Friday, May 11, 2012

एक शुष्क दिवस....


मु पो: पांढरवाडी, तालुका: खटाव, जिल्हा: सातारा
साल २०१२ चा दुष्काळ  
------------------------------------
एरव्ही कोणी तिकडे फ़िरकतही नसेल...कोणी आयुष्यात पहिल्यांदाच तिकडे गेले असेल...पण दुष्काळी भागातले रस्ते सध्या गजबजलेले आहेत...शुष्क दिवसांचे शुष्क दौरे सध्या सुरु आहेत...

दुष्काळात इथले टाररोड सुद्धा  कॉऩ्व्हॉयऩी  गजबजले आहेत...
माळरानावरच्या वाटांवरून जनावरं जाईनाशी झालीत...पाण्याविना सुकलेल्या झाडांवर पाखरं बसेनाशी झालीत...
पण शहराकडच्या मोटारगाड्यांनी डांबरावर जत्रा मांडली आहे....

सध्या या रस्त्यांवरून कधी जाणते राजे जाताहेत...कधी युवराज...तर कधी वहिनीसाहेब...

पांढरवाडीच्या दुष्काळानं सुरकुतलेल्या चेह-यावर प्रश्नचिन्हं पडतात जेव्हा चाळीसएक गाड्यांचा ताफ़ा वाडीत शिरतो...

कुठे फ़टाके वाजतात, कुठे जयजयकार होतात... हॉर्नच्या   दणदणाटानं पाण्याविना आडोशाला पडलेल्या जनावरांची झोप चाळवली जाते...

दुष्काळाचा फ़ेरा आला की नेत्यांच्या फ़े-या सुरु होतात, गावाला हे पाठ झालेलं असतं...

भैरोबाच्या मंदिरासमोरच्या पारावर मग गांव जमवायला सुरुवात होते...कोणी वैनीसाहेब आल्यात मुंबईतनं, पाणी आणलंय, चारा आणलाय...

मुंबईतनं आलेल्या पाहुण्यांना दुष्काळ कसा असतो हे सांगायला मग सरपंचांना मग आवताणं दिलं जातं...

जनावरांचे काय हाल होतात हे दाखवायला एका बाप्याला सांगाडे झालेली जनावरं पाराशी आणून बांधायला सांगितलं जातं...

तिथंच टेबलं लागतात, खुर्च्या लागतात...
गाव भोवती जमा होतं....
भाषणं सुरु होतात आणि मग हळूच खिशातून मोबाईल बाहेर पडायला लागतात...
तेच ते ऎकून कान विटलेत, हाताला काही उद्योग पाहिजे...
मुंबईच्या दमट वