार नाही असा पाऊस इथे होतोपण यंदा घोडं कुठं अडलंय समजत नाहीमनू म्हणाला. इथं मसाल्याची शेतच शेतं आहेत थेक्कडीला. कोणी प्रत्येक मसाल्याची वेगवेगळी शेती नाही करतआता बहुतेक सारे इंटिग्रेटेड फ़ार्मिंगच करतातम्हणजे एकाच शेतात दालचिनीवेलचीलवंगमिरं आणि कॊफ़ीसुद्धा. मनूच्या मित्रांची काही शेतं आम्ही फ़िरलो. अगदी शेती वाया जाण्याइतपत काही परिस्थिती नव्हती. भातासारखा नाहीपण काही ठराविक पाऊस या मसाल्यांच्या शेतीला लागतोच. आणि यंदा अजून तो झाला नव्हता. भरून आलेलं आभाळ सांगत होतं की तो येणार आहेपण कधी हे समजत नव्हतं. झाडाच्या वेगवेगळ्या अवयवांचे हे मसाले असतात. कोणी मूळं असतातकोणी खोडकोणी पान अन कोणी अजून काय. हे सगळे झाडापासून तोडून नंतर वेगळे वाळवलेही जातातपण ते झाडावरच वाळून चालत नाहीतआणि यांना भीती ही होती की अजूनही पाऊस नाही आला तर झाडं वाळून जातीलत्यांच्या डोळ्यातली चिंता आमच्या डोळ्यात साठवून आम्ही पुन्हा घाट उतरायला लागलोपुन्हा समुद्राकडे. केरळचे दोन शेतकरी आम्हाला भेटले होतेएक समुद्रसपाटीखालचाजो म्हणत होता उशीरही चालेल. एक सर्वात उंचावरचाजो आसुसलेला होता. पाऊस सगळ्यांसाठी वेगळा,.

घाट उतरून पुन्हा समुद्राला भिडलो. आश्चर्य म्हणजे कोचीनंतर सुटलेला पाऊस इथे पुन्हा भेटला. बहुतेक आता हा किना-याला सोडत नाहीमला वाटलं. जरा फ़ोनाफ़ोनी केल्यावर समजलं की गोव्यातही तो कोसळतोय. म्हटलंआता ठरलंजर किना-यानं तो सगळीकडे आहे तर किना-यानंच आता वर सरकलं पाहिजे. कालिकत गाठलं. वास्को-द-गामाला इथे पोहोचल्यावर झाला नसेल इतका आनंद मला तिथे पोहोचल्यावर झाला. पाऊस समुद्राला आणि समुद्र पावसाला सॊडायला तयार नव्हता. आता विजिंगम बंदरावर भेटलेल्या त्या केरळी मच्छिमारांचं गणित थोडं उशीरानं का होईना पण सुरु होणार होतं. पुढचे ४५ दिवस ते समुद्रात जाणार नव्हते. आणि त्या ४५ दिवसांनंतर आत गेल्यावर समुद्र त्यांना मोठा कॆच देणार होता. केरळच्या पावसात इथल्या जुन्या आयुर्वेदिक पद्धतीने खास मॉन्सून थेरपीचा उपचार कमी करायला आलेल्या युरोपिय पर्यटकांचा जीव भांड्यात पडणार होता. त्यांचा या काळात उफ़ाळून आलेला वात आता शांत होणार होता. त्रिचूरच्या केरळ कलामंडलममध्ये गुरुकुल पद्धतीने कथकली शिकणा-या विद्यार्थ्यांना आता रोज पहाटे पहाटे खास मसाज होणार होता. पावसाळ्यात पहाटेच्या थंडीत स्नायू आखडतात आणि ते लवचिक नाही राहिले तर त्यांच्या अभिनयातील वापरावर दूरगामी परिंणाम होतात. त्यामुळे कथकलीचा विशेष वर्ग आता सुरु होऊ शकणार होता.

पहाटे कालिकत धो धो पावसात सोडलं होतं. कन्नूर पावसात होतं. मंगलोरला कर्नाटकात शिरलो. जणू माझ्या वेगाशी पावसानंही स्पर्धा लावली होती. कारण तिथेही तो अगोदर पोहोचला होता. उडपीला पोहोचलो. म्हटलं जरा वर घाटत चढून पाहूया परिस्थिती काय आहे ते. घाट चढून वर आगुम्ब्यात पोहोचलो. आगुम्बे रेनफ़ोरेस्ट आहे. इतका पाऊस असतोकी त्याला चेरापुंजी ऒफ़ द वेस्ट म्हटलं जातं. पण बहुतेक घाटावर पाऊस अजून रुसलेलाच होता. ढग होतेपण पाऊस नव्हता. भारतातलं किंग कोब्राचं हे जंगल पावसाची वाट पहात शांत उभं होतं. पुन्हा घाट उतरलोसमुद्राचा हात धरून कारवारमध्ये शिरलो. रस्ता वाहून जाईल की काय अशी भिती वाटावी असा पाऊस होता. गोवा तर पूर्ण भरून गेला होता. सावंतवाडीतून वर पाहिलंतर आंबोलीही ढगात होतंमग पाऊस असणारच. म्हटलंचलाआमची मॉन्सून एक्स्प्रेस समुद्रकिना-यानं का होईना पण महाराष्ट्राशी पाऊस घेऊन आली. आंबोलीतून पावसात वर आलोतर कोल्हापूर कोरडं होतं. रात्रीच्या प्रवासात फ़क्त साता-याला पाऊस लागलातो नंतर थेट पुण्यालाच भेटला. शनिवार संपला होता. दुस-या दिवशी रविवारी अखंड पाऊस कोसळत होता. ज्या रस्त्यानं आलो होतोतिथं सगळीकडे विचारलं. पाऊस कोसळत होता. खूष झालो. वाटलं, आता सगळीकडे सुरु झालाआता मात्र लागून राहिला.

पण जे त्याने अगोदर शिकवलंतेच शेवटच्या दोन दिवसाच्या शिडकाव्यानं मी विसरून गेलो होतो. अनिश्चितता. हा तर त्याचा नियमत्याचा धर्म. अमूक एका वेळेस तो इथे असेलचइथे असेल म्हणून दुसरीकडे असेलच असे नाही. इतका पडेलतितका पडेल हेही नाही. त्याची सोय तो पाहणार आणि आपण आपल्या सोयीनं अपेक्षा करत बसणार. पण अनिश्चिततेचा नियम तो नाही तोडणार. सोमवारपासून तो गायब झाला. कधी आला होता की नव्हता अशी शंका येण्याइतपत पसार झाला. दुष्काळाच्या भीतीने पुन्हा तोंड वर काढलं होतं. माझे चार हजार किलोमीटर झाले होते. आणि आता पावसाच्या अनिश्चिततेचा नियम घोकण्यासाठी अजून चार हजार किलोमीटर जावं लागणार होतं. आता उतरेकडेकालिदासाच्या मेघदूताच्या मार्गावर.
-------------------------------------------------------------------