Tuesday, November 10, 2015

लालू रिलोडेड

आठ नोव्हेंबरची सकाळ.
आज बिहारचा निकाल आहे. देशाचं लक्ष पाटण्याकडे आहे.
लालू सकाळी सातच्या सुमारास घराच्या गेटपाशी येतात. 
"गुड मोर्निंग. वुई आर विनिंग." असा बाईट देतात आणि आत जातात. 
---

मग निकाल सुरूवातीला विरोधात जायला लागतात. वाचाळ लालू तोंडावर आपटणार असं वाटायला लागतं. कारण नितीश दोन दिवस तोंड शिवून गप्प आहेत आणि लालूंचे इमले 190 पर्यंत वर चढलेत.

दीड तासांत फासे उलटतात, आकडे फिरतात. लालू-नितीश विजयाच्या पल्याड जाऊन पोहोचतात. सर्क्युलर रोडच्या लालूंच्या घराबाहेर गाणीबजावणी, घोषणा सुरू होतात. लालू आत गप्प आहेत. त्यांचा सगळा परिवार आतल्या अंगणात मजेत गप्पा मारतोय. खूष आहेत. लालू मात्र कुठेच नाहीत.

विजय निश्चित होतो. शेजारीच राहणारे नितीश अगोदर घराबाहेर येतात. पण त्यांना जाणीव आहे की आज पहिल्यांदा बोलायचा अधिकार आपला नाही. ते पलिकडे लालूंकडे येतात. गळाभेट होते. पत्रकारांना दोघे सामोरे जातात. विजयाचं पहिलं वाक्य लालू उच्चारतात. नितीश फार काही बोलत नाहीत. लालू त्यांना सोडायला हात धरून गाडीपाशी येतात.

नितीश गेल्यावर लालूंच्या घराचं भलमोठं गेट उघडतं. आणि बाहेरचे शेकडो कार्यकर्ते आत शिरतात. ढोलवाले, घोषणावाले, झेंडावाले, बायका, पोरं, म्हातारे, पांढ-या शुभ्र कपड्यांचे, फाटक्या कपड्यांचे, गुच्छवाले, दारू पिऊन आलेले, अगणित जातींचे सारे एकच आत शिरतात. कोणालाही अडवायचं नाही. दोन पाय-या चढून गैलरी आहे. लालू तिथं जाऊन उभे राहतात आणि एखाद्या नवराज्याभिषेक झालेल्या राजासारखे अभिनंदन स्विकारायला लागतात. जे होतं ते खास लालू स्टाईलमध्ये. लोक पाया पडतात, हार घालतात, फोटो काढतात, लालू एक हात हवेत फिरवत त्यांना पुढे सारत राहतात. आणि हे चालूच राहतं. लालू थकत नाहीत. त्यांना ते आवडतं. ते असं सतत पाच तास करत राहतात.

मग पुन्हा घरासमोरच्या अंगणात फिरायला लागतात. गर्दी तशीच असते. लोकांना हटकत राहतात. अंधार होतो. लोकांची वर्दळ काही थांबत नाही. हळूहळू त्यात लालू एकटे पडतात. एक खुर्ची मागवून एकटेच बसून राहतात.

मध्यरात्री कधीतरी दिवस संपून जातो.
---


दुसरा दिवस उजाडतो आणि पुन्हा लालूंचा दरबार सुरू होतो. लालू तयार होऊन, आवरून घरासमोरच्या अंगणात येऊन बसतात. भेटायला येणा-यांची रीघ लागते. आज कोणकोण बिहारच्या लांबवरच्या भागातूनही आलेत. जे काल पहिल्या दिवशी पोहोचू शकले नाहीत. लालू बोलत कुणाशीच नाहीत. धड एक संपूर्ण वाक्यही बोलत नाहीत. फक्त हुंकार भरत राहतात. लोक पाया पडत राहतात, हार पायाशी ठेवत राहतात, काही लोक गुच्छ, मिठाई घेऊन येतात.

मध्येच जाऊन पाटण्यातल्या 'मौर्य' फाईव्ह स्टार हाँटेलात पत्रकार परिषद करून येतात. घरी आल्यावर परत दरबार सुरू. खुर्चीवर एक पाय वर घेऊन पान चघळत लालू लोकांना भेटत राहतात. मध्येच पान संपलं की नवं मागवून तोबरा भरतात. देशभरातून आलेले पत्रकार लालूंना मुलाखतीची विनंती करत राहतात. पण लालू हुंकारानं त्यांनाही नकार  देत राहतात. दिल्लीतल्या एक प्रसिद्ध पत्रकार ज्या सकाळपासून लालूंची मुलाखतीसाठी पाठ सोडत नाहीयेत, त्या परत परत आळवत राहतात.लालू शब्दही उच्चारत नाहीत. त्या शेवटी किमान एका सेल्फ़ीसाठी लालूंना विचारतात. लालू तोंडातलं पान सावरत कसबसं हसत पोज देतात. सेल्फ़ी होतो आणि लालू परत गर्दीतल्या शून्यात बघत राहतात. 

आता कोणीतरी उत्साही कार्यकर्ता मणभर मिठाई घेऊन येतो. गणपतीला वाहावी तशी वाहतो. लालू मिठाईला फक्त हात लावून स्वीकार करतात आणि मण हलवला जातो. लालूच्या खुर्चीमागे एव्हाना हार, मिठाई, पुष्पगुच्छ यांचा डोंगरभर ढीग तयार झालेला असतो.

थोड़ा वेळ गर्दी तशीच सोडून ते आत घरात निघून जातात. वामकुक्षी घेण्यासाठी. लोक तसेच बसून राहतात. त्यात शत्रुघ्न सिन्हा भेटायला आल्यानं लालूंची झोप चाळवते. सिन्हा गेल्यावर दरबार पुन्हा सुरू.या दरबारात आता अनेक शासकीय अधिकारी असतात. दोन तपांनंतर त्यांची आता लालूंशी गाठ पडणार असते. त्यांना माहिती आहे इकडेही एक सीएम राहणार आहे. त्यांना मुजरा करावा.बाहेरगांवचे कार्यकर्ते त्यांच्या भागातले रिपोर्टस् देत राहतात. अंधार होतो तरी लालूंचा दरबार आटत नाही.
---

लालू एखाद्या राजासारखे सत्ता हाकायला सुरू झालेत. पण ब-याच काळ जंगलाबाहेर राहिल्यावर आणि मग परतल्यावर सिंहाला ते जंगल जसं एकाच वेळेस ओळखीचं आणि अनोळखीही वाटत असेल, तसं लालूंचं झालंय. परत फिरून आलेल्या सत्तेचा ते रवंथ करत राहतात. तिचा जुना वास, चव या गर्दीत आठवत, शोधत राहतात. एकेकाळी बिहारवर त्यांचं बेबंद राज्य होतं. त्यानंतर दूर सारले गेले. आज सत्ता पुन्हा दाराशी आली. तिच्याशी नवी ओळख शोधत ती चघळत अंधारात बसून राहतात.

त्यांच्याकडे असं पाहत राहणं आपल्यालाच काहीतरी विचारत राहतं.
हे सर्व कुठून येतं?  
---