Friday, August 3, 2012

पावसाच्या मागावर: दक्षिणायन



पावसाची अशी वाट यापूर्वी कधीही पाहिली नसेल. किमान मी तरी. पण मे उजाडला आणि माणदेशातूननेहमीप्रमाणेचपाण्यासाठी पहिली आर्त हाक उठली. बातम्या सुरु झाल्यादौरे सुरू झाले. तात्या माडगूळकरांच्या बनगरवाडीत वाचलेले ते शुष्क दिवस डोळ्यांना पहायला मिळाले. जोडीला चाराडेपोदुष्काळसदृष छावण्यापैकेज असले सरकारी शब्द आणि समोर वास्तव. माझ्या शहरी आयुष्याला ते नवीन होतंघाबरवणारं होतं. पिण्यासाठी आणि आन्हिकांसाठी सोय झाल्यावर उरलेलं पाणी नकळत उधळणा-या शहरी आयुष्याला ती भीषणता घुसळवून टाकणारी होती. इथल्या जाहीर झालेल्या योजना कुठे गेल्याधरणांमधून इकडे यायला निघालेले कॅनॉल कुठे गायब झालेत्याचे पैसे कुठे गेले या अशा बातमीच्या प्रश्नांबरोबरच शेकडो वर्षांपासून अवर्षणात असलेल्या या भागात माणूस मुळी वस्ती करायलाच आला कसा आणि का असे प्रश्नही सतावायला लागले. पण जसजसे दिवस जायला लागलेतसा प्रश्नांचा रवंथही टोचायला लागलातशी पावसाची ओढ वाढत गेली. पाऊस हवालगेच हवा. माणदेशातून डोळे केरळकडे वळले. मॉन्सून आम्हाला वाचवणार. गेली हजारो वर्षं वाचवत आलायपाणी घेऊन आलाय. यंदाही तेच करेल. आणि तो येईलमग थोड्या दिवसांनी माझ्या घराशी पोहोचेल. पण अशी वाट पाहत नाही बसायचं. मग आमचंएबीपी माझा"चं ठरलंकी त्याच्याबरोबर प्रवास करायचात्याला इथे आणायचा. अंदमानवर मॉन्सूनच्या दाट ढगांचं आवरण पडलं आणि निरोप आल्यासारखे आम्ही केरळकडे निघालो. तहान घेऊन मॉन्सूनच्या पहिल्या घराकडे निघालो. त्या दिवसापासून माझा सुरु झाला आठ हजार किलोमीटर्सचा प्रवासआशा-निराशेचाअसलेल्या-नसलेल्या-येणा-या पावसाबरोबर.

पुण्याहून निघालो तेव्हा खंबाटकी घाट ढगांनी भरला होतासाता-यात तो धो-धो कोसळत होता. कोल्हापूर दिवसा अंधारात बुडालं होतं. दक्षिणेकडे निघालो तसे काळे ढग अधिकच गडद होत चालले. वाटलंयंदा आपली ओढ अधिकगरज अधिकतर हाही पठ्ठ्या जोरात कोसळणार. बहुतेक चांगल्या मॊन्सूनचा हवामान खात्याचा अंदाज यंदा खरा ठरणार. बंगळूरूहून जरा तामिळनाडूच्या दिशेनेकोईम्बतूरकडेगेलो तेव्हा पुन्हा निरभ्र आकाश डोक्यावर आले. पण पालघाटमार्गे केरळमध्ये शिरल्यावर पुन्हा एकदा रस्ता अंधारला. त्रिचूरमध्ये पोहोचलो होतो आणि ऒफ़िसमधून फ़ोन आला की आय एम डी ने जाहीर केलंयमॉन्सून केरळमध्ये दाखल झालाय. आलाजूनच्या पहिल्या दिवशी न येता पाचव्या दिवशी आलाइतकच. पण पाऊस कुठायत्रिवेंद्रम पर्यंत अजून तीनेकशे किलोमीटरचं अंतर कापायचं होतं. मधे कुठेतरी सापडेलच. जोरात निघालो. मनोमन ठरवलं होतं की काहीही झालं तरी आज दिवस बुडायच्या आत केरळच्या त्या धो-धो पावसातून् भिजतउसळत्या समुद्रावरूनकैमे-यासमोर उभं राहून एक तरी लाईव्ह करायचंच आणि दुष्काळातल्या महाराष्ट्रासाठी वर्दी द्यायची कीफ़ार तापू नकोसकण्हू नकोसतो आलाय. बस्स. आता अगदी थोडा अवधी शिल्लक आहे. गाडीचा वेग वाढलाआणि पहिल्या पावसाकडे जाण्याच्या आवेगही. त्रिचूर सुटलंएर्नाकुलम गेलंकोची मागे पडलं. समुद्रकिना-यानं आमचा प्रवास सुरु झाला. डोक्यापासून ते क्षितीजाच्या समुद्राला टेकणा-या रेषेपर्यंत काळ्या ढगांचं साम्राज्य होतं. पावसाची चाहूल लागून समुद्राच्या लाटा पुरूषभराहून जरा अधिकच उसळत होत्या. सोसाट्याच्या वा-यात नारळाच्या झाडांची ती जंगलं आपलं डोकं आपल्याच पायाला लावायच्या प्रयत्नात होती. कुठं जाता जाता एखाद्या पट्ट्यात ओली माती दिसायची. वाटायचं की आता हाकेच्या अंतरावर असणार पाऊस. पण तो नसायचा. हा काय लपाछपीचा खेळ आहेत्रिवेंद्रमची वस्ती सुरु झाली. सूर्यास्त होत असावाकारण अधिकच दाट अंधारायला लागलं. हिरमुसून त्रिवेंद्रमच्या अलिकडे २० किलोमीटर अंतरावर एका किना-यावर थांबलो. कैमेरा सुरु केला. लाईव्ह झालं. दिमतीला मॊन्सूनचे वारे होतेत्यांनी वाहून आणलेले काळे ढग होतेउसळणा-या लाटांचं संगीत होतंनव्हता फ़क्त धो-धो पाऊस. पहिल्याच दिवशी पावसाविना पावसाची वर्दी शब्दांचेच ढोल वाजवत मी केरळहून महाराष्ट्रासाठी दिली.


लाईव्ह झाल्यावर जवळच्या चहाच्या टपरीवर थांवलो. तिथं एक वयस्क गृहस्थ होते. पांढ-या लुंगीला आणि सद-याला बराच चिखल लागला होता. उगाच अंदाज केला की हे शेतकरी असावेत. काहीतरी हिंदी-इंग्रजी मिसळून विचारलं,
" मॉन्सून आलाय म्हणतात. पण पाऊस का नाही?"
त्यांनी आभाळाकडे पाहत म्हटलं,
"अजून पाच दिवस काहीही नाही."
माझ्या पोटात गोळा आला. पण पाच दिवसांनंतरची आशा घेऊन मी त्रिवेंद्रम मुक्कामी निघालो. तेव्हा काय माहित होतं की पाच दिवस नाहीतर पावसाचा हा शोध आठ हजार किलोमीटर चालणार आहे!  

त्रिवेंद्रम हा मॉन्सूनचा नगारखाना आहे. ढगांनी तिथे ढोल वाजवले की भारतीय भूमीवर मॉन्सूनचं आगमन झालं असं जाहीर होतं. आम्ही शिरलो तेव्हा एखाद दुसरी सर पडून गेली होती. ओलावा होता. सकाळी उठून पाहतो तो लख्ख प्रकाश होता. आकाश निरभ्र होते. सोबतीला अखंड घामाच्या धारा होत्या. तो मॉन्सून वगैरे म्हणतात तो खरंच आलाय नाहा प्रश्न वेधशाळेत जाऊन विचारल्याशिवाय पर्याय नव्हता. त्रिवेंद्रमची वेधशाळा ऎतिहासिक आहे. ती भारताची पहिली वेधशाळा आहे. १८३७ साली कार्यरत झालेली. केरळ हे तेव्हा त्रावणकोर साम्राज्य होतं. त्या भूमीवर युरोपिअनांचं आगमन कधीच झालं होतं. त्यांच्याबरोबर व्यापार करण्याबरोबरच तेव्हाच्या या साम्राज्याच्या राजालाराजे स्वातितिरूनाल यांना ज्ञानाच्या देवाणघेवाणीतही रस होता. खरं तर त्यांना जास्त रस होता खगोलशास्त्रात. त्यामुळे एक ऒब्झर्व्हेटरी उभी करावी असं त्यांच्या मनानं घेतलं. आणि तशी ती इथल्या एका टेकडीवजा उंच भागावर उभी राहिली. अर्थातखगोलशास्त्रीय निरिक्षणांपेक्षा हवामानशास्त्रीय निरिक्षणांसाठीच तिचा वापर पहिल्यापासून अधिक झाला. परिणामी  मॉन्सूनचे सर्वाधिक जुने रेकॊर्डस असणारी ती वेधशाळा आहे. सध्या ती जुनी इमारत नुसती उभी आहेपण समोर हवामानखात्याची अद्ययावत वेधशाळा तयार आहे. इथून अधिकृतरित्या सांगितलं जातं की मॊन्सून आला.

मी गेलो तेव्हा मुख्य संचालक कुठे दौ-यावर गेले होते. डॉ.बिजू म्हणून एक प्रभारी होते. पहिला प्रश्न त्यांना हाचकी पाऊस कुठं आहेते म्हणालेआलाय की. त्यांच्या ब्झर्व्हेशन सेंटरमध्ये घेऊन गेले. तेव्हा समजलं की मॉन्सून येतो म्हणजे काय होतं ते. या मुख्य केंद्राच्या अखत्यारित केरळमध्ये एकूण १४ अशी मापनकेंद्रे आहेत. त्यातली काही अंदमान बेटांवरही आहेत. यापैकी कोणत्याही ४ केंद्रांवर सलग ४८ तास ४ मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली की मॉन्सूनचे आगमन झाले किंवा या विभागीय केंद्राच्या अखत्यारित असलेल्या एकूण क्षेत्रापैकी ६० टक्के भागात जर सलग २४ तास २.५ मिलीमीटर पाऊस पडला की मॉन्सून आला. म्हणजे त्यांच्या भाषेत नसेटआणि मुख्य म्हणजे मॉन्सून म्हणजे नैऋत्य मोसमी वारेपाऊस नव्हे. ते वारे वहायला लागले याच अर्थ पाऊस पडेलच असे नाही. तो पडण्यासाठी जो योग्य दाबाचा पट्टा तयार होणं अपेक्षित असतंजी नेमकी वातवरणाची परिस्थिती तयार होणं गरजेचं असतंती लगेच तयार होईल असे नाही. प्रत्येक वेळेस ते वारे बाष्प असलेले ढग आणतीलच असे नाही आणि आणले मग कमी दाबाचा पट्टा तयार होऊन बरसतीलच असे नाही. म्हणजे एकंदरीत कायतर ते मला सांगत होतेजास्त उत्साही होऊ नकाधीर धरा. त्यांच्या हातातल्या सगळ्या केंद्रांच्या यादीमध्ये मोजक्या चार-पाच केंद्रांवर चांगला पाऊस झाल्याचे आकडे तरी दिसत होते. त्यामुळे  मॉन्सून आला होतापसरायला नी बरसायला तो त्याचा वेळ घेणार होता. त्याला नाही म्हणणारे आपण कोणआणि म्हटलंतरी उपयोग काय

त्रिवेंद्रमच्या प्रसिद्ध कोवलम बीचवर जाऊन बसलो. समुद्र खवळला होता. लाटा उंच उसळत होत्या. जसं काही त्या वरच्या ढगांना खाली आपल्या पोटात ओढू पाहत होत्या. पण आभाळाच्या पोटात काही निराळंच होतं.





त्रिवेंद्रममधले पुढचे दोन दिवस असेच कोरडे गेले. वाटलंकी जरा इथं थांबूया. भले सगळ्या पश्चिम किनारपट्टीवर नाहीपण किमान केरळच्या समुद्रकिना-यावर सगळीकडे पाऊस सुरु होईल. मग त्याच्याबरोबर पुढे निघता येईल. म्हणून वाट बघत थांबलो. ठरलेली दिशा सोडून उलट्या दिशेला कन्याकुमारीला जाऊन आलो. त्या त्रिवेणी संगमावरचे तीनही समुद्र स्थिरचित्त होतेविवेकानंदांच्या मुद्रेसारखे. तिथून परततांना मार्गातच असणा-या पद्मनाभपुरम राजमहालात जाऊन आलो. त्रावणकोर साम्राज्याचे १४ राजे पाहिलेला हा महालसंपूर्णपणे लाकडामध्ये कोरलेला. आज साडेतीनशे पावसाळे या लाकडी महालाने पाहिलेएक बुंधाही हलला नाही. ना कधी बुरशी चढली ना कधी वाळवी. हे लाकूड पावसाला कधी भ्यालं नाही. पण यावर्षी अजूनही कोरड्यात उभा होता. पावसात तो कसा दिसतो हे पहायला मिळालं नाही. केरळची एक खासियत डोळ्यात भरून राहिली. केवळ हा शेकडो वर्षांपूर्वीचा महालच नव्हेतर आजच्या आधुनिक वास्तूरचनेत लाकडाला केवढं स्थान आहे. फ़णसाचं लाकूड ते जास्त वापरतात. मी जरा अतिषयोक्तीनेच म्हणत असेनपण केरळमध्ये किमान दर चार किलोमीटरनंतर एक लाकडी फ़र्निचरचं दुकान लागतं. आणि ते फ़र्निचरही आपल्याकडचं केवळ काटकोनातलंकॊर्पोरेट स्टाईल नव्हे. तर राजेशाहीकारागिरी केलेलं. एवढ्या पावसाच्या प्रदेशात लाकडाचा हा वापर डोळ्यात भरतो.

त्रिवेंद्रमला परत आलो. नारळाच्या जंगलामध्ये वसलेलं हे शहर मॉन्सूनच्या आगमनाच्या वर्दीनंतर तीन दिवसांनीही कोरडं होतं. आता मला पुढे निघण्यावाचून पर्याय नव्हता. कोणीतरी म्हणालं की तसा इकडे त्रिवेंद्रमला कमीच पडतो पाऊस. पुढे जाआलेप्पीच्या बैकवॊटर्समध्ये पूर आला असेल आत्तापर्यंत. तडक निघालोस्वत:लाच नावं ठेवत. पाऊस तिकडे कोसळतोय आणि मी इकडे काय करतोय?

आलेप्पी मोठं गोड शहर आहे. त्याला व्हेनिस ऒफ़ द ईस्ट म्हणतात. कारण व्हेनिससारखे इथंसुद्धा पाण्याचे रस्ते आहेत आणि त्यातून बोटीने प्रवास करत तुम्ही केरळच्या प्रसिद्ध बैकवॊटर्समध्ये शिरता. एखाद्या पेंटिंगसारखं रेखीव शहर आहे. केरळला येणा-या पर्यटकांसाठी सर्वात मोठं आकर्षण. केरळच्या कम्युनिस्टांचं तर हे तीर्थस्थान आहे आलेप्पी. ४० च्या दशकातल्या केरळच्या कम्युनिस्ट क्रांतीचं हे केंद्र होतं. आजही व्ही एस अच्युतानंदांसारखे सर्वात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते या भागातूनच निवडून येतात.

डोळ्यांमध्ये भरलेल्या आभाळाची आशा घेऊन इथं आलो खरा पण प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारं आकाश मोकळंच होतं. आलेप्पीला पाऊस झाल्याचे आकडे हवामान खात्याकडे दिसत होतेसॆटेलाईट इमेजेसवर ढग तर भरून आलेत असं दिसत होतंकदाचित आतल्या भागात बॅकवॉटर्समध्ये पाऊस सुरु असेलम्हणून तिकडे निघालोकुट्टनाडकडे. इथल्या समुद्रसपाटीखालच्या भातशेतीबद्दल बरंच काही ऎकलं होतं. आता भातशेती म्हणजे पाऊस तर भरपूर हवाच. खाचंर पाण्या-चिखलानं भरल्याशिवाय पेरणी करणार कशीइकडं आमच्या राज्यातला शेतकरी ती खाचरं भरण्यासाठी पावसाची वाट पाहतोयमग इकडचे शेतकरी काय करताहेतकुट्टनाड म्हणजे जमिन कमी आणि पाणी जास्त असला प्रकार आहे. आणि आहे तीसुद्धा जमिन कसलीजरा ऊंचीवर होती म्हणून पाण्याखाली न गेलेल्या बेटांचा समूह म्हणता येईल. या सगळ्या बेटांवर हे लोक राहतात. पाण्यामध्येचपाण्यानं वेढलेलंपाण्यामुळेच यांचं आयुष्य. खा-या पाण्याच्या समुद्राला वाकुल्या दाखवत असलेल्या गोड्या पाण्याचा हा प्रदेश. गेल्या अनेक वर्षांमध्ये थोडा थोडा करत आता बराचसा भाग रेक्लमेशनने जोडण्यात आलाय खरा. ब-याचशा भागाचं शहरीकरण झालंय. पण आजही पावसाळ्यात इथे पूर येतातबंधारे वाहून जातातरस्त्यांवरून पाणी वाहून जातेकधी कधी बरोबर रस्तेच घेऊन जाते. बेटांवरच्या घरांमध्ये पाणी शिरते. मग लोक त्याच घरातल्या वरच्या मजल्यांवर रहायला जातातपण घर सोडत नाहीत. चारेक महिन्यांनी पाऊस थैमान घालायचं थांबतो. मग सामान्य पाण्यातलं आयुष्य पुन्हा सुरु होतं. पण या सगळ्या पाण्यात हे लोक भातशेती कशी काय करतात?

कुट्टनाड मध्ये आत शिरत होतोतेव्हापासूनच पावसाशी झगडण्याची त्यांची तयारी दिसत होती. पाण्यातून जाणा-या रस्त्यांना काथ्यांचा आधार द्यायची कामं चालली होती. नारळाच्या झावळ्यांपासून केलेल्या काथ्यांनी विणलेली काथ्यांची लांबच्या लांब आयताकृती किंतानं तयार केली होती. आणि ती रस्त्या दोन्ही बाजूच्या उतारांवर लावली जात होती. कारण हे की काथ्यांचं हे आवरण पूरातही माती धरून ठेवतंरस्ता खचत नाही आणि वाहून जात नाही. एकदा हे आवरण लावलं की मग पाच वर्षं चिंता नाही. जवळपास गावं जोडणा-या सगळ्या रस्त्यांवर हे काम चाललं होतं. मुख्यत्वे बायकाच हे काम करत होत्या. विचारलं तेव्हा समजलं की रोजगार हमी योजनेत हे काम चाललं आहे.




पुढे जायला लागलोनी हिरवीगार भाताची खाचरं दिसायला लागलीआणि मग मला समजलं की हिला समुद्रसपाटीखालची शेती का म्हणतात ते. आमची नाव पाण्यातून चालली आहेबाजूला बंधारा आहे आणि बंधा-याच्या पलिकडे ही खाचरं आहेत. बंधा-यावर उभं राहून अदमास घेतला तरी समजतं की एका बाजूचं पाणी जमिनीपेक्षा अडीच ते तीन इंचानी उंचीवर आहे. म्हणजे पाणी वर आणि शेती खाली. आणि हे काही नैसर्गिक नाहीतर मानवी उपायांनी तयार केलेली परिस्थिती आहेत्याचं एक तंत्र आहे जे अनेक वर्षांपासून विकसित झालं आहे आणि इथे माणूस पाण्याच्या पोटात जागा करून भातशेती करतोय. ब-याच ठिकाणी पेरणी झाली होती. हिरवीगार खाचरं गुडघाभर वाढली होती. काही ठिकाणी पेरणी सुरु होतीतर काही ठिकाणी भातशेतीसाठी जमिन तयार केली जात होती ! तंत्र असं आहेकी जिथं सखल जमिन आहेपाण्याची खोली जास्त नाहीअशा ठिकाणी पाणी शिरायला मज्जाव करून वा असलेलं पाणी बाहेर काढून शेतजमिनीचा पट्टा तयार करायचा. इतक्या वर्षांचा गाळ आहेचजमिन सुपीक आहेचपाण्याची कमतरता अजिबात नाहीमग हे भातशेतीचं नंदनवन. पण त्यासाठी अक्षरश: हातानं पाणी बाहेर काढलं जातं. नंतर पायानं मारायच्या मोटेचं काही तंत्रही विकसित झालं. आत्ता मी समोर पाहत होतोतर अनेक ठिकाणी पाण्याखालचा गाळ काढून या शेतपट्ट्याला चारही बाजूंनी बांध घालायची कामं चाललेली होती. म्हणजे आता पाऊस जरी जोरात सुरु झाला आणि थोड्याच दिवसात पूर आला तरीही शेतात पाणी घुसणार नाही.

शेकडो वर्षांपासून ही अशी समुद्रसपाटीखालची शेती इथं चालू आहे. त्याला ते कायल शेती असंही म्हणतात. कायल म्हणजे बॅकवॉटर्स' . अशा प्रकारची शेती म्हणे युरोपातल्या एका भागात होतेनंतर इथंच. आज कुट्टनाडचा जवळपास ३५ हजार हेक्टर भाग अशा शेतीखाली आहे. या शेतीतंत्राला आता जागतिक हेरिटेज दर्जा सुद्धा मिळालाय. ही कायल शेती मॊन्सूनच्या चार महिन्यात होते. पण इथं अजून एका प्रकारची भातशेती होते. एवढ्या पाण्यामुळे इथे चिखलाचेदलदलीचे भाग सुद्धा तयार झालेत. त्यातही भात लावला जातो. पावसाळ्याबरोबरच डिसेंबरनंतरसुद्धा या चिखलात अजून एकदा भात घेतला जातो.

पण पावसाच कायपावसाने ओढ दिल्यानं इथली भातशेती सुद्धा रेंगाळणार कायअनेक शेतक-यांची बोललो. पण चिंतेची आठी त्यांच्या कपाळावर दिसली नाही. उलट पावसाला उशीर झालाय म्हणून ते खूष वगैरे आहेत की काय असंच वाटलं. "उशीर झालायपण अजून थोडा झाला तरी हरकत नाही "त्यातला एक जण मला सांगतो. "त्यामुळे किमान आमची बंधा-यांची कामं तरी पूर्ण होतील. आणि भातलावणीसाठी बक्कळ पाणी आहे इथं. उलट पाऊस आल्यावर पूर लवकर येतात आणि नुकसान आमचंच होतं." पाऊस उशीरा यावा म्हणतांना तो निर्विकार होता. मी म्हटलंभारी आहे बुआ. निसर्ग कोणाची अवस्था कशी करून ठेवेल सांगता येत नाही. तो वरचा आपल्याकडचा शेतकरी पाऊस पाऊस म्हणून ओरडतोयआणि इकडचा शेतकरी त्याला जरा सबूरीनं घ्यायला सांगतोय. अर्थातप्रत्येक जण आपलीच सोय बघतो म्हणा. पण कुट्टनाडमधून बाहेर पडतांना हा प्रश्न सतावत होताकी यंदाचा पाऊस नक्की कोणाची सोय पाहून येत होता वा नव्हतातो त्याची सोय कशी ठरवतोजोरात आला उगाच तर सोयीचं पडावं म्हणून आम्ही आमच्या नावेला पावसासाठी छत वगैरे लावून गेलो होतो. निराशेनं ते काढून टाकावं लागलं. कुट्टनाडला अजून तरी फ़ार काही फ़रक पडत नव्हताआम्हाला मात्र पाऊस सापडत नव्हता.




आलेप्पीची अजून एक खासियत सांगितल्याशिवाय पुढे जाववणार नाही. ते म्हणजे छत्र्या ! इथल्या छ्त्र्या पाहिल्या आणि वाटलं की आपल्याकडे ही दृष्टीच नाही. आपण निव्वळ उपयुक्ततावादी. पाऊस ज्याला म्हणतात त्या आकाशातून पडणा-या पाण्यामुळे लज्जारक्षणासाठी उपयुक्त ठरणारे कपडे नामक आवरण भिजू नये यासाठी उपयुक्त ठरते ती छत्रीही आपली कल्पना आणि तसा वापरही. पण छत्री ही निव्वळ वापरायची गोष्ट नसून ती मिरवण्याचा अलंकार आहे हे मला आलेप्पीत आल्यावर समजलं. छत्रीवर प्रेम करतात हे लोक. भारतातलं छत्र्या तयार करण्याचं आलेप्पी हे खूप मोठं केंद्र आहे. तसा हा उद्योग वर्षभर सुरु असतोपण मॉन्सूनचे चार महिने म्हणजे त्यांची दिवाळी. केवळ या सिझनचा त्यांचा टर्नओव्हर दोनशे कोटीहून जास्त जातो.

"तुम्हाला सांगूआमच्याकडे छत्र्यांची साडेसहाशे डिझाईन्स आहेत आणि सगळी मार्केटमध्ये आहेत."
आलेप्पीच्या 'जॉन्स' या प्रासिद्ध ब्रॆन्डचे मालक जॉर्ज थाईल माझ्यासमोर हे पहिलंच वाक्य टाकतात तेव्हा मी डोळे विस्फ़ारून फ़क्त "काssss? इतकंच विचारू शकतो.

"आणि दरवर्षी नवनवी डिझाईन्स तयार करण्यासाठी आमच्याकडे खास रिसर्च एंड डेव्हलपमेंट विभाग आहेत. आमचे आर्टिस्ट नवी आकर्षक डिझाईन्स शोधून काढतात. वेगवेगळ्या मटेरिअल्समध्ये प्रयोग केले जातात."
थाईल सांगत असतात.

छत्र्यांसाठीही आर एण्ड डी असतं ही गोष्ट माझ्यासाठी तरी नवीन होती. त्यांच्या ज्या शोरूममध्ये आम्ही होतो तिथं त्यापैकी अनेक छत्र्या होत्या. आठ माणसांना सामावून घेईल एवढ्या मोठ्या छत्रीबरोबरच अर्धा वितभर असलेली पाच फ़ोल्डची छत्री तिथं होती. कापडाच्या छत्रीबरोबर अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून रक्षण करणारी छत्री तिथे होती. वर्षभराच्या मुलांसाठी हनुमानछत्रीपासून आजोबांसाठी काठी म्हणूनही उपयोग करता येईल अशीही छत्री तिथे होती. मुळात त्यांच्यावर असलेले कारिगरीचे संस्कार दिसत होतेलाकडाचा वापर तसाही केरळात भरपूर होतोचतसा तो छ्त्र्यांसाठीही होतो. अफ़लातून कारिगरी असणा-या वेगवेगळ्या आकाराच्या लाकडी मुठींच्या छ्त्र्या तर दिमाखदार होत्या. त्या वापरण्यापेक्षा मिरवायलाच जास्त आवडतील.

आलेप्पीचा हा छत्र्यांचा व्यवसाय जगभर पसरलाय. जगभरातल्या विमानतळांवर आलेप्पीच्या एलिट छत्र्या वेगवेगळ्या ब्रॆन्ड्सच्या नावाने तर असतातचपण अनेक कॊर्पोरेट कंपन्या इथे लाखालाखांच्या ऒर्डर्स देतात. या व्यवसायाचा व्यापच इतका आहे आता त्यांच्या कुटुंबातच दोन ब्रॆन्ड्स आहेत. एक जॉन्स आणि दुसरा पॉपी'. पण यंदा तेही चिंतेत होते कारण पावसाचा उशीर. ओर्ड्स् आल्या होत्यामाल तयार होतापण पाऊसच अद्याप न आल्यामुळे कोणी तो माल उचलायला तयार नव्हता. "अजून १५ दिवसांत माल नाही उचलल गेलातर नुकसान जास्त आहे." जॉर्ज चिंतित स्वरात सांगताततेव्हा आलेप्पीला फ़क्त ऊन असते. बाहेर रस्त्यावर लोकांच्या हातात छत्र्या दिसतातपण त्या पावसासाठी नसतात तर कडक उन्हासाठी असतात. आम्हीही विकत घेतलेल्या भरपूर छत्र्या व्यवस्थित पॅक करायला सांगतो. कारण अजून तरी त्याचा उपयोग लगेच करावा लागेल अशी आशा वाटत नाही.

