Tuesday, November 30, 2010

बिहारवर लक्ष असायला हवं...

.

"तपशीलाला महासिद्धांताचे रूप देण्य़ाची ताकद माझ्याकडे नाही : ग्रेस"


१.एक.

पाटण्याला उतरल्याच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या कार्यालयात ’पंजाब केसरी’चे एक जुने, वरिष्ठ पत्रकार भेटले. बिहारचा माहौल या निवडणूकीत कसा आहे हे पहात हिंडायचंय असं सांगितलं तर म्हणाले, "नितीस जो है ना, बिहार का चंद्राबाबू नायडू बनेगा यह दिमाग मे रखकर घुमना. सुनना मेरी बात..."
संदर्भ होता चंद्राबाबूंच्या प्रगतीच्या गप्पा शहरापर्यंतच मर्यादित राहिल्या आणि आंध्र प्रदेशातून त्यांचा सुपडा साफ़ झाला होता, त्याचा.
ऎकून घेतलं आणि निघालो.
पुढचे पंधरा दिवस मला चंद्राबाबूही आठवले नाहीत आणि त्यांची आठवण करून देणारेही.
२४ तारखेला निकाल येणं सुरु झालं, नितीश कुमारांची गाडी सुसाट पळायला लागली आणि मग मी या महाशयांना फ़ोन लावला. ’अब आपका क्या कहना है?’ या प्रश्नावर ते निरूत्तर होते.
त्यांचं मत चुकलं होतं, पण बिहारचं ते कधीच चुकणार नव्हतं.

२.दोन.

२४ तारखेला नितीश जिंकले आणि अनेकांनी बिहार जातीय राजकारणाच्या दलदलीतून बाहेर आला म्हटलं. शेकडों वर्षांचा हा जातीय विद्वेष असा पाचएक वर्षांत संपतो असं कोणीही म्हणू शकणार नाही. मग असं काय घडलं की कायम आपल्या जातीच्या ’कर्मठ’ उमेदवारालाच ’मान-सम्मान’ राखणा-या बिहारींनी (हे ’कर्मठ’ आणि ’मान-सम्मान’ शब्द वापरल्याशिवाय इकडे निवडणूकीच्या जाहिराती पूर्णच होत नाहीत.), जातीपलीकडे जाऊन मतदान केलं? त्यांच्या रोजच्या आयुष्यातलंच काही तरी बदललं असणार, तेव्हाच ते जाती विसरलेत.
  
"क्या शाम छह बजे के बाद हमारी मां-बहनें घर से बाहर निकल सकती थी?"

नितीश कुमारांचं कोणत्याही सभेतलं हे सुरुवातीचं वाक्यच समोरच्या त्या हजारो बिहारींचा ताबा मिळवायला पुरेसं असायचं. त्यांना फ़ार काही पुढं बोलायचीच गरज उरायची नाही. एका़च वेळेस भूतकाळ आणि वर्तमानकाळाची आठवण करून द्यायची आणि त्याच वेळेस भविष्याचा खुंटा हलवून बळकट करायचा. जरी बिहार इतका मागास, भुकेला प्रदेश आहे आपण म्हणतो, पण जेव्हा अन्न, वस्त्र, निवारा यापेक्षाही ’भयमुक्तता’ हीच जेव्हा जगण्यासाठीची पहिली गरज बनते तेव्हा नितीश जिंकतात.

’सहा़च्या आत घरात नव्हे, तर सहानंतरही घराबाहेर’ हीच नितीशकुमारांची या निवडणूकीची कॆचलाईन होती. आणि परिस्थिती होतीच खरं तशी. अराजकाचे ते व्रण अजून पुरते पुसलेही गेले नाहीयेत म्हणूनच अगदी गयापासून ते वाल्मिकीनगर, म्हणजे पूर्व चंपारण्याच्या नेपाळ सीमेपर्यंत, ज्या कुणा व्यक्तीला भेटलो आणि विचारलं की पहिलं वाक्य हेच की ’अब तो पूरा माहौल बदल गया है. अंधेरा  होने के बाद गांव मे सन्नाटा हो जाता था. अब कोई दिक्कत नही.’ जात, उपजात, धर्म, पक्ष गट कोणतेही असोत, प्रत्येक जण या बदलावर ठाम होता. बिहार मोकळा श्वास घेत होता.

हे सारे लोक भयमुक्तेतेच्या मुद्द्यावर इतके भावनिक होताहेत तर खरंच पूर्वी, म्हणजे पाच वर्षांपूर्वी, काय परिस्थिती असेल, हा प्रश्न कायम पडायचा फ़िरतांना. आणि त्यांनी सहन केलं कसं असेल? सिवान माझ्यासाठी डोळे उघडणारी भेट होती. शहाबुद्दिनच्या त्या इलाक्यात लोकांकडून जे ऎकलं ते प्रत्यक्षात होतं यावर विश्वास ठेवायला मी बराच काळ तयारच नव्हतो. पण ते तसंच होतं. आणि हे सोसण्याची सहनशीलता होती म्हणूनच नितीश कुमारांचं महत्व त्यांना पटलं. सिवानमध्ये शहाबुद्दीनचं साम्राज्य तर कुठं आनंद मोहनचं, कुठं पप्पू यादवचं, कुठं साधू यादवचं, कुठं मुन्ना शुक्लाचं साम्राज्य बोकाळलं होतं. यादी वाढत जाते आणि आपल्याला नावं लक्षात नाही रहात. पण नितीश कुमारांनी ही दहशत, ही साम्राज्य पद्धतशीरपणे कापून काढली. या सगळ्यांना तुरूंगात डांबलं. जलदगती न्यायालयं बसवली. तुरूंगातून न्यायालयात नेतांनाही बाहेरची हवा मिळू नये म्हणून न्यायालयं तुरूंगाच्या आवारात बसवली. या सगळ्या माजलेल्या बाहुबलींवर मनुष्यहत्येच्या अनेक गुन्ह्यांसह कित्येक केसेस गुदरल्या. इतक्या की आता त्यांचं आयुष्यच तुरूंगात जाईल. लोकांच्या मनातली भीती काढण्यासाठी पोलिसांना मुक्त वाव दिला. पन्नास हजारहून अधिक गुंड बिहारच्या तुरूंगांत डांबले गेले आहेत. जे वाचले ते ’भगौडे’ झाले. दहशतीच्या ओरबडीच्या पंधरा वर्षांच्या खुणा होत्या, त्यांचं भय पोलिसांना ओरबाडूनच काढावं लागलं. भय ओरबाडून काढण्याच्या पद्धती कदाचित मानवी अधिकार पुस्तकांत बसणार नाहीत. पण जशास तसे वागून नितीश कुमारांनी बिहारी जनतेला दिलेला शब्द पाळला होता.

साधु यादव गोपाळगंज मधून पडला. सिवानमधून राजदचा उमेदवार पडला. पूर्वी खासदार असलेली, बाहुबली आनंद मोहनची पत्नी लव्हली आनंद आलमनगरमधून पडली. पप्पू यादवची पत्नी रंजित रंजन, या बाईही पूर्वी खासदार होत्या, बिहारगंज मधून पडल्या. असे अनेक बाहुबली किंवा तुरूंगात असलेल्या ’बाहुबली’ पतींच्या बाहुल्या, दणकून पडल्या. (पण मुन्ना शुक्ला ची पत्नी, अनू शुक्ला, जेडीयूच्या तिकीटावर लालगंजमधून निवडून आली. मुन्ना शुक्ला सध्या बिहारच्या एका मंत्र्यांच्या हत्येच्या आरोपावरून तुरूंगात आहे.) म्हणायचं हे आहे, की दहशतीतून बाहेर येणा-या बिहारी जनतेला आता या गुंडांची सावलीही नको होती.

सिवानमध्ये मला वाटलं होतं, की पिचलेपणाचा तळ समाजानं गाठला की त्यावर दहशतीचा कळस चढवायला वेळ लागत नाही. पण पिचलेपणाच्या त्या तळापासून मुक्तीचा एक किरण जरी दिसला तरीही त्याकडे झेप घेणा-या त्या समाजाच्या वेगाशी कोणालाही स्पर्धा करता येत नाही. नितीशनी तो किरण दाखवला, म्हणून जातीय विद्वेष मागे पडण्याचा वेगही वाढला.


३.तीन 

दोन्ही बाजूला नजर पोहोचेपर्यंत हिरवीगार शेती पसरली आहे आणि मधून अगदी नुकताच झालेला काळाभोर टाररोड धावतोय. दोन गावांना, किंवा दोन वाड्यांना जोडणारा. आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात पन्नास एक शाळकरी मुलं-मुली, टापटीप गणवेश घालून, काही ठिकाणी टाय सुद्धा घालून, एका रांगेत रस्त्याकडेनं पाठीला दप्तर अडकवून शाळेकडे चालली आहेत. पाचवी-सहावी नंतरच्या मुली सायकल चालवत एका ओळीत शाळेकडे निघाल्या आहेत. गणवेशही सारखे आणि सायकलचा रंगही सारखा, सगळ्यांचा.

बिहारची अनेक दृष्य आठवणीत अगदी पक्की राहतील. पण हे दृशष्य मात्र विसरणार नाही, जे सगळीकडे दिसलं. पंधराएक दिवस बिहारमध्ये फ़िरलो, आठ जिल्हे हिंडलो. पण रोज सकाळी उठून पुढच्या मुक्कामाला निघालो की रस्त्यात या ’स्कूल चले हम’ रांगा दिसल्या नाहीत असा एकही दिवस गेला नाही. एका गावातून शेजारच्या ज्या गावात शाळा आहे तिथे हसत हसत चाललेले हे तांडे. एस टी बस, सिक्स सीटर वगैरे प्रकार इथे नाही, आणि शाळेत जाऊन सोडायला बहुतेकांच्या वडलांकडे गाड्या नाहीत. मग काय, एकमेकांचे हात धरून तांडे निघाले. पाचवीनंतरच्या प्रत्येक मुलीकडे मात्र सायकल. याच त्या प्रासिद्ध ’नितीशच्या सायकली’. मला वाटणारं नितीश कुमारांच्या विजयाचं दुसरं महत्वाचं कारण.

जात विसरायला लावेल असं बिहारींच्या रोजच्या जगण्याशी संबंधित जर काही नितीश कुमारांनी केलं असेल तर लाखभर शाळा सुरु केल्या आणि मुलींनी शाळेत यायला हवं म्हणून पंचवीस लाख सायकल्स मोफ़त दिल्या. चालत नका येऊ, सायकल घ्या, पण शाळेत याच. परिणाम होणारच ना, नाही कसा? घरातली एक मुलगी रोज शाळेत जायला लागली तर मतदार आई-वडीलांवर परिणाम होणारच ना. त्यांची पहिली अडचण तर नितीशनी अगोदरच सोडवली होती ती म्हणजे सुरक्षिततेची. अपहरण इंडस्ट्री कापली गेली होती. मुली केव्हाही, कोणत्याही वेळी मैत्रिणींबरोबर बाहेर पडायला घाबरत नव्हत्या आणि आई-वडीलही निशं:क होते. दिमतीला नितीशची सायकल होती. अजून काय लागतं हो? आता सांगा, प्रत्येक घराचा या मूलभूत बदलाशी संबंध आला म्हणतांना केवळ जातीवर आधारलेली व्होट बॆंक कशी आणि का नाही तुटणार? मला तरी विजयाच्या किचकट राजकीय विश्लेषणापेक्षा ’नितीश की सायकल’च जास्त सोपं आणि पटणारं उत्तर वाटतं. तुम्हाला नाही हे पटत?


पूर्व चंपारण्याच्या मोतिहारीमध्ये चहा एका टपरीवरच्या गप्पांचा फ़ड रंगला होता. निवडणूकांपेक्षा दुसरा विषय काय असणार? एक गट नितीशच्या बाजूचा, दुसरा लालूंच्या. विषय होता नितीशनी शाळा सुरु केल्या ख-या पण त्यात शिक्षणसेवकांची भरती करतांना दाबून पैसा खाल्ला, हा आरोप होता. तसं तथ्यही होतं त्यात. कारण बिहारमध्ये झालं असं की एक लाखावर शाळा सुरु झाल्या. पण त्या त्या गावात हे शिक्षक भरायचे अधिकार मुखियांकडे दिले गेले. आता मुखिया हे कॆरेक्टर तसं आत्तापर्यंत अधिकारविरहित होतं, पण आता शेफ़ारलं. पैसे खाऊन शाळेत भरती व्हायला लागली. एकाच्या पुतण्याला चांगले मार्क्स होते आणि त्यालाही शहरात ओझी उचलण्यापेक्षा गावच्या शाळेत शिकवायचं होतं. पण हात गरम करायला पैसे नाहीत म्हणून त्याला काही नोकरी मिळाली नाही. त्याचा हा काका म्हणून उचकला होता आणि नितीशना शिव्या घालत होता.

हा विरोधाभास मात्र इथे आहे. बाबूगिरीनं भ्रष्टाचार वाढवला. नितीशनाही त्याची जाण आहे, नाही असं नाही. पण त्याला उत्तर द्यायची त्यांची एक स्टाईल आहे. त्यांनी बिहारमध्ये पहिल्यांदाच एक अभिनव कायदा आणायचा ठरवलंय. विधानसभेत मंजूरही झालाय, दिल्लीच्या हिरव्या कंदीलाची वाट पाहताहेत. हा कायदा असं म्हणतो की कोणीही सरकारी अधिकारी, भले तो आय ए एस असो, वा आय पी एस, पैसे खातांना पकडला गेला की त्याची सारी संपत्ती जप्त करून सरकारदप्तरी जमा. या बद्दल स्वत: नितीश सध्या खूप बोलताहेत. तो प्रत्यक्षात आला तर बिहार भारतातंल असं पहिलं राज्य ठरेल. या कायद्याचा मुद्दा त्यांनी निवडणूकीत खूप पिटला. कोणतीही पत्रकार परिषद असो वा सभा त्यांचं एक वाक्य पक्कं ठरलेलं असायचं,

"मै तो उस दिन की राह देख रहा हूं की किसी बडे अधिकारी को घूस लेते पकडा जाए... चौबीस घंटे के अंदर उसकी सारी संपत्ती की निलामी की जाए...और मैं उस सारे पैसे से लडकीयों के लिए एक स्कूल खुलवा दूं...."

हे वाक्य प्रत्येक वेळेस करायचा तो योग्य परिणाम करत होतं.

४.चार

बिहारचे निकाल आले आणि बेधडकपणे जवळपास प्रत्येक विश्लेषणात हे म्हटलं जाऊ लागलं की जातीच्या शृंखला तुटल्या, जातीय दलदलीतून बिहार बाहेर आला, विकासाच्या राजकारणासमोर जातीय राजकारण संपलं वगैरे. कोणी तरी म्हणालं की ’मंडल राजकारणा’चा दौर नितीशच्या या विजयाबरोबर संपला. खरंच असं झालं असेल? शेकडो वर्षांची मुळं अशी सहज कशी उपटली जातील? हां, तत्कालिन काही कारणं या विजयासाठी कारणीभूत नक्कीच ठरली असतील. पण या सरसकट विधानांबद्दलचे प्रश्न माझ्या मनातही आहेत. बिहारच्या जातीय राजकारणाबद्दल ऎकलं होतं, वाचलं होतं. काही दिवस तिकडं जाऊन आल्यावर आणि तेही निवडणूकांच्या काळात, हे प्रश्न अधिकच गडद झालेत. पंधरा दिवसांच्या निरिक्षणावर तिथल्या या निवडणूकीतल्या जातीय समीकरणांवर मी काही म्हणावं, हे काही पटत नाहीये. या विषयासाठी अजून खूप लोकांना भेटायला लागणार, खूप फ़िरायला लागणार. फ़क्त काही निरिक्षणं नोंदवतोय.

पण एक नक्की की जातीय राजकारणात नितीशही काही कमी लेचेपेचे नाहीत. नाहीतर तीन टक्के कुर्मी समाजातून आलेल्या या नेत्याला अशी संपूर्ण सत्ता मिळालीच नसती. तिकडच्या ब-याच लोकांनी एका गोष्टीकडे बोट कायम दाखवलं, ते तुमच्याही नजरेस आणून दिलं पाहिजे. नितीशनीसुद्धा अगदी प्रयत्नपूर्वक सोशल इंजिनिअरींग केलं ते म्हणजे इथल्या दलित महादलितांची मोट बांधून. या गटातल्या बहुतेक जाती एक टक्क्यांपेक्षा कमी आहेत. एकूण मिळून सोळा टक्क्यांच्या आसपास. यांना आरक्षण देऊन त्यांनी लालूंच्या अढळ बारा टक्के यादव व्होट बॆंकेला थेट आव्हान दिलं. आणि दुसरं म्हणजे महिलांना पंचायत राज्य संस्थांमध्ये त्यांनी थेट ५० टक्के आरक्षण दिलं. कायम अत्याचार सहन करत घरकामं नाहीतर शेतमजूरी करणारी बाई सरळ सरपंच झाली, आणि पिछडा जातीतलीसुद्धा. नितीश कुमारांच्या या डावामुळे सारी जातीय समीकरणंच बदलली. रामविलास पासवानांसारख्या दलित राजकारण करणा-या नेत्याचीही गोची झाली. या सोशल इंजिनियरींगची गोड फ़ळं त्यांनी २००९ च्या लोकसभा निवडणूकीतही चाखायला मिळाली होती, तिच चाल आताही यशस्वी झाली.

दुसरीकडे बारा टक्के मुस्लिम हा कायम लालूंचा मतदार होता. पण आता विकासाच्या राजकारणाबरोबरच सर्वसमावेशक धोरणाच्या नितीश कुमारांच्या मेसेजमुळे त्यांच्याकडे आलेला दिसतोय. अर्थात लालूकाळातल्या अराजकाचे चटके त्यालाही मिळाले होतेच. भाजपासारख्या हिंदुत्ववादी मित्राकडे बोट दाखवून, नरेंद्र मोदींचा बागुलबुवा दाखवून नितीश कुमारांची मुस्लिम रसद तोडायचेही प्रयत्न झाले., पण परिणाम तर झालेला दिसत नाहीये. राष्ट्रीय पातळीवर इतका इश्यू झालेला नरेंद्र मोदींच्या बिहारमध्ये प्रचाराला जाण्याचा मुद्दा नेमका किती प्रत्यक्ष मतदानावर परिणाम करणारा होता याबद्दल शंकाच आहे. कारण, भाजपाच्या जाहिरनाम्यात असाच एक मुद्दा होता. अडवाणींनी स्वत: बिहारमध्ये येऊन तो जाहिर केला होता. ’गो हत्या बंदी’ कायदा कणखरपणे राबविण्याचा. हा मुद्दा तर महाराष्ट्रातही नव्हता, पण बिहारात आणला. आता यावर मुस्लिमविरोधी गदारोळ उठणार, नितीश कुमारांची कोंडी होणार असं वातावरण तरी तयार झालं. निदान अनेक स्थानिक पत्रकारांना तरी तसं वाटलं. लालूंनी दुस-या दिवशीच्या सभांमध्ये मुस्लिमांना खेचण्यासाठी हा मुद्दा उचलला. सगळे वाट पहात होते की आता काय होणार. एक दिवस गेला, दुसराही गेला. काहीच झालं नाही. तिस-या दिवशी लालूंच्या भाषणातही हा मुद्दा आलाही नाही. नितीश एक चकार शब्दही त्यावर बोलले नाहीत.

कॊंग्रेसनं, विशेषत: स्वत: सोनिया गांधींनीही मुस्लिम हा कॊंग्रेसचा पारंपारिक उमेदवार म्हणून नितीश कुमारांच्या विरोधात एका मुद्द्यावर रान उठवण्याचा प्रयत्न केला. ’अलिगढ मुस्लिम विद्यापीठा’नं बिहार सरकारकडे शंभर एकर जागा मागितली कटिहारामध्ये त्यांची एक शाखा सुरू करण्यासाठी. नितीश सरकारनं ती दिली नाही. हे सरकार मुस्लिम विरोधी आहे, कॊंग्रेसनं राळ उठवली. कटिहाराच्या सोनियांच्या सभेत हा मुद्दा आल्यावर संध्याकाळी पाटण्यात नितीश कुमारांची पत्रकार परिष्द होती. अपेक्षेप्रमाणे प्रश्न आलाच.

"हम तो इस मुद्दे पर बोलनाही नही चाहते थे, मगर उन्होनं सवाल खडे कर दिये...हम तो अलिगढ यूनिवर्सिटी को दो सौ एकड जमीन दे रहें है...लेकिन हमने उनसे कहा की आप किशनगंज मे आईये...कटिहारामे तो सरकारने बहुतसे स्कूल खुलवा दिये है मगर ऎसा काम किशनगंज में नही हुआ है...तो हम चाहते है की इस यूनिवर्सिटी के साथ काम कर स्कूल भी बढा दिये जाए...अब कौन सुने हमारी बात?"

दुस-या दिवशीपासून हा मुद्दा रोज नितीश कुमारांच्या सभेत असायचा, तर कॊंग्रेसच्या सभेतून गायब. घर्मवादी राजकारणालाही विकासाचा चष्मा लावण्याचं हे नितीशचं कसब. यामुळे मुस्लिम लांब गेले असतील की जवळ आले असतील?

एकीकडे दलित-महादलित-पिछडे-अतिपिछडे-मुस्लिम यांना जवळ करतांना नितीश उच्चवर्णियांनाही नाराज करण्याचा धोका पत्करू शकत नव्हते. पण त्या प्रयत्नातला एक भाग म्हणून त्यांनी जे केलं ते पटण्यासारखं नाही, स्वत: नितीशना आणि अन्य कोणालाही. ते होतं बटाईदारी निर्मूलन, जमीन सुधार. जे ते करू शकले असते, पण करता आलं नाही.

५.पाच

बिहारला जायची पूर्वतयारी म्हणून अनिल अवचटांचं ’पूर्णिया’ वाचून गेलो होतो. साठीच्या दशकाच्या शेवटी अवचटांनी एस एम जोशींबरोबर केलेल्या बिहारच्या सर्वात मागास जिल्ह्याच्या, पूर्णियाच्या, अनुभवांवरचा हा रिपोर्ताज. बिहारातल्या बटाईदारी बद्दल, म्हणजे आपल्याकडची ’कुळं’, त्यात पहिल्यांदा वाचलं होतं. हजारो एकर शेतजमिनी उच्चवर्णियांच्या (भूमिहार, रजपूत, कायस्थ आणि ब्राम्हण). त्यावर पिढ्यान पिढ्या मजूरी करणारे हे मागास जातीतले बटाईदार. यांच्या नावावार जमिनीचा चतकोर तुकडाही नाही. तेव्हा, स्वातंत्र्यानंतर, विनोबांच्या भूदान चळवळीच्या काळात, जमीन सुधारणांच्या आंदोलनात पहिली मागणी हीच होती की या बटाईदारांचं किमान सरकारी रेकॊर्डवर नाव तर येऊ दे. जमिन मिळणं पुढची गोष्ट. हैराण करणारं वास्तव म्हणजे, आज पन्नास वर्षांनंतर, नितीश कुमारांच्या बिहारमध्येही, बटाईदारांची तिच पहिली मागणी कायम आहे. पण त्यावर कोणीही बोलत नाहीत, खुद्द नितीश सुद्धा.

"सर, बटाईदारी का मुद्दा अहम है...बंदोपाध्याय कमिटी की रिपोर्ट पर आपने कुछ नही किया है...ऎसा क्यों?"

जदयु च्या जाहिरनामा प्रकाशनाच्या वेळेस माझ्याबरोबर महाराष्ट्रातून आलेला एक सहकारी, अमोल, नितीश कुमारांना थेट विचारतो. दोन सेकंद पॊझ. आणि अचानक सभागृहातल्या सा-या पत्रकारांचा जोरदार हशा उठतो. ज्यात खुद्द नितीश कुमारही सामिल असतात. मिनीटाभराचं हसणं झाल्यावर नितीश विचारतात,
"बिहार के नही हो क्या? बाहर से आये हो?"
"हम महाराष्ट्र से आये है?" अमोल सांगतो.
"अच्छा. महाराष्ट्र से आये है. तो आपको कुछ मालूम नही. छोड दिजीये." नितीश समजावतात आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतात.

हसणारे स्थानिक पत्रकार आम्हाला ढोसत होते, विचारा. हाच प्रश्न विचारा. आम्ही इथे विचारू शकत नाही, तुम्ही विचारा. पण हे ’कुछ मालूम नसणं’ म्हणजे काय हे आम्हाला बिहारमध्ये असेपर्यंत तरी समजलं नाही. अनेकांनी हे मात्र सांगितलं की तो एक मुद्दा असा आहे की नितीश त्यावर काही बोलत नाही (आणि कदाचित त्यांना तो सलतोय.) जेव्हा ते पूर्ण बहुमतात सत्तेवर आले २००५ मध्ये तेव्हा त्यांनीच ’बंदोपाध्याय कमिशन’ नेमले बटाईदारी निर्मूलन अणि जमीन सुधारणेसाठी. २००८ मध्ये आयोगाने शिफ़ारशी केल्या, अर्थात जशा जमीन सुधारणा देशात इतरत्र झाल्या तशा त्या बिहारमध्ये व्हाव्यात यासाठीच तो प्रयत्न होता. पण अशा कोणत्याही सुधारणेला जातीव्यवस्थेचा जो करडा, हिंसक विरोध बिहारमध्ये आहे तसा तो इतर कुठेही नसेल. उच्चवर्णिय या जमिनी आपल्याकडून जाऊ देणार नाहीत म्हणजे नाहीत. (म्हणून ज्या बिहारमध्ये नक्षलवादी असतात, तिथेच रणवीर सेनाही असते.) बंदोपाध्याय आयोगाचा रिपोर्ट आला आणि हलकल्लोळ माजला. ’बटाईदारी बिल’ आता आलं, जमिनी वाटल्या जाणार अशा चर्चा सुरु झाल्या आणि उच्चवर्णीय आक्रमक झाले. सत्ताधारी सुद्धा यात विभागले गेले. जे इतके वर्षं घडलं नव्हतं ते आता कसं घडणार होतं? नितीशवर दबाव वाढला आणि त्यांनी उच्चवर्णिय व्होट बॆंक वाचविण्यासाठी असं कोणतही बटाईदारी बिल तयारच नसल्याचं सांगायला सुरूवात केली. नंतर तर त्यावर बोलणंच थांबवलं. त्यांच्या या कोलांटीउडीमुळे लल्लनसिंगांसारखे त्यांच्या सावलीसारखे असणारे मित्रही नितीशना सोडून गेले. या त्यांच्या घनिष्ठ मित्रानेच नितीशने बटाईदारी हटविण्यापासून पळ काढून विश्वासघात केला अशा जाहिराती निवडणूकांच्या वेळेस वर्तमानपत्रांत दिल्या. पण, अर्थात, नितीशच्या विजयावर याचा कोणताच परिणाम झाला नाहीत. परवा जिंकल्यावर त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांना हा प्रश्न (बहुतेक बिहारच्या बाहेरून आलेल्या पत्रकरानेच) विचारला गेला. उत्तर एका त्रोटक वाक्यात होतं, "हम तो कह रहे थे की ये मुद्दा ही नही था."

त्यांच्या या मौनानं उच्चवर्णीय जमीनदारांना आश्वस्त केलं होतं आणि या बाहुबलींनी नितीशना त्यांच्या मतांनी. वैश्य समाजाची उच्चवर्णीय मतं सुशील मोदींचा भाजपा कायमच आपल्या खिशात ठेवतो, उरलेल्यांची सोय नितीशनी केली.


६.सहा

रात्री अकराला सिवानमध्ये ट्रेनमध्ये चढून दीडच्या सुमारास आम्ही हाजीपूर स्टेशनवर उतरलो. दिवसा असतो तसाच गजबजाट होता. हे पूर्वीचं असुरक्षित बिहार नाही हे पटलं असलं तरीही शंकेखोर नजर भिरभिरत होतीच अविश्वासानं, की कोणी येऊन लूटपाट तर करणार नाही ना म्हणून. गंगा ओलांडून पलिकडे पाटण्यात जायचं होतं. बाहेर आलो, टेक्सी विचारली, हजार रूपये म्हणाला. शक्यच नव्हतं. चार जण मावतील अशा डिझेल रिक्षा होत्या बाजूला.
"पटना जाना है. मारवाडी निवास. कितना लोगे?"
"पांचसौ." खाटकन उत्तर आलं
"काय वेडं समजतात काय आपल्याला?" मी मराठीत मित्राला वैतागून म्हणालो. आम्हाला फ़क्त १२ किलोमीटर जायचं होतं.
मित्र काही बोलणार तितक्यात त्या गर्दीनं आवाज आला.
"आमाला पन डोकं आसतं साहेब. आमी काय येडे नाय..."
च्यामारी. या बिहारी गदारोळात हे मराठी कोण बोललं? आम्ही सगळेच शोधायला लागलो. ज्या रिक्षाची आम्ही चौकशी करत होतो, त्याच्या ड्रायव्हर सिटवर एक इसम डोकं ठेवून झोपला होता. आता तो उठला होता.
"ढाईसौ द्या. चला."
तो मराठीत बोलला काय आणि आम्ही चटकन रिक्षात बसलो काय.
"मराठी कसं कसं येतं तुम्हाला?"
"लोनावला में था छह साल. स्क्रीन प्रिंटिंग. वही सिखा मराठी."
या मराठी बिहारीनं आम्हाला त्या रात्री अडिचशेत पाटण्याला सोडलं, जिथं कोणीही आम्हाला सहज गंडवू शकलं असतं.    

पण हे मराठी बिहारी इथे जागोजाग भेटतात. मला तर वाटायला लागलं की आपल्याकडे नाही का ते तसले ’ यूएस रिटर्न्ड’ असतात तसे इकडे ’पुणे रिटर्न्ड’ ’बम्बई रिटर्न्ड’ असतात. ते खरं क्वालिफ़िकेशन. सिवानचा एक वेटर होता हॊटेलचा. आम्ही पुण्याचे आहोत म्हटल्यावर फ़ारच आपुलकीनं जेवू खाऊ घालू लागला. का रे बाबा असं, मी एकदा विचारलं. तर म्हणाला की चारएक वर्षं पुण्यात होता हडपसरमध्ये एका हॊटेलात. त्यामुळे पुण्याबद्दल आपुलकी.

पाटण्यात तर पार्टी ऒफ़िसेसबाहेर निवडणूकीच्या सामानाचं दुकान लावून बसणारा एक जण भेटला. पुण्यातून आलो तर म्हणाला की आम्ही पण पुण्याला येतो ना हे निवडणूकीच्या काळात हे झेंडे, टोप्या विकायला. बुधवार पेठेत दुकान होतं त्याचं तात्पुरतं. मनसे आणि शिवसेनेचे झेंडेही विकले का त्या वेळेस मग असं विचारल्यावर म्हणाला, हो, सगळेच झेंडे होते, तेही असतील.

ज्यासाठी सा-या भारतात, माजलेल्या शहरांत त्यांना ’ए बिहारी’ म्हणून शिव्या घातल्या जातात, ती त्यांची अपरिहार्यता आहे. हे कोण असतात हो जे आपल्याकडे येऊन राहतात. ते नक्कीच उच्चवर्णिय नसतात. ज्यांच्या पिढ्यान पिढ्यांकडे कधीच जमिनी नव्हत्या अशा मागास जातींतले असतात. स्वत:ची जमीन नाही. त्यामुळे शेतमजूरी सोडून दुसरा पैशाचा मार्ग नाही. शिक्षणाचा तर गंध नाही, म्हणून सरकारी नोकरी नाही. इकडं उद्योग नाहीत म्हणून ’इंडस्ट्रियल स्किल्स’ नाहीत. मग ओझी उचलण्यापेक्षा दुसरं काय करणार. म्हणजे शरीरमेहनत. ते एक तर पाटण्यासारख्या शहरात करतात सायकल रिक्षा ओढून नाहीतर पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बंगलोरला जाऊन. मराठीत आपण त्याला ’स्थलांतर’ म्हणतो, इंग्रजीत ’मायग्रेशन’. इकडे त्याला ’पलायन’ म्हणतात. आणि मला वाटतं ’पलायन’ या शब्दात कृतीबरोबर बोचरेपणाची, सलणारी भावनाही अभिप्रेत आहे.

यावरून तर आपल्याकडे सारा राडा झाला होता. यांना हाकलून लावा, बाहेर पिटाळा अशा आरोळ्या घुमल्या होत्या. बिहारात एक मात्र मी पक्कं मनाशी ठरवून केलं. जो कोणी भेटला, गप्पा सुरु झाल्या की राज ठाकरे आणि त्याच्या त्या राडा आंदोलना बद्दल विचारायचं. काय झालं नक्की त्यावेळेस इकडे? अजूनही त्यांच्या मनात राग खदखदतोय का? मी हा प्रश्न किमान शंभरएक जणांना विचारला असेन. अगदी तेजस्वी यादव पासून नेपाळ सीमेवरच्या वाल्मिकीनगरच्या स्वयंपाक्यापर्यंत सा-यांना. खरं, प्रामाणिकपणे सांगू? राज ठाकरे आणि त्या हाणामारीचं नाव काढलं की ’गलत हुआ, बुरा असर हुआ’’ असं सारे म्हणायचे, पण म्हणून मग पेटून उठायचे, चार शिव्या हासडायचे, इकडं आल्यावर हात तोडू पाय तोडू असं म्हणायचे, चिडायचे असल्या काही प्रतिक्रिया बिलकुल मिळाल्या नाहीत. जणू काही ही मारामारी सवयीचीच होती. मार खाऊन घाबरून आले, काही दिवसांनी परत गेले. मला वाटायचं की इकडे हे बाहुबलींच्या दहशतीत जगायचे, मग मुंबई-पुण्याचा मार काय सहज सहन केला काय?

’बिहारी अस्मिते’ तेचा उल्लेख प्रत्येक पक्षाने आपापल्या जाहिरनाम्यात केला होता. ’प्रदेस में ही नौकरी तो पलायन नही करना पडेगा’ अशा आशयाची आश्वासने प्रत्येक पार्टीची होती. महाराष्ट्रातून गेलो तेव्हा एक चर्चा सर्वत्र होती की ’राज ठाकरे आणि त्यांचं बिहारीविरोधी आंदोलन’ हा बिहारच्या निवडणूकीचा महत्वाचा मुद्दा बनणार. प्रत्यक्षात असं काहीच बिहारमध्ये नव्हतं. कोणताच नेता, लालू असो वा नितीश, हा मुद्दा काढत नव्हता. ’बिहारी अस्मिता’ खवळून उठायला मराठी अस्मितेच्या आंदोलनाचा वापर करत नव्हता. (हा मुद्दा काढणारा एकच नेता होता. तोही बिहारच्या बाहेरचा. राहुल गांधी. जेव्हा जेव्हा ते बिहारात राज ठाकरेंचा मुद्दा काढायचे, तेव्हा तेव्हा ते महाराष्ट्रात व्हिलन बनायचे, पण बिहारात हिरो अजिबात झाले नाहीत. कॊंग्रेसचे ९ आमदार होते, आता चारच आले.)मी जेव्हा महाराष्ट्रातल्या माझ्या मित्रांना फ़ोनवर सांगायचो तेव्हा त्यांना ते पटायचंच नाही. ज्या आंदोलनामुळे तिकडे बिहारमध्ये पार ट्रेन जाळल्या, आता तो तिकडे मुद्दाच नाही. हे पटत नाही, पण तसं होतं.

हे असं का याचं एक कारण मला ’कॊम्रेड’ अभ्युदयनं सांगितलं. अभ्युदय पाटण्यात ’भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट लेनिनीस्ट (लिबरेशन)’ च्या ऒफ़िसमध्ये भेटला. जुन्या एका बंगलीतल्या कार्यालयात भिंतभर चारू मुजुमदारांचा फ़ोटो आणि बाजूला तेवढ्याच मोठ्या लेनीनच्या फ़ोटोच्या साक्षीनं. अभ्युदय ’माले’च्या स्टुडंट विंगचा तरूण कार्यकर्ता आहे. इथं राज ठाकरेंच्या आंदोलनाचा काय परिणाम होईल, मी विचारलं.
"कुछ नाही होगा. ये नेता लोग बोलेंगेही नही उस बारे मे. उनकी पोल जो खुल जायेगी." अभ्युदय म्हणाला.
असं का होईल याचं त्याने स्वत:चं निरिक्षण सांगितलं. राजच्या आंदोलनानंतर बिहारमध्ये वादळ उठलं खरं, नितीश-लालू-पासवान यांनी ’बिहारी अस्मिते’साठी एकत्र यायचं नाटक केलं खरं, पण त्यावेळेस बिहारच्या रस्त्यांवर वेगळच चित्र होतं.

"सारे छात्र रस्ते पर उतर आये थे...उन्हे पता था की बिहारी लोग मुंबई मे पीट रहें है मगर उसकी वजह बिहार मे ही है...यहां बिहार के नेता ने कुछ नही किय अब तक...पढाई नही कर सकते, नौकरी नही कर सकते...बाहर जा कर मार खा रहे है तो इन्ही नेताओं की वजह से...हफ़्तेभर के लिए पटना मे मानो बंद जैसी स्थिती थी...फ़िर नितीश ने सारे छात्र संघटनाओं की मीटिंग बुलाई...’माले’ उसमे नही गया...मगर छात्र गुस्साएं है आज भी..."

काय हा राग आतल्या आतच रहावा, आपल्यावरच उलटू नये म्हणून या मुद्द्याला नितीशही हात घालत नाहीत? अभ्युदयच्या निरिक्षणामागे त्याची एक राजकीय विचारधारा होती, मात्र घडत होतं ते तर खरं होतं. हा मुद्दा निवडणूकीच्या रणधुमाळीत आलाच नाही. ज्यांनी आणला, त्यांची दांडी गुल झाली.

मी बिहारमध्ये जाण्यापूर्वी आणि गेल्यावरही अनेकांनी सल्ला दिला गेला, की फ़िरू नका. महाराष्ट्रातून आलो आहे हे सांगू नका, मराठी तर अजिबात बोलू नका. तुम्हाला मारायला मागेपुढे बघणार नाहीत आणि तापलेल्या राजकीय वातावरणात महाराष्ट्रातल्या बिहारीविरोधी आंदोलनाचा मुद्दा पेटवण्यासाठी तुम्हाला पकडूनही ठेवतील, इथपर्यंत सल्ले आले. मनावर घेतलं नाही तरी किडा डोक्यात राहिलाच. पण शपथेवर सांगतो की असा कणभरही अनुभव आम्हाला आला नाही. भेटलेल्या प्रत्येक माणसाला आम्ही महाराष्ट्रातून आलोय हे आवर्जून सांगितलं. द्वेषाचा तिथं अंशही नव्हता, ना रागाचा अंश, होती फ़क्त ’महमाननवाजी’.


७.सात.

आता नितीश जिंकलेत. स्वतंत्र भारताच्या लोकशाहीतील एक ऎतिहासिक, विक्रमी विजय त्यांनी नोंदवलाय. पण बिहार बदलेल? म्हणजे बदलाची जी प्रक्रिया त्यांनी नितीश कुमारांवर विश्वास ठेवून स्वीकरली आहे ती पूर्णत्वाला जाईल? किमान ती वेगवान तरी होईल?

याचं उत्तर शोधतांना आपल्या राज्याशी तुलना करण्याचा मोह सोडवत नाही, किंबहुना अननुभवाला दुसरा पर्याय नाही. महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर जमिन सुधारणा झाल्या, कुळ कायद्यासारख्या गोष्टींमुळे शेतजमीनीचं वाटप झालं. म्हणजे शेतीआधारित अर्थव्यवस्था जेव्हा होती तेव्हा शहरी नोक-यांवर न आधारलेल्यांकडे जमीन होती. सहकाराचा एक टप्पा आपल्याकडे आला. उद्योगाधारित अर्थव्यवस्थेकडे जाण्याअगोदरचा तो महत्वाचा टप्पा होता. या काळात फ़ुले-आंबेडकर-शाहू-आगरकरांच्या सुधारणावादी, समरसतावादी विचारांचं अभिसरण आपल्या समाजात चालू होतं, राहिलं हाही महत्वाचा भाग. त्यांनंतर मग महाराष्ट्र मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात, जागतिकीकरणाची फ़ळं चाखतांना आधुनिक उद्योगाधारित अर्थव्यवस्थेकडे आलाय. पण अजूनही त्यात विषमता आहेच.

पण बिहार हा त्या सामाजिक-आर्थिक बदलाच्या या एका टप्प्यालाच मुकलाय. जमीन सुधारणाच कर्मठ जातिव्यवस्थेमुळे झाल्या नाहीयेत, मग सहकार चळवळ तर दूरचीच गोष्ट. जातिव्यवस्था सैल होण्याऎवजी हिंसक बनत गेली. बटाईदारी बिल आजही आणण्याचं धाडस नितीश करू शकत नाहीयेत. शिक्षणाचा प्रसार क्धी झालाच नाही. मग हे अंतर बिहार कसं कापणार? समजा बिहार थेट उद्योगाधारित अर्थव्यवस्थेकेडे गेला तर? नितीश कुमारांच्या छबीकडे बघून टाटा-अंबानी-मित्तल बिहारमध्ये मोठमोठे उद्योग सुरु करतीलही, पण ही एवढी झेप बिहारला एकदम झेपेल का? एक शरीरकष्ट जर सोडले तर या उद्योगांसाठीचं ’स्किल्ड लेबर’ तिथं स्थानिक पातळीवर आहे का? जर शेतजमिनी उद्योगांसाठी जायला लागल्या, जशा सध्या त्या आपल्याकडे जाताहेत, तर मग ज्यांच्याकडे जमिनीच नाहीत अशा शेतमजूरी करणा-या बावन्न टक्के बिहारींनी करायचं काय? या खूप पुढंच्या गोष्टी असतील या, पण असे काही भाबडे प्रश्न पडतात.

अजूनही काही प्रश्न आहेत. कदाचित त्यांची उत्तर इतिहासात असतील. इतिहासानं बिहारवर सूड उगवलाय. नाहीतर काय, अजून काय म्हणाय़चं? हिंदू, बौद्ध आणि जैन ही तीनही शांति-मानवता या ध्येयांनी प्रेरित तत्वप्रणाली इथं वाढल्या, बहरल्या. नालंदा विद्यापीठ त्याचं उत्तम उदाहरण आहे. मग असं काय घडत गेलं की हा समाज इतका हिंसक बनत गेला? या इतिहासाचा, संस्कृतीचा वारसा ते का नाही दाखवू शकत आहेत? जरासंधाच्या या भूमीला शापातून मुक्त करण्याची प्रक्रिया काय असू शकेल?
 
ती प्रक्रिया समजेल तेव्हाच हे अंतर नितीश कसं पार करणार याचा अंदाज येईल? समजून घेणं सुरु तर झालंय. बिहारवर लक्ष असायला हवं.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, October 29, 2010

जाता जाता नितीशबाबूंच्या घरी...

अगदी ध्यानी मनी नसतांनाही नितीशकुमारांच्या घरी गेलो. म्हणजे त्यांच्या पुश्तैनीघरी. फ़ार काही नाही, पण एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचं घर किती साधं असू शकतं याची कल्पनाही करता येत नाही.


नालंद्याहून पाटण्याला चाललो होतो. जाता जाता बख्तियारपूर लागलं. रात्रीचे आठ वाजून गेले होते. आमच्या गाडीचा ड्रायव्हर सुरिंदर हा एक अचाट वल्ली आहे. तासनतास पानाच्या ठेल्यावर वा चहाच्या टपरीशी उभं राहून लालू-नितीश का क्या होगाया चावून चोथा झालेल्या विषयावर जुनं पान परत रंगवावं तशी चर्चा करणा-या बिहारीसवयीचा तो परिपाक आहे. सांगण्याची शैली फ़क्त वेगळी, पण पत्रपंडितांची निरिक्षणं त्याच्यापेक्षा काही वेगळी नाहीत. नितीशनी चनाएक्स्प्रेस का सुरु केली याचं सुंदरगॊसिप तो आम्हाला ऎकवत होता. पत्रकारच व्हायचा, ड्रायव्हर झाला.


"वह है नं सर, नितीशजी का घर है..." गप्पांच्या ओघात एक वाक्य सुरिंदर बोलून गेला.


"क्या? किसका?" काही चुकीचं ऎकलं का असं वाटून मी विचारलं. हां. हां. नितीशजी का ही घर. यहीं तो रहता है उनका परिवार. सी एम बनने के बाद पटना चले गये ना "सुरिंदर म्हणाला.


"पिछे लो, पिछे लो, पिछे लो..." गाडीतले आम्ही सारे जवळजवळ किंचाळलोच.


नितीश कुमारांचं घर? मुख्यमंत्र्याचं घर? आत जाऊन पाहिलंच पाहिजे. रस्त्याच्या बाजूला जुन्या वाड्यासारखं दिसावं असं घर होतं. छोटं फ़ाटक ढकललं की लगेचच मुख्य खोलीत. इकडं सगळ्या घरांसमोर असतात असं प्रशस्त अंगण वगैरे काही नाही. आत दोन खोल्यात छोटे बल्ब मिणमिणत होते. त्या उजेडात दोन तीन माणसं एका बाजेवर जेवत बसली होती.


"क्या यह नितीशजी का घर है?" आम्ही विचारलं.हांजी. यही है?" लगेच उत्तर आलं एकाकडून. तो आप क्या उनके परिवार से है?"अरे नही भई. हम काहे के उनके परिवारवाले? हम पुलिसवाले है. यही पर बंदोबस्त के लिए रहते है." त्यातल्या एकानं सांगितलं.


हे सालं कसलं बंदोबस्तासाठी राहणं? स्वत:चं घर असल्यासारखंच वापरत होते, आणि तेही मुख्यमंत्र्याचं घर. सगळा पसारा होता. कपडे सगळीकडे पसरले होते. तिथंच एक मातीची चूल करून स्वयंपाकघर केलं होतं. लगतच्या खोलीत टेबल मध्यभागी ओढून मस्तपैकी गावक-यांचा गप्पांचा फ़ड लागला होता. डोकावून डोकावून अजून लोक त्यात येत होते.


तपशीलाचा भाग असा की, की मुख्यमंत्री होईस्तोवर नितीश कुमार इथंच रहात होते. आता येऊन जाऊन असतात. याच घरात त्यांचं लहानपण, जेपींच्या चळवळीनं भारावलेलं तारूण्य गेलं. हे त्यांचं पुश्तैनी, म्हणजे पिढीजात घर. त्यांचे वडील कविराज लखन सिंग यांनी, जे स्वातंत्र्यसिनिक होते, त्यांनी वाढवलं, जपलं. त्याच्या आई परमेश्वरी देवी, भाऊ सतीशकुमार अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत इथं रहायचे. आता त्यांचाही पत्ता सी एम हाऊस, सर्क्युलर रोड, पटनाअसा झालाय. त्यांचा मुलगाही तिकडेच असतो पाटण्याला. पण या घरातलं सगळं अजून असचं आहे. इकडचं काही घेऊन गेले नाहीत. अर्थात फ़ार मोठं घर नाहीच आहे. सुरुवातीच्या दर्शनी खोल्या संपल्या की एका बोळकांडातून छोटा जिना वर जातो. वर माडीवर दोन छोट्या खोल्या आहेत, बस्स. आणि हे घर बंदोबस्ताच्या नावाखाली असंच्या असं या पोलिसांना वापरायलाच दिलंय.


"लेकिन अक्सर आते जाते रहते है. ये फ़िलहाल चुनाव का मौसम है नं. इसिलिये  बहुत दिनों मे नही पधारे..." एक साधारण पन्नाशीचा, फ़ार गर्दी का झालीयं म्हणून डोकवायला आलेला माणूस माहिती पुरवतो. हे गोविंद ठाकूर. लहानपणापासून नितीशना ओळखतात. नाभिक समाजाचे आहेत.



"हमेशा मुझसेही बाल बनाते है. लेकिन अब हमेशा के लिए पटना चले गए इसलिये नही होता. मगर जब भी कोई पारिवारिक कार्यक्रम हो, यानी शादी, पूजा या कुछ भी, तो मुझेही बुलाते है यहां से." गोविंद ठाकूरांना अभिमान वाटत असतो. " अब वह तो यहां है रहते. तो यही पर ही मैने अपना सलून भी खुलवा दिया है, यही बगल में." गोविंद ठाकूर जागा दाखवतात.


अशक्य, मुख्यमंत्र्यांच्या घरात सलून! पटत नाही, पण ते असतं. लक्षात घ्या, की याच नितीश कुमारांनी इथं पिछ्डा-अतिपिछडा जातींचं पोलिटिकल इंजिनियरींगकेलंय आणि त्यातूनच या ३ टक्केच असलेल्या कुर्मी समाजातून आलेल्या नेत्यानं लालूंच्या यादव-मुस्लिम आणि इतरांच्या सवर्ण साम्राज्याला यशस्वी आव्हान दिलंय.


थोड्या वेळ गप्पा मारून आम्ही निघतो. जाणवतं ते फ़क्त इतकंच की नितीश कुमारांच्या साधेपणाबद्दल जे सारे बोलतात ते किमान त्यांचा या घरी जाऊन खरं वाटतं. नाहीतर स्वत:च्या गावी अक्षरश: गढ्या असलेले मुख्यमंत्र्यांची संख्या महाराष्ट्रात काही कमी आहेत काय? उभं राज्य लोड शेडिंगच्या नावाने बोंबा मारत असतांना फ़क्त आपल्याच गावाला चोवीस तास वीज देणारे ऊर्जामंत्र्यांची संख्याही कमी नाही. फ़ॊर रेकॊर्ड, जे काही १५-२० मिनीटं आम्ही नितीश कुमारांच्या घरात होतो, त्यात दोन वेळा वीज गेली आणि इथे चोवीस तासात ६ तासच वीज असते.


------------------------------------------------- 

Wednesday, October 27, 2010

जिरादेई: ’साधुपुरूषां’च्या प्रदेशात

झालं असं, की चाललो होतो देवाच्या आळंदीला आणि पोहोचलो चोरांच्या !


शोधायलो गेलो राजेंद्रबाबू आणि सापडला मिस्टर नटवरलाल’!!


म्हणजे एक असतो राष्ट्रपती भवनात राहणारा पहिला बिहारी (आणि भारतीय), तर दुसरा असतो ते विकणारापहिला (आणि एकमेव) बिहारी आणि दोघेही एकाच गावचे, जिरादेईचे!!!


खरंच, बिहारमध्ये काहीही घडू शकतं. आता आलोच आहे जिरादेईजवळ (सिवानपासून फ़क्त १० किमी) तर भारताचे पहिले राष्ट्रपती असलेल्या डॊ.राजेंद्रप्रसादांच्या या गावी जायलाच हवं हे ठरवलेलं होतं. त्यांचं म्हणे इथं अजूनही सुरेख जपलेलं घर आहे, ते पहायचं होतं. पण कसं जायचं याची जरा चौकशी करायला लागलो तर प्रत्येक जण सांगायला लागला, "जा ही रहे हो तो नटवरलाल के घर जरूर हो आना...". म्हणजे? मला सुरुवातीला काही समजलंच नाही. "अरे वो नटवरलाल...दुनिया का वसी मशहूर महाठग जिसपर अमिताभ फ़्लिम बनी है...वह उसी गांव का है नं...".


मग लाईट पेटला...अरे बाप रे! तो मिस्टर नटवरलाल? ठगांच्या ठगांचा ठग? द फ़ादर ऒफ़ ऒल फ़्रॊड्स?


ज्यानं परदेशी नागरिकांना ताजमहालतीनदा विकला, ’लाल किल्लादोनदा विकला आणि सालं हेही कमी पडलं म्हणून राष्ट्रपती भवनाचाही एकदा सौदा केला तो मि.नटवरलाल?


पाच फ़ुट अंतरावर उभा राहूनही केवळ हाताची हालचाल लक्षात ठेवून जगातल्या कोणाचीही हुबेहूब सही करू शकायचा मि. नटवरलाल?


शेकडो लोकांना कोट्यावधींना गंडवून १००  हून अधिक केसेस मध्ये जो भारतातल्या ८ राज्यांच्या पोलिसांना हवा होता आणि एकूण ११३ वर्षांची शिक्षा होऊनही भारतातला कुठलाच तुरूंग ज्याला शिक्षेचा पूर्ण काळ अडकवून ठेवू शकला नाही तो मि.नटवरलाल?


एकदा संधी द्या आणि भारताला चार दिवसांत कर्जमुक्त करून दाखवतो असं सरकारला जाहिर आव्हान देणारा मि.नटवरलाल?


ज्याचा आयुष्यात दोनदा मृत्यू झाला तो मि.नटवरलाल?


ज्याचं खरं काय नी काल्पनिक काय पण ठग असूनही लिजंडबनून राहिलेला, ज्याच्या हातचलाखीवरची रेलबुकं आजही हजारोनं खपतात, तो मि. नटवरलाल?


सगळं असं खटाखट आठवायला लागलं आणि जाम एक्साईट झालो. माफ़ करा, पण राजेंद्रबाबूंपेक्षा त्याच्याविषयीच जास्त आकर्षण वाटायला लागलं. आणि त्या गावात नी परिसरातही हीच एक्साईटमेंट आहे. नटवरलाल विचारलं की लगेच हसू यायला लागतं, ठग म्हणतानाही आदर वाटायला लागतो आणि त्याला कधी पाहिलं असो वा नसो रामायणाचे असतात तसे नटवरलालच्या किश्श्यांचे संस्कार बाहेर पडायला लागतात.


त्याचं घर काही अगदी प्रॊपर जिरादेईत राजेंद्रबाबूंच्या घराजवळ नाहीये. पण इथून साधारण दीड किलोमीटरवर जिरादेईचा भाग म्हणावा अशी बरगावस्ती आहे. जरा बांधाबांधानं गेलं की आलीच लगेच. 


"नटवरलाल का घर?" आमचा प्रश्न पूर्णही होत नाही तोवर हसत हसत प्रतिशश्न येतो, "देखना है? आईये मेरे पिछे..." असं म्हणून जोगिंदर स्वत:च भराभरा पुढे चालायला लागतात.यांचं वय साधारण ५० वर्षे.


"आपने देखा है कभी नटवरलाल को?" हा प्रश्न मी या गावात भेटणा-या प्रत्येक माणसाला विचारणार होतो.


"अरे नही भाई...हम कहा देखेंगे उनको? मगर सुना बहुत है बचपन से...बताते है,यह आदमी एक कुछ भी कर सकता था...एक बार उनकी बेटी की शादी थी और यह साब पुलिस क लिए वांटेड थे...पुलिस आकर बैठ गयी थी बाहर...उअनका मानना था बेटी की शादी है तो कही न कही से तो आयेंगे ही...बात तो सही थी...नटवरलाल तो जरूर आये के लेकिन पुलिस को पता भी न चला...पूरे समारोह मे एक दिन पहले से वो औरत के कपडे पहनकर बैठ गये...किसी को जरा सी भी आशंका नही हुई...जैसे ही पुलिस राह देख कर चली गयी तब नटवरलाल सबके सामने आये और देखिये, पुलिस मुझे कभी पकड नही सकतीऎसा बोलकर वापस चले भी गये..." जोगिंदर अगदी रमून सांगत होते. कितव्यांदा हा किस्सा अशा बाहेरच्या व्यक्तीला सांगत होते कोणाच ठावूक पण सांगतांना आत गुदगुल्या होत होत्या हे नक्की.


बोलता बोलता आम्ही एका जुन्या घरापाशी आलो. पडीक घर होतं. छप्पर नव्हतंच पण विटांच्या भिंती आणि पुढचं दार शाबूत होतं. बाकी खंडहर होतं गवत माजलेलं. आम्ही मात्र अजि म्या ब्रम्ह पाहिलाअसं त्या घराकडे पाहत होतो. याच घराबाहेर पोलिस त्यांची वाट पहात होते, आणि हे बाबू आत लग्नसमारंभात होते. अमेझिंग!



"अभी कुछ साल पहले उनके एक भाई रहते तथे यहां, मगर बाद मे सिवान चले गये. लडकी का पता नही." जोगिंदर माहिती पुरवतात.


"कोई है अभी गांव मे उस वक्त का जो उनसे मिला हो?" हे तर आमचं पालुपद.


"हां. एक राजेश्वर पांडे है यहां पर. पैंसठ साल के है...वो कभी उनसे मिले हो शायद."
"चलिये फ़िर उनके पास जायेंगे." आमची चौकडी मग गल्ल्यागल्ल्यांतून पांडेच्या घरी. राजेश्वर पांडे, नटवरलाल पाहिलेला माणूस, एक नंबर!


"नही भई मैने तो कभी नही देखा उनको." पांडेंचं पहिलं वाक्य. हात्तीच्या, म्हाता-यानं सारा खेळच मोडला.


" मगर मै उनकी अंत्यसंस्कार को गया था रांची. सतानवे (१९९७) में उनके भाई के साथ, जब पहली भार उनकी मौत हुई थी..." चला, पांडे कशाला तरी साक्षीदार होते तर.


आता, या पहली बार मौतचा किस्सा लै भारी आहे. या नटवरलालाभवती ज्या अनेक दंतकथा फ़िरताहेत त्यातली एक अचाट म्हणजे हा मनुष्य एका आयुष्यात दोनदा मेला. त्यातल्या पहिल्यांदा रांचीला १९९७ मध्ये. २४ जून १९९६ ला शिक्षा भोगत असतांना त्याला कानपूर जेलमधून दिल्लीत आणलं जात होतं रेल्वेनी एम्समध्ये इलाजासाठी. त्यावेळेस व्हिलचेअरमध्ये असलेला नटवरलाल रेल्वे स्टेशनवरून फ़रार झाला, त्यावेळी पोलिसांनी त्याला शेवटचं पाहिलं. नंतर बातमी आली की रांचीमध्ये त्याचं निधन झालं आणि त्याच्या भावानं गावातल्या लोकांसहित जाऊन अंत्यसंस्कार केले. पण प्रकरण इथे संपेल तो नटवरलाल कसला? त्यानंतर १३ वर्षांनी तो अजून एकदा मेला. त्याच्या वकीलांनी कानपूर कोर्टामध्ये २००९ साली असा अर्ज दाखल केला की माझ्या अशिलाविरूद्ध असलेले सारे खटले आता थांबविण्यात यावेत कारण २५ जुलै २००९ रोजी त्यांचं निधन झालं आहे’. खरं काय नी खोटं काय, त्या वरगेलेल्या नटवरलाललाच माहिती!


जसा तो मेला किती वेळा अन कधी हे माहित नाही, तसा किती नावांनी जगला हेही माहित नाही. जरी अमरझाला मि.नटवरलाल म्हणून, अधिक तरी आयुष्यभर त्याने ५० हून अधिक नावांनी त्याने गंडवागंडवी केली. आता जन्माचंच नाव म्हणाल तर हा मूळ होता मिथिलेश कुमार श्रीवास्तवज्याचा जन्म १९१२ साली जिरादेईत झाला. पण एकदा उद्योग वाढायला लागल्यावर त्याने नटवरलाल’, ’भूखल प्रसाद’, ’राधेश्यम अग्रवालअशा अनेक नावांनी तो जगला. भारताच्या एका टोकापासून ते दुस-या टोकापर्यंत त्याने सगळ्यांना गंडवलं. कोट्यावधींचा चुना लावला. ताजमहाल-लाल किल्ला-राष्ट्रपती भवन अनेकदा विकल्याचा किस्सा तर प्रसिद्ध आहे पण आपल्या सही करण्याच्या कौशल्याने त्याने एकदा खुद्द राजेंद्र प्रसादांना गंडवले होते. त्यांची सही हुबेहुब करून त्यांच्या खात्यातून पैसे काढले होते. अनेकदा पकडला गेला, पण कधी कोणताही तुरूंग त्याला अडकवून ठेवू शकला नाही. एकदा तर म्हणे पोलिसांच्या वेशातच सगळ्यांचे सॆल्यूटस्वीकारत तो आरामात फ़रार झाला होता.


" देखिये बाबू. एक बात मगर समझ लिजिये...वह कोई डकैत नही था..नाही गोलीबारी कर किसकी हत्या उसने की है...तेज दिमाग की उसे देन थी और उसे इस्तमाल कर वह अमीरोंको ठगता था और गरीबों मे पैसा बांटता था..." पांडे हे वाक्य जरा जरबेने बोलतात तेव्हा तो तर्क मलाही पटायला  लागतो.


पण या काळात आम्हाला ख-या, हयात असलेल्या नटवरलाल पाहिलेल्या माणसाचा शोध लागलेला असतो. जयराम पणित, वय वर्षं शंभरहून अधिक, नटवरलालचे शाळेपासूनचे सवंगडी. इतकं वय होऊनही नटवरलाल हा विषय त्यांना अजूनही पुरतो.

" वह तो स्कूल से ही उसके चिटींगसे नमूने दिखाई देते थे...वैसे वह पढा भी नही, सोलह-सत्रह साल की उम्र मे घर से निकल गये और धंडे शुरू कर दिये...मुंबई मे दुकान खुलवाई गहनों की, बाद मे गोरखपूर में भी कपडॊंकी दुकान थी...गांव हमेशा आते थे और यहां  के लडकों के दुकानों मे नौकरी देते थे...बाद मे फ़िर पता चला की पैसे कैसे मिलते थे इनको..."


हे असले शेकडो किस्से आहेत नटवरलालचे या गावांत. कोणी सांगायचं थांबत नाही. ते खरे खोटे आहेत याचा कोणी विचार करत नाहीत. पण दंतकथा बनून राहिलेल्या नटवरलालची ओळख आपल्या गावाला आहे हे त्यांना आवडतं. तो महाठग असला तरी त्यांना तो आवडतो, इतकंच काय पण त्याच्याकडे काही दैवी शक्ती असणार असं त्यांना वाटतं.


दैवी शक्ती वगैरे जाऊ दे. पण त्याच्या या कर्तबगारीचं रहस्य खुद्द नटवरलालनेच सांगितलंय. १९६८ ला जेव्हा एका गुन्ह्यात अटक करून त्याला लखनौला न्यायाधीशांसमोर हजर केलं तेव्हा तो म्हणला होता, " मी काही लोकांना फ़सवत नाही, उलट तेच लालसेपायी माझ्याकडे पैसे देतात. जोपर्यंत लालसा, हव्यास आहे तोपर्यंत नटवरलाल काही मरत नाही."!


त्याला या असल्या चांगल्या-वाईट, मानवी-दैवी असल्या विशेषणांत उगाच न अडकवता आम्ही गावाबाहेर पडतो. एक नक्की की, ’मी नटवरलालच्या घरी जाऊन आलोही सांगण्यासारखी गोष्ट आहे.


ख-या साधुपुरूषाचं, राजेंद्रबाबूंचं गांव
जिरादेईला आलो मात्र हे राजेंद्रबाबूंचं म्हणून. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॊ.राजेंद्र प्रसाद यांचे हे गाव. हे राजेंद्र प्रसादांचं जन्मस्थान. आजही त्यांच्या कुटुंबाची प्रचंड हवेली व्यवस्थित जपली गेली आहे. राजेंद्रप्रसादांचे वास्तव्य उत्तरार्धात दिल्लीत जरी असले तरीही सारे एकत्र कुटुंब इथेच असायचं जिरादेईत. बिहारच्या या भागात स्वातंत्र्यचळवळ त्यांनी रोवली या घरातून. कॊंग्रेसचंही ते एक महत्वाचं केंद्र होतं. राजेंद्रबाबूंच्या पश्चात त्यांचा एक मुलगा मृत्युंजय प्रसाद इथे असायचे. त्यांनीही इथून राजेंद्रप्रसादांचा राजकीय वारसा पुढे चालवला, ते दोन वेळा खासदारही होते. आता मात्र त्यांच्याही कुटुंबाचं इथे कोणी नाही. ते डेहरादूनला असतात. गांधीवादी असूनही बिहारच्या पंरंपरागत जमीनदारी प्रथेने हजारो एकर जमीन आपल्याकडे ठेवल्याचे आरोप त्यांच्यावर झाले ती जमीन आता जवळपास सगळीच विकून टाकली आहे.


राजेंद्रबाबूंचं आज मात्र हे घर भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. प्रचंडच आहे. खोल्यांची संख्या मोजली तरीही पसारा किती मोठा होता ते कळेल. आत एक छोटा पुतळा आहे प्रांगणातच. या घराततच महात्मा गांधींचही वास्तव्य होतं. ते रहात असलेल्या खोल्याही व्यवस्थित जपल्या आहेत. इथे जयप्रकाश नारायणांचंही वास्त्यव्य असायचं. जेपींची पत्नी प्रभावती आणि मृत्युंजय प्रसादांची पत्नी या दोघी बहीणी, त्यामुळे साडूंकडे जेपींचा मुक्काम असायचा. अगोदरच बिहारला पर्यटन वगैरे करायला येणा-यांची संख्या कमी आणि त्यात इथही त्याबद्दल फ़ार काही अप्रूप नाही, त्यामुळे भेट देणा-यांची संख्या अगदीच तुरळक. नाही म्हणायला, ही वास्तू संरक्षित असल्यानं गावाला रस्ते वगैरे करून मिळालेत चांगले.
पण राजेंद्रबाबूंची कॊग्रेस आता इथे पाण्यालाही मिळत नाही. एकेकाळी या राज्या सर्वत्र असलेल्या कॊग्रेस आता बिहारमधून कशी हद्दपार झाली आहे याचं जिरादेई हे उत्तम उदाहरण आहे. आता  ज्यांनी गांधीवाद इथे रूजवला त्या राजेंद्रबाबूंच्या गावातून शहाबुद्दिन पहिल्यांदा निवडून जातो याला काय म्हणायचे? गेल्या दोन निवडणूका इथे भाजपा आणि जद(यू)च आहे. कॊंग्रेसला इथे एकही चेहरा नाही. सध्या राहुल गांधीच्या बिहारच्या नव्या कॊंग्रेसचा एक चेहरा आहे. पण तो पहायला जरा पुढं जावं लागतं, जिरादेईशेजारच्या गोपालगंज मध्ये, साधु यादव!

साधु,साधु!


साधु यादव हे नाव आता उभ्या भारतात सर्वांना माहित आहे. प्रकाश झा च्या गंगाजलने हे नाव आणि त्याची दहशत घराघरात पोहोचवली. पण त्याच्याअगोदरही तो प्रसिद्ध होताच. राबडी देवींचा भाऊ, लालूंचा मेव्हणा म्हणून तो गोपालगंजमधून आमदार झाला, खासदार झाला. राजदच्या गुंडगिरी राजकारणाचा पक्का वारस बनला. बिहारमध्ये जरा त्याने जास्तच हातपाय पसरायला सुरुवात केली होती, म्हणून २००९ च्या लोकसभा निवडणूकीत त्याचं तिकीट लालूंनी कापलं. घरातलाच माणूस डोईजड होऊ दिला नाही. मग तो बेतिया, म्हणजे पश्चिम चंपारण्यात, इथून लढला ज्यानं त्याला गंगाजलमधून देशभर बदनाम (?) केलं त्या प्रकाश झा विरूद्ध खुन्नस म्हणून. पडला, आपटला. साधु मग कॊंग्रेसकडे वळला. त्याला गांधींची आठवण झाली. आता पुन्हा गोपालगंजमधून कॊंग्रेसच्या तिकीटावर उभा आहे विधानसभेसाठी.
आता इथं आल्यावर याही साधुपुरूषाला भेटलच पाहिजे. गोपालगंज जिरादेईपासून साधारण ३० किलोमीटर आत शिरलो शहरात तेव्हा एक गोष्ट मात्र चटकन नजरेत भरली ती म्हणजे पहिल्यांदाच बिहारमध्ये सिमेंटचे रस्ते दिसत होते. मध्यभागी मोठं आंबेडकर सभागृहहोतं हॊटेल्स दिसत होती, सायबर कॆफ़े दिसत होती. आणि जिथं जिथं विकासकामे झाली होती तिथं तिथं साधु यादवचं नाव कोरलेले फ़लक होते. त्याच्या कार्यालयात गेलो. कार्यालय कसलं, बंगलाच होता मोठा साधु यादवचाच. समजलं की तो आता इथे राहत नाही. जवळच एक अजून मोठा बंगला (हवेली!) बांधलीय नवीन. पण आता सारे कार्यकर्ते दिसत होते. कार्यकर्ते कसले, कोणीही टगे पांढरे परिटघडीचे कपडे घालून आपल्याकडेही पार्टी ऒफ़िसेस मध्ये बसतात तसे पांढरेगुंड. बाकी सगळीकडे गेलो बिहारात की पत्रकार म्हटल्यावर स्वागत व्हायचं. इथं कपाळावर आठ्या.


"कैसा है माहोल?"आपलं सुरुवात करायची म्हणून विचारलं.


"बढिया है. साधुजी का माहौल है!" सरळसोट उत्तर.


"साधुजी का या राहुलजी का?" खरं काय ते काढायचं होतं.


"उनका क्यो? अभी कल बिहारमे आये राहुलजी का ऎसा कितना असर पडेगा? यहां काम है साधुजी का. अभी लोग कुछ नही कहेंगे लेकिन वोट किस कि देंगे ये देखना." हे निरिक्षण होतं की धमकी?


पण कॊग्रेसच्याच कार्यकर्त्यानं राहुलला शालजोडीतले मारल्यावर खरं चित्र स्पष्ट झालं.यहां राहुल नही चलेगाहे साधु यादवचा माणूस किती आत्मविश्वासानं सांगत होता. मग साधु यादव स्वत: राहुलला काय मानत असेल? बेदरकारपणे गुंडगिरी करणा-या आणि एक समांतर सत्तास्थळ बनत चाललेल्या साधु यादवला कुठं थांबवायचं हे लालू प्रसादांना समजलं होतं म्हणून त्यांनी साधुचं तिकीट कापून बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण वळचणीला आलेल्या साधुला कॊंग्रेसनं मात्र लगेच पंखाखाली घेतलं होतं, लोकसभेचं तिकीट दिलं होतं. खरं तर लोकसभा निवडणूकीत कॊग्रेसचं जे पानीपत झालं त्या मुख्य कारण दुस-याला नैतिकतेचे धडे देणा-या या पक्षाने साधु यादव आणि त्याच्यासारख्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवा-या दिल्या. मग लोकांनी नाकारलं, नाकारणारच. पण राहुल गांधींची कॊंग्रेस यातून काहीही शिकली नाही. 


राजेंद्रबाबूंचे गांधी आणि साधु यादवचे गांधी वेगळे होते.


"साधुजी से मिलना है...कहां मिल सकते है?" आम्ही विचारलं.


"कैसे मिलेंगे? वह तो क्षेत्र मे है. नही मिल सकते. सुबह छ्ह बजे निकलते है और रात बारह बजे तक आते है." त्या कार्यकर्त्यानं फ़टकारलंच.


"कहां है मगर? हम जाकर वही मिल लेंगे उनसे." मी म्हटलं. आम्ही याअगोदरही अनेक उमेदवारांना असं कुठल्या तरी खेड्यातच पकडलं होतं.


"नही बाबू. वह देहात मे होंगे. आप नही पहुंच सकते वहां."


"मगर उन्हे फोन तो लगाकर देखिये की लोकेशन क्या है?" मी हट्टालाच पेटलो होतो.


"वह तो मोबाईल नहीं रखते अपने पास." एक नंबर, ’साधु यादव मोबाईल वापरत नाहीहीच खरी बातमी आहे.


अर्थ समजला. याला आपल्याला भेटू दिलं जाणार नाही. जर जिंकलाच तर भेटेल आणि ती शक्यता कमीच आहे. त्याच्या गुंडगिरीच्या नाड्या पार आवळल्या गेल्यात. राजकारणात खरा बाप दाखवला नाही तर कसं श्राद्ध घालावं लागतं हे त्याला लालूंनी दाखवून दिलंय. जरा हातपाय हालवले की निवडणूक आयोग कारवाई करतोय. गेलो त्याच्या आदल्या दिवशी गोपालगंजमध्ये त्याच्या सात गाड्या पकडून साधु यादव वर गुन्हा दाखल केला गेला होता. लोकांच्या कुजबुजीतनं समजलं की फ़ार बाहेर न पडता, पेपरमधून मोठमोठ्या जाहिराती देत साहेब मतदानाच्या दिवसाची वाट पाहत होते.


"भाई वह माहौल नही रहा. साधु को देखा? पहले कैसे दाढी बढाकर गुंडो के साथ घुमा करता था. अब दाढी हटाकर सज्जन बन बैठा है!" चहाच्या टपरीवरच्या गप्पा कान देऊन ऎकाव्या लागतात.


शेवटी, या साधुपुरूषांच्या प्रदेशात येऊनही त्यापैकी एकाशीही भेट झाली नाही. एक हयातच नाहीत. दुसरा हयात आहे वा नाही हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. आणि तिसरा साधु हयात असून गुहेत आहे, बाहेर पडत नाही.


निघालो, कारण चंपारण्याची वाट धरायची होती.