पावसाच्या शोधात चाललेल्या आमच्या मॉन्सून एक्स्प्रेसचा पुढचा पडाव असतो कोची. भारताचं पश्चिम जगताशी असलेल्या पुराणसंबंधांचा साक्षीदार असलेलं पश्चिम किना-यावरचं व्यापारी बंदर. त्याच्या आणि त्याच्यासारख्या अनेक व्यापारी बंदरांच्या अस्तित्वाचं कारणही मुळात मॉन्सूनच. मॉन्सूनच्या वा-यांना धरूनच युरोप-आफ़्रिकेतले व्यापारी भारताच्या किना-याकडे आले. म्हणता असंही येईल की मॉन्सूनच्या वा-यांच्या दिशेला धरून भारताचा शोध पश्चिमजगताला लागला. केरळच्या मसाल्यांच्या चवीवर ग्रीक-रोमन-पोर्तुगिज-ब्रिटिश भाळलेआणि स्पाईस रूटचं महत्वाचं केंद्र बनलं केरळ. भारतासाठी ते पहिलं जागतिकीकरण होतं. आणि या जागतिकीकरणाच्या पहिल्या साक्षीदारांपैकी एक होतं कोची. म्हणून तिथं जाऊन पहायचं होतं की यंदाच्या मॊन्सूनच्या वा-यांनी तिथं तरी पाऊस आणलाय की नाहीकाय हा मसाल्यांचा व्यापार अजूनही पावसावर आधारलाय काका स्पाईस रूटची चव आता पावसावर फ़ारशी अवलंबून नाही?

कोचीजुनं कोची किंवा कोची फ़ोर्टहे फ़ारच टुमदार शहर आहे. हेरिटेज म्हणून घोषित असल्यानं तेच जुनं आर्किटेक्चर अजूनही जपलं गेलंय. ती लाकडी खांबांचीउतरत्या कौलांची घरंत्या घरांच्या लांबच्या लांब गल्ल्यागल्ल्या कसले बोळच तेत्या घरांच्य मधे मधे असलेली मसाल्यांची प्रशस्त गोडाऊन्स. त्या बोळांतून फ़िरतांनासुद्धा आल्याचामिरपूडीचावेलचीचा वास असा नाकातून थेट घशात जातोठ्सका लागतो. आणि त्या मसाल्यांच्या वासात मिसळलेला अत्तरांचा वास ही एक जुन्या कोचीची खासियत. खूप सारी अत्तरांची दुकानं या बोळांमध्ये आहेत. आणि एक गंमत सांगूइथला बहुतांश अत्तरांचा व्यापार हा मराठी माणसांनी चालवलाय. शंभर दीडशे वर्षांपूर्वी व्यापाराच्या निमित्ताने महाराष्ट्रातूनविषेशत: कोकणातूनआलेली बरीच मराठी मंडळी इथेच स्थायिक झाली. कोचीतच अशी तीसहून अधिक मराठी कुटुंबं आहेत जी आता इथलीच बनून गेली आहेत. त्यातलेच प्रकाश देव मला कोचीत ओळख झालेली पहिलीच व्यक्ती. त्यांचाही इथे अत्तराचा व्यापार आहे. जेव्हा राजापूर-कोची असा समुद्री व्यापाराचा वर्दळीचा मार्ग होता तेव्हा त्यांचे पूर्वज कोचीला आले आणि इकडचेच बनून गेले. पण प्रकाशरावांचा जन्म जरी कोचीचा तरी मराठी उत्तम बोलतात. इथल्या महाराष्ट्र मंडळाचे ते सचिव आहेत आणि सर्वात एक्टिव्ह मेंबर. घरात सगळेच मराठी बोलतात. इतकच कायकोचीच्या राजघराण्यातल्या असलेल्या त्यांच्या पत्नीही आता मराठीच बोलतात.

आम्ही केरळचा पाऊस पहायला आलोयत्याच्याबरोबर प्रवास करणार आहोत हे नेहमीचे प्रवचन केल्यावर म्हणाले,
"मग कोचीला आलात हे उत्तम केलेत. कोचीचा पाऊस म्हणजे घागरीतून बदाबदा पाणी ओतल्यासारखा पाऊस."
"मग आहे कुठे तो? " मी विचारले.
"यंदा मात्र अडलाय कुठेतरी. फ़ारच उशीर झालाय."

पाऊस हा आता आमची दुखरी नस झाला जसा काही. घागरीसारखा कोसळणारा पाऊस आता शिंपडल्यासारखा पडायलाही तयार नव्हता. प्रकाश देवच मग आम्हाला मसाल्याच्या व्यापा-यांकडे घेऊन गेले. आम्ही राजकुमार गुप्तांकडे गेलो. जसे मराठी लोक अत्तरांच्या व्यापारात आहेत ,तसा हा कोट्यावधी डोलर्सचा मसाल्यांचा व्यापार पिढ्यान पिढ्या गुजराती-मारवाडी समाजाने चालवला आहे. गुप्तांच्या गेल्या तीन पिढ्या या व्यवसायात आहेत. त्यांच्यबरोबरच आम्ही मसाल्यांच्या गोडाऊन्समध्ये गेलो. पावसाची चाहूल लागून ती गोडाऊन्स ताडपत्र्यांनी शाकारली होती. कच्च्या मसाल्यांच्या त्या तिखट वासाबरोबर एक ओलसरपणाचाही दर्प जोडीला होता. बारीक सरी कधी येऊन गेल्या असतील.

"पूर्वी असेलपण आता किमान व्यापार तरी पावसावर अवलंबून नाही. पूर्वी जहाजांच्या प्रवासवर परिंणाम व्हायचाआता तसे काही नाही. आलेले मसाले प्रिझर्व्ह करण्यासाठी सुद्धा आता सोय आहे. पण यंदा वर घाटांमध्येही पाऊस नाही. त्यामुळे उत्पादनच कमी होण्याची चिंता आहे. तुम्ही खरं वर घाटात जाऊन शेती पाहून यायला हवं".

राजकुमारांनी मला आवर्जून बजावलं. आम्ही त्यांच्या बंदरातल्या जेट्टीवरच बोलत उभे होतो. मागे बंदरात येणारी मोठमोठी व्यापारी जहाजे दिसत होती. बोलता बोलता साधारण दहाएक मिनीटांत अचानक भरून आलं. सूर्य काही मिनीटांपूर्वी इथे होता की नव्हता हे विचारण्याइतपत अंधारून आलं. आणि त्याला काही प्रतिक्रिया देण्याअगोदरच धो धो पाऊस कोसळायला लागला. बघता बघता मागची जहाजं आणि बंदर पुसून टाकल्यासारखं दिसेनासं झालं. आख्खं कोची बंदर पावसात बुडून गेलं. गुप्ता म्हणालेहा यंदा मी इथं बंदरात बसून पाहिलेला पहिला मोठा पाऊस आहे. तो खरंच इतका धोद्या होता की देवांची घागरीची उपमा मनोमन पटली. आणि मुख्य म्हणजे ती उगाच एखादी चुकार सर नव्हती. त्यानंतर किमान तास-दीड तास तो पाऊस तसाच लागून राहिला. वाटलंझाला बहुतेक एकदाचा तो मॊन्सून सक्रीय. घाईघाईने ऒफ़िसला फ़ोन केलाम्हटलं आला बहुतेक पाऊस पुन्हा फ़ॊर्मात. लगेच लाईव्ह करू. पण तेव्हा दिल्लीत राष्ट्रपती निवडणूकीच्या राजकारणाचे फ़ासे पडायला सुरुवात झाली होतीआणि निराश केलेला पाऊस मागे पडला होता. त्यादिवशी नंतरही पाऊस कोचीमध्ये लागून राहिला. रात्रभर चालू राहिला. त्या आवाजातच मी पेरियारच्या डोंगरराजीतल्या मसाल्याच्या शेतीत काय पहायचे याचा प्लान करत राहिलो.




दुस-या दिवशी पहाटे पहाटे थेक्कडीला जाण्यासाठी निघालो तेव्हा कोचीत पाऊस कोसळतच होता. हायसं वाटलं. म्हटलंइथे आता इतका जोरात पाऊस सुरु झालात तर वरती घाटात विचारायलाच नको. पण मनातले मांडे मनात म्हणातात ते तसं झालं. घाटाला गाडी लागून जंगलातून प्रवास सुरु झालादमटपणा जाऊन थंडी वाजायला लागलीथोड्याच वेळात आम्ही ढगांमधून प्रवास करायला लागलोपण पावसाचा एकही थेंव अंगावर पडेना. इथे पाऊस थोडाफ़ार पडून गेला असणारकारण हिरव्याकंच जंगलात दुसरा म्हणून रंग डोळ्यांना दिसत नव्हता. अधूनमधून छोटे धबधबे दिसत होते. डोंगराच्या टोकांवर ढगच ढग होते. पण बरसत मात्र नव्हते. मुन्नार चा मार्ग न पकडता आम्ही थेक्कडीचा रस्ता पकडला. मध्येच रबराची शेती दिसत होतीमध्ये कुठे डोंगरउताराने चहाचे मळेही दिसत होते. नुसत्या कुंद वातावरणात आम्ही थेक्कडीला पोहोचलो. मनु अब्राहम भेटला. त्याचा संदर्भ कोचीहूनच मिळाला होता. तो मसाल्यांचा शेतकरी नव्हतापण एक छोटा व्यापारी होता. आमचं येण्याचं प्रयोजन सांगितलं. पावसाबरोबरच्या प्रवासाची टेप पुन्हा वाजवली.

"तुम पूना से कायको आया हमारा बारीश भगाने के लिये?" मनूने हसत हसत त्याच्या तो टिपिकल मल्ल्याळी हेल काढत पहिलाच वार माझ्यावर केला.

म्हणजे इकडेही पावसाची बोंबच होती तर. खरं तर उभं राहू देणार नाही असा पाऊस इथे होतोपण यंदा घोडं कुठं अडलंय समजत नाहीमनू म्हणाला. इथं मसाल्याची शेतच शेतं आहेत थेक्कडीला. कोणी प्रत्येक मसाल्याची वेगवेगळी शेती नाही करतआता बहुतेक सारे इंटिग्रेटेड फ़ार्मिंगच करतातम्हणजे एकाच शेतात दालचिनीवेलचीलवंगमिरं आणि कॊफ़ीसुद्धा. मनूच्या मित्रांची काही शेतं आम्ही फ़िरलो. अगदी शेती वाया जाण्याइतपत काही परिस्थिती नव्हती. भातासारखा नाहीपण काही ठराविक पाऊस या मसाल्यांच्या शेतीला लागतोच. आणि यंदा अजून तो झाला नव्हता. भरून आलेलं आभाळ सांगत होतं की तो येणार आहेपण कधी हे समजत नव्हतं. झाडाच्या वेगवेगळ्या अवयवांचे हे मसाले असतात. कोणी मूळं असतातकोणी खोडकोणी पान अन कोणी अजून काय. हे सगळे झाडापासून तोडून नंतर वेगळे वाळवलेही जातातपण ते झाडावरच वाळून चालत नाहीतआणि यांना भीती ही होती की अजूनही पाऊस नाही आला तर झाडं वाळून जातीलत्यांच्या डोळ्यातली चिंता आमच्या डोळ्यात साठवून आम्ही पुन्हा घाट उतरायला लागलोपुन्हा समुद्राकडे. केरळचे दोन शेतकरी आम्हाला भेटले होतेएक समुद्रसपाटीखालचाजो म्हणत होता उशीरही चालेल. एक सर्वात उंचावरचाजो आसुसलेला होता. पाऊस सगळ्यांसाठी वेगळा,.