------------------------

Friday, October 22, 2010

शहाबुद्दिनच्या (अस्तंगत) साम्राज्यात

समाजानं पिचलेपणाचा तळ गाठला की त्यावर दहशतीचा कळस चढवायला मोहम्मद शहाबुद्दिन सारखे बेबंद बाहुबली निर्माण होत असणार.

घराबाहेर रस्त्यांवर दिवसाढवळ्या-रात्री-२४ तास जेव्हा AK-47 घेऊन कोणत्याही क्षणी गोळ्या घालून मारण्याचं लायसन्स घेऊन गुंड फ़िरत असतील तर काय करायचं?

केवळ गाडीला ओव्हरटेक केला म्हणून गाडीबाहेर काढून गोळ्यांनी शरीराची चाळण केली जात असेल तर काय प्रतिकार करायचा?

गुंडाला पोलिस अटक करायला आले म्हणून भर रस्त्यात पोलिस अधिक्षकाच्या च्या कानाखाली वाजवली जात असेल आणि पोलिसांवर AK-47 ने हल्ला केला जात असेल तर संरक्षण कोणाकडे मागायचं?

न्याय मागायला जर पोलिसांनाच जर बाहुबलीच्या न्यायदरबारातजावं लागत असेल तर दाद कोणाकडे मागायची?

स्वत:चं अपहरण होऊ नये म्हणून अगोदरच जर खंडणी द्यावी लागत असेल तर लपून कुठं रहायचं?भर रस्त्यात कपडे फ़ाडून, निर्वस्त्र करून आणि अंगावर घाण टाकून बेईज्जत केलं जात असेल तर कुठं पळून जायचं?

आणि हे करणारा जर निवडून आलेला लोकप्रतिनिधी असेल तर लोकशाहीचा अर्थ काय?

इथं लोकशाही नसते. हे असतं हुकुमशहाचं साम्राज्य. बाहुबलीची बेलगाम सत्ता. मोहम्मद शहाबुद्दिनचं सिवान. उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेला उत्तर-पूर्व बिहारचा जिल्हा, सिवान. भारतातला सर्वात कुप्रसिद्ध गुन्हेगार राजकारणी मोहम्मद शहाबुद्दिनचं सिवान.

शहाबुद्दिन गेल्या काही वर्षांपासून तुरूंगात आहे. पण त्याची रक्तरंजित दहशत सिवानच्या लोकांनी पंधरा वर्षांहूनही जास्त काळ भोगली आहे, जगली आहे. स्वतंत्र भारतात लोकशाही आणि स्वातंत्र्याचा त्यांच्यापेक्षा जास्त महत्व कोणीही समजू शकणार नाही. आज जरी इथं मुक्त श्वास आहे.

ते काय आहे हे पहायचं होतं.

पाटण्याचा बकाल रस्ता गंगेवरचा हाजीपूर पूल ओलांडला की कधी हिरव्यागार प्रदेशात शिरतो समजत नाही. पण जाणीव होते तेव्हा कर्कश बिहार शांत झालेला असतो. हाजीपूर नंतर दोन्ही बाजूला अनेक किलोमीटर केळीच्या बागा आणि कोबीची शेती लागते. छाप-यानंतर फ़क्त ऊसच ऊस असतो. मध्येच बांधाबांधावर उभी असलेली माडाची उंच झाडं एका रांगेत असतात. जसजसं सिवान जवळ येत जात तसं दोन्ही बाजूला नजर जाईपर्यंत हिरवीगार भाताची शेती असते. मधून जाणारा संथ रस्ता जेव्हा सिवान मध्ये शिरतो तेव्हा हे शहरही शांतपणे पहुडलेलं वाटतं. पण आत खूप खदखदत असणार. हिरव्यागार रंगात न दिसणारा लाल रंगही आहे.

सिवानला येण्याअगोदर या शहाबुद्दिन नावाच्या प्रतापी महापुरूषाबद्दल खूप काही ऎकलं होतं, वाचलं होतं. पण इथं आल्यावर लोकांच्या तोंडून एकापाठोपाठ सुरस कथा ऎकायला लागलात की कानावर विश्वास बसत नाही. हे खरंच असं प्रत्यक्षात होत? फ़ार काही नाही तर फ़क्त पाचच वर्षांपूर्वीपर्यंत? त्या एकतर मिथुन, धर्मेंद्र वा अतिरंजित बी-ग्रेड हिंदी सिनेमांच्या पटकथा वाटतात नाहीतर मग शूल’, ’गंगाजल’, ’अपहरणहे बिहारच्या राजकीय गुन्हेगारीवर आलेले वास्तववादी चित्रपटही फ़िके वाटायला लागतात.


 "आप जहां पर खडे हो ना, बस जरा पिछे मूड कर देखो." ’दैनिक जागरणच्या ऒफ़िसबाहेर त्यांचे ब्यूरो चिफ़ राकेश कुमार बोलता बोलता मला सांगतात.

मी मागे वळून पाहतो. एक लाल काव मारलेली जुन्या घराची भिंत असते.


"क्या उसमे छोटे छोटे होल्स दिखाई दे रहें है आपको?" ते विचारतात


"हां. दिख तो रहे है. क्या है?" माझा भोळा प्रश्न.


"शायद २००४ की बात है...इसी घर के मालिक थे रघुविर शरण वर्मा...अधिवक्ता थे...शहाबुद्दिन के खिलाफ़ किसी केस मे गवाही देने जा रहे थे...सुबह घ्रर के बैठे थे तो यही पे AK-47 से गोलीयां दाग दी...उनकी लडकी बिच मे पड गयी तो उसे भी जान से मार दिया गया..." कुमारांनी शांतपणे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

मी सुन्न झालो. दोन मिनीटं काय बोलावं सुचलच नाही. काय आणि कसं रिएक्ट व्हायचं? जालियनवाला बागेच्या भिंतीकडे जसं बघायचं असतं तसं बघत राहिलो त्या भिंतीकडे. हे असलं रोज घडायचं. १९९० नंतर २००५ पर्यंत.

सिवानच्या मार्केट रोडवरून सरळ पुढे गेलं गोपालगंजच्या दिशेला की होला नदीचा पूल ओलांडला की एक चौक येतो, ’डॊ.आंबेडकर चौक’. तिथे आंबेडकरांचा पुतळाही आहे बाजूला. पण आता या चौकाला चंद्रशेखर चौकम्हणून ओळखलं जातं. मध्यभागी मोठा पुतळाही आहे चंद्रशेखर प्रसादचा. कोण आहे हा चंद्रशेखर प्रसाद?

चंद्रशेखर मागासवर्गीय कुशवाहा समाजातून आलेला हा सिवानच्या एका शहिद सैनिकाचा मुलगा. पुण्याच्या एन डि ए मध्ये मिळालेला प्रवेश सोडून दिल्लीच्या जे एन यू मध्ये गेला कारण कार्यकर्ता व्हायचं होतं, पूर्ण वेळ जमीनदारांविरूद्धच्या चळवळीत पडायचं होतं. तसं त्यानं काम सुरुही केलं. सिवान आणि आसपासच्या भागात राजकीय दृष्ट्या सक्रीय असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट)’ म्हणजेच मालेचा स्टुडंट्स विंगचा तो सक्रीय कार्यकर्ता होता. लालूंची राष्ट्रीय जनता दल’ (अगोदरची जनता दल), ज्यातर्फ़े शहाबुद्दिन ४ वेळा सिवानचा खासदार होता, त्यांचा मालेशी उघड उघड संघर्ष होता. शिवाय त्यांची चळवळ उच्चवर्गीय जमीनदारांनासुद्धा डोकेदुखी झाली होती. १९९० ते १९९६, ज्या काळात लालूंचं सरकार होतं त्याकाळात मालेचे ७० कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. ३१ मार्च १९९७ ला मालेनं जिल्हा बंद पुकारला होता आणि सकाळी चंद्रशेखर याच चौकात एक सभा घेत होता. सभा सुरू असतांनाच AK-47 घेतलेले काही गुंड गाड्यांतून आले आणि चंद्रशेखरच्या दिशेने फ़ायरिंग सुरु केलं. चंद्रशेखर आणि त्याच्या अजून एका सहका-याच्या शरीराची अक्षरश: चाळण उडाली. आरोप हा आहे की शहाबुद्दिननेच ही हत्या घडवून आणली.

या चौकातल्या चंद्रशेखरच्या पुतळ्यकडे पाहत असतांना पुन्हा एकदा जालियानवाला बाग आठवली. मी सुन्न उभा.

या अशा कथा इथल्या चौकाचौकात, रस्त्यारस्त्यावर, नाक्यानाक्यावर आहेत. पण कोणीच काही बोललं नाही, फ़क्त सहन करत राहिले जेव्हापासून शहाबुद्दिन राजसुरु झालं १९९० साली. तसा ८० च्या दशकात तो फ़क्त एक गुंड होता या भागातला पण दहशतीच्या बळावर १९९० मध्ये जेव्हा तो पहिल्यांदा अपक्ष म्हणून जेरादेही’ ( हे भारताचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसादांचं गाव) मधून विधानसभेत आमदार झाला तेव्हा त्याला राजकीय सत्तेची चटक लागली. त्याची कर्तबगारीआणि उज्वल भविष्यतेव्हा मुख्यमंत्री झालेल्या लालूंनी तात्काळ हेरलं आणि त्याला आपल्या पक्षात ओढलं. ’शब्बू AK-47' ला राजश्रय मिळाला आणि सरकारदरबारी तो वाल्याचा वाल्मिकीझाला. १९९६ लालूंनी त्याला दिल्ली दाखविली आणि तेव्हापासून तो ४ वेळा सलग खासदार झाला. आणि होणार नाही तर काय? इथं लोकशाही सरकार नावाची चीज अस्तित्वातच राहिली नाही. जे काही ते सबकुछ शहाबुद्दिन. आणि नावं नाही घ्यायचं कोणीच, म्हणायचं साहेब’, नाहीतर गोळ्या. राजकीय विरोधक अस्तित्वातच उरले नाहीत. ज्याने इतर कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात धरला, किंवा त्याचा संशयही आला तर मृत्यू. यापैकी एकाही निवडणूकीत त्याचे विरोधक प्रचाराला घराबाहेरही पडू शकले नाहीत. तोंडातून ब्रजरी काढला तरी काय होईल हे सांगता येत नाही. बेपत्ता झालेल्या लोकांचा तर आजतागायत पत्ताही लागला नाही.

विरोधकच न ठेवण्याची शहाबुद्दिनी पद्धत अशीच आहे.

२००४ची लोकसभा निवडणूक शहाबुद्दिननं तुरूंगातून लढवली. विरोधात होते. जद(यु)चे ओम प्रकाश यादव.(हे यादव आता सिवानचे खासदार आहेत आणि २००९ च्या निवडणूकीत शहाबुद्दिनच्या पत्नीला हरवून निवडून आलेत.) शहाबुद्दिन निवडून आला, यात अनपेक्षित काहीच नाही. पण दुपारी निकाल हातात आला आणि यादवांच्या घरावर फ़ायरिंग सुरु झालं. कारण होतं १९९९ च्या तुलनेत त्यांची मतं २३ टक्क्यांनी वाढली होती, ’साहेबच्या सिवानमध्ये त्यांना २ लाख मतं मिळाली होती. आत्ताच्या २०१० च्या निवडणूकीत सिवानशेजारच्या जिरादेई विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून


उभ्या आहेत आशा पाठक. त्यांना विचारा इथे विरोधाचं फ़ळ काय असतं. त्यांच्या मुलानं घराबाहेर पक्षाचा झेंडा लावला म्हणून त्यांच्या मुलासह तिघांची रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या घराबाहेर हत्या करण्यात आली. बाई मात्र खमकी, त्या बलिदानांना जागून या निवडणूकीला उभी आहे.पटत नाही. किंवा मन पटवूनच घेत नाही की असं काही खरंच घडत असतं आपण राहतोय त्या देशात.

मग पोलिस काय करत होते? पोलिसी स्वाभिमानावर तो अत्याच्यार होता. कलेक्टर, एस पी चालले की त्यांना कोणीही पोलिस सलाम करत नसे. इथे सलाम फ़क्त शहाबुद्दिनला. इथल्या दुकानांत गांधींचा नाही तर फ़क्त शहाबुद्दिनचाच फ़ोटो हवा हा फ़तवा काढलेला. सरकार, न्याययंत्रणा, पोलिस यंत्रणा फ़ाट्यावर मारून याच्या प्रतापपूरच्या हवेलीत अदालतभरायची. स्वत:ची बदली करून घ्यायची असेल तर याच्या दरबारात हजर व्हायला लागायचं.

पोलिसांची काय किंमत केली जायची ही २००१ च्या एका हादरवून सोडणा-या घटनेनं समजतं. मनोज कुमार पप्पू हा राजदचा एक विभागप्रमुख आणि शहापुद्दिनचा एक पाळलेला गुंड. त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या संजीव कुमार या आय पी एस अधिका-याला शहाबुद्दिनने थोबाडीत मारली आणि बरोबरच्या पोलिसांना मारून मारून पळवून लावलं. मग चवताळलेल्या पोलिसांनी पूर्ण ताकतीनिशी शहाबुद्दिनच्या प्रतापपूर हवेलीवर हल्लाबोल केला. पण शहाबुद्दिन गॆंगकडे असणा-या अत्याधुनिक शस्त्रांपुढे पोलिसांचं काही चालेला. तीन पोलिस शहिद झाले. उत्तर प्रदेश पोलिसांची एक पथक बोलवावं लागलं. पण हे भारत-पाक सीमेवर घडावं तसं भयानकं युद्ध सिवानमध्ये घडूनसुद्धा शहाबुद्दिन आणि मनोज कुमारला अटक होऊ शकली नाही.
 

सरकारी यंत्रणेमध्ये जी दहशत होती तिच रस्त्यावरही होती. ’शब्बूचे शूटर्सम्हणजे यानं पाळलेले गुंडं हातात AK-47 घेऊन चौकाचौकात फ़िरत असायचे. याच्या गॆंगचे वेगवेगळे विभाग होते. म्हणजे, हत्या करणारे, अपहरण करणारे, खंडणी गोळा करणारे, रस्त्यात गाठून कपडे फ़ाडून अंगावर चिखल टाकून बेईज्जत करणारे. या पाळीव गुंडांचा हैदोस पंधरा वर्षं सिवानमध्ये बेलगाम चालला होता.

अशा स्थितीत पत्रकारिता करायची तरी काय? अगोदर सांगायला तयार होत नाहीत, पण मग एक पत्रकार हळूच सांगतो, "अगर वैसी कोई खबर हो तो उनके पास पहले कॊपी जाती थी और फ़िर ओके होने के बाद छपने के लिए जाती थी...". या परिस्थितीत जगणं हेच कौतुकास्पद.

आज सिवानमध्ये या दहशतीच्या खुणा पदोपदी पहायला मिळतात. तरीही लोक मुक्त आहेत. शहाबुद्दिनचं नाव जाहिरपणे घेतलं जातयं. दुकानांतून त्याचे फ़ोटो गायब आहेत. बंदूका घेतलेले मग्रूर गुंड दिसत नाहीत. पण त्याच्या विषयी खुलून बोलायला अजूनही घाबरतात. नाव काढलं तर एखाद दुसरं वाक्य बोलून विषय बदलतात किंवा संपवतात. पण तरीही जरा खोदलं की काही जण बिनधास्त बोलतात. बस समझिये अब सब बेहतर हाल है...आप पत्रकार है ऎसा मुंबई से आकर यहां बोल सकते है और हम आपसे बाते कर रहें है इसी मे समझ लिजिये...वरना उस वक्त हम आपको चाय पिने के लिए भी नही पूंछ सकते थे..." जिरादेईच्या भाजपाकार्यालयातला एक कार्यकर्ता म्हणतो. घर से बाहर निकले तो पता नही था की वापस घर आऊंगा या नही. गाडी पर जा रहां हूं तो रास्ते मे ही रूकवाकर बोलते थे की गाडी छोडो और निकल पडो....अगर किसीने पूंछा क्यों तो जान से हाथ धो बैठा..." दरौंदातला एका निवृत्त शाळामास्तर सांगतो. तो आता शहाबुद्दिनविषयी उघड उघड बोलायला घाबरत नाही.यह जो बाहर सभी अन्य प्रत्याशीयों का प्रचार चल रहा है ना जोर शोर से, उसी मे समझ लिजिएगा की अब एक पर्सेंट भी नही बचा उस वक्त का..." हे सांगताना त्या पत्रकाराच्या आवाजात निर्भयता आहे.

पण हे कसं बदललं? हाडापर्यंत उतरलेली भीती अशी सहज संपून जाते का?

२००५ नंतर बिहारमध्ये सत्ताबदल झाला आणि या राज्यात माजलेल्या सा-याच बाहुबलींची राजकीय रसद तुटली. ज्यासाठी लोकांनी नितीश कुमारांच्या हातामध्ये सत्ता दिली त्याला नितीश जागले. शहाबुद्दिनचा पाडाव सुरु झाला. त्याअगोदर बिहारमध्ये काही काळ राष्ट्रपती राजवत असतांना एप्रिल २००५ मध्ये शहाबुद्दिनच्या प्रतापपूर हवेलीवर तत्कालिन एस पी रत्न संजय यांनी छापा टाकला. या छाप्यात त्यांना AK-47 वगैरे मिळाल्याच पण लेझर गाईडेड गन्स, नाईट व्हिजन गॊगल्स सारखी फ़क्त सैन्याकडेच असलेली उपकरणंही सापडली. त्याचा संबंध थेट पाकिस्तानात आय एस आय शी जोडला गेला. रत्न संजय यांची बदली झालीच पण सुप्रीम कोर्टाने शहाबुद्दिनचा जामीन अर्ज फ़ेटाळला आणि तो तुरूंगात गेला तो आजपर्यंत. नितीश कुमार सरकारने मग तुरूंगातच त्याच्यावर स्पीडी ट्रायल कोर्ट्स सुरू केले. हत्या करण्यापासून ते शस्त्रास्त्रांचे अवैध साठे करण्यापर्यंत त्याच्यावर खटले गुदरले गेले. आजपर्यंत त्याच्यावर असे ३४ खटले चालू आहेत आणि संख्या अजूनही वाढत जाईल. शहाबुद्दिनच्या साम्राज्याला बूच बसलं.

पण इथवर थांबून चालणार नव्हतं. पंधरा वर्षांची ही दहशत, हा खौफ़ असा एका अटकेनं इथल्या लोकांच्या मनातून नष्ट होणार नव्हता. पोलिसांना त्यासाठी स्वातंत्र्य दिलं गेलं आणि दे वेन्ट वाईल्ड. त्यांनी या साम्राज्यातल्या प्रत्येक मोह-याला कसं संपवलं याच्या कथा अनेक जण इकडे सांगतात, पण ऒफ़ द रेकॊर्ड. जे कोणी शहाबुद्दिनच्या गॆंगमध्ये होते त्यांना शोधून शोधून पकडण्यात आलं. बडवण्यात आलं. रस्त्यावरून लोकांसमोर फ़टके मारत धिंड काढल्या गेल्या. चौकात त्यांना उभं करून लोकांना मारायला लावलं. जे जे त्या जंगलराजमध्ये भोगलं, ती पिळवणूक, ती भिती, ती आत दाबून ठेवलेली चिड, तो खदखदणारा अंगार, ते स्वाभिमानावर होणारे बलात्कार, ते स्वत:च्या पुरूषार्थावर निर्माण झालेले प्रश्न, सगळी उद्विग्नता, राग पोलिसांचाही आणि सामान्य जनतेचाही ज्वालामुखी जागा होऊन लाव्हारसासारखा बाहेर आला. ’गंगाजलहे असं लाव्हारस असतं. शेकडो जण तुरूंगात डांबले गेले, त्यांच्यावर तितकेच खटले गुदरले गेले, जे वाचले ते प्रदेससोडून पळून गेले.

शहाबुद्दिन सध्या सिवान तुरूंगात आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगतोय हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याच्या सिद्ध झालेल्या गुन्ह्यासाठी. अगोदर मुजफ़्फ़रपूर तुरूंगात होता, अर्ज विनंत्या करून त्याच्या जिल्ह्यातल्या तुरूंगात आला. पण आता तो -याखु-यातुरूंगात आहे. त्याचे दरबार भरू शकतील अशा ऎशआरामी तुरूंगात नाही. नियम कडक आहेत, त्याला भेटायला जाणाराच पोलिसांच्या तावडीत सापडू शकतो म्हणून कोणी भेटायलाही जात नाही. तरी बातम्या असतातच. मध्ये तुरूंगात त्याच्याजवळ अनेक मोबाईल सापडले म्हणून दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं. २००९ ची निवडणूकीसाठी त्याला न्यायालयानंच अपात्र ठरवलं म्हणून आता तो एम पी साहेवनाही. त्यामुळे त्याने गेल्या लोकसभा निवडणूकीत स्वत:ची पत्नी हिना शहाबला उभं केलं. पण निर्भय झालेल्या लोकांनी तिला नाकारलं. ती आता प्रतापपूर हवेलीत त्यांचा मुलगाओसामाआणि दोन मुली तस्लीमआणि हेराहबरोबर राहते प्रसिद्धीपासून दूर.

या असल्या राक्षसप्रवृत्तीच्या माणसाची दुसरीही एक बाजू असते. चांगला शिकला सवरलेला माणूस आहे हा. राज्यशास्त्रात एम ए केलंय त्याने नंतर पी एच डी सुद्धा केली आहे.(आता ती कशी मिळवली हा संशोधनाचा विषय आहे.) पण त्याला जवळून ओळखणारे सांगतात की डॊ.शहाबुद्दिन यांच वाचन अफ़ाट आहे. तुरूंगात असले साहेबतरी लायब्ररी बाळगूनच असतात बरोबर. घरीही मोठा संग्रह आहे. त्याच्या काळात म्हणे सिवानची जितकी प्रगती झाली तितकी कधीच झाली नाही असाही एक प्रवाह आहे. आयुर्वेदिक आणि युनानी कॊलेजेस त्यानेच इथे आणली. इतर कुठेही नाही पण इनडोअर स्पोर्ट्स स्टेडियम इथे आहे. काही त्याच्या दहशतीचं असं समर्थनही करतात की डोक्टरांची फ़ी गरीबांना परवडावी म्हणून ती पन्नास रूपयांपेक्षा जास्त असणार नाही असा फ़तवही त्याने काढला होता.

शहाबुद्दिनचं पुढे काय होईल? खरंच त्याच्यावरचे सारे आरोप सिद्ध करून त्याला नितीश कुमारांचं सरकार त्याला फ़ाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवेल काय? की त्याच्या दहशतीचा राजकीय फ़ायदा बघता त्याला आपल्याकडे वळवून घेईल? पण असं जर केलं तर केवळ सिवानची नव्हे तर बिहारची जनता नितीशना वा येणा-या कोणाच्याही सरकारला माफ़ करणार नाही. का तो फ़क्त लालूंनी निर्माण केलेला घाशीराम कोतवालठरेल? आक्रमकरित्या जमीनीवर दावा सांगणारी हरिजनांच्या आधारानं विस्तारत कम्युनिस्ट पार्टीची चळवळ चिरडून उच्चवर्णीय जमीनदारांना सुखावणारा आणि त्याचवेळेस दहशतीने मतं मिळवणारा लालूंचा अल्पसंख्यक मुस्लिम उमेदवार असा हा घाशीराम शहाबुद्दिनआता अवघड जागेचं दुखणं तर बनला नाही ना?

पण असे हे शहाबुद्दिन बिहारात तयार का होतात? त्याला सोसणारी पिचलेली जनता इथे असते म्हणून? इतर सा-या राज्यांपेक्षा बिहार मागास का या प्रश्नाइतकाच हा प्रश्न गहन आहे. शेकडो वर्षांच्या कर्मठ जातिव्यवस्थेच्या उतरंडीवर ठरलेलं जमिनींच वाटप, त्यातून केवळ शेतीआधारित अर्थव्यवस्थेचं निर्माण झालेलं शोषण करणारं चक्र आणि ते बदलण्याची शक्ती कमावण्यापेक्षा सहन करण्याची प्रवृत्तीत झालेली वाढ, जिथं सहनशीलता हाच ज्या जीवनपद्धतीचा कणा मग प्रतिकार कोण आणि क्सा करणार? पूर्वीचे जमीनदार असो वा नंतर त्यांचे झालेले उच्चवर्णीय बाहुबली असो वा शहाबुद्दिन असो, राज्य करणं त्यांना सोपं जातं.

आपल्या महाराष्ट्रात हे असे शहाबुद्दिननाहीयेत असं तुम्हाला वाटतंय?