घाट उतरून पुन्हा समुद्राला भिडलो. आश्चर्य म्हणजे कोचीनंतर सुटलेला पाऊस इथे पुन्हा भेटला. बहुतेक आता हा किना-याला सोडत नाहीमला वाटलं. जरा फ़ोनाफ़ोनी केल्यावर समजलं की गोव्यातही तो कोसळतोय. म्हटलंआता ठरलंजर किना-यानं तो सगळीकडे आहे तर किना-यानंच आता वर सरकलं पाहिजे. कालिकत गाठलं. वास्को-द-गामाला इथे पोहोचल्यावर झाला नसेल इतका आनंद मला तिथे पोहोचल्यावर झाला. पाऊस समुद्राला आणि समुद्र पावसाला सॊडायला तयार नव्हता. आता विजिंगम बंदरावर भेटलेल्या त्या केरळी मच्छिमारांचं गणित थोडं उशीरानं का होईना पण सुरु होणार होतं. पुढचे ४५ दिवस ते समुद्रात जाणार नव्हते. आणि त्या ४५ दिवसांनंतर आत गेल्यावर समुद्र त्यांना मोठा कॆच देणार होता. केरळच्या पावसात इथल्या जुन्या आयुर्वेदिक पद्धतीने खास मॉन्सून थेरपीचा उपचार कमी करायला आलेल्या युरोपिय पर्यटकांचा जीव भांड्यात पडणार होता. त्यांचा या काळात उफ़ाळून आलेला वात आता शांत होणार होता. त्रिचूरच्या केरळ कलामंडलममध्ये गुरुकुल पद्धतीने कथकली शिकणा-या विद्यार्थ्यांना आता रोज पहाटे पहाटे खास मसाज होणार होता. पावसाळ्यात पहाटेच्या थंडीत स्नायू आखडतात आणि ते लवचिक नाही राहिले तर त्यांच्या अभिनयातील वापरावर दूरगामी परिंणाम होतात. त्यामुळे कथकलीचा विशेष वर्ग आता सुरु होऊ शकणार होता.

पहाटे कालिकत धो धो पावसात सोडलं होतं. कन्नूर पावसात होतं. मंगलोरला कर्नाटकात शिरलो. जणू माझ्या वेगाशी पावसानंही स्पर्धा लावली होती. कारण तिथेही तो अगोदर पोहोचला होता. उडपीला पोहोचलो. म्हटलं जरा वर घाटत चढून पाहूया परिस्थिती काय आहे ते. घाट चढून वर आगुम्ब्यात पोहोचलो. आगुम्बे रेनफ़ोरेस्ट आहे. इतका पाऊस असतोकी त्याला चेरापुंजी ऒफ़ द वेस्ट म्हटलं जातं. पण बहुतेक घाटावर पाऊस अजून रुसलेलाच होता. ढग होतेपण पाऊस नव्हता. भारतातलं किंग कोब्राचं हे जंगल पावसाची वाट पहात शांत उभं होतं. पुन्हा घाट उतरलोसमुद्राचा हात धरून कारवारमध्ये शिरलो. रस्ता वाहून जाईल की काय अशी भिती वाटावी असा पाऊस होता. गोवा तर पूर्ण भरून गेला होता. सावंतवाडीतून वर पाहिलंतर आंबोलीही ढगात होतंमग पाऊस असणारच. म्हटलंचलाआमची मॉन्सून एक्स्प्रेस समुद्रकिना-यानं का होईना पण महाराष्ट्राशी पाऊस घेऊन आली. आंबोलीतून पावसात वर आलोतर कोल्हापूर कोरडं होतं. रात्रीच्या प्रवासात फ़क्त साता-याला पाऊस लागलातो नंतर थेट पुण्यालाच भेटला. शनिवार संपला होता. दुस-या दिवशी रविवारी अखंड पाऊस कोसळत होता. ज्या रस्त्यानं आलो होतोतिथं सगळीकडे विचारलं. पाऊस कोसळत होता. खूष झालो. वाटलं, आता सगळीकडे सुरु झालाआता मात्र लागून राहिला.

पण जे त्याने अगोदर शिकवलंतेच शेवटच्या दोन दिवसाच्या शिडकाव्यानं मी विसरून गेलो होतो. अनिश्चितता. हा तर त्याचा नियमत्याचा धर्म. अमूक एका वेळेस तो इथे असेलचइथे असेल म्हणून दुसरीकडे असेलच असे नाही. इतका पडेलतितका पडेल हेही नाही. त्याची सोय तो पाहणार आणि आपण आपल्या सोयीनं अपेक्षा करत बसणार. पण अनिश्चिततेचा नियम तो नाही तोडणार. सोमवारपासून तो गायब झाला. कधी आला होता की नव्हता अशी शंका येण्याइतपत पसार झाला. दुष्काळाच्या भीतीने पुन्हा तोंड वर काढलं होतं. माझे चार हजार किलोमीटर झाले होते. आणि आता पावसाच्या अनिश्चिततेचा नियम घोकण्यासाठी अजून चार हजार किलोमीटर जावं लागणार होतं. आता उतरेकडेकालिदासाच्या मेघदूताच्या मार्गावर.
-------------------------------------------------------------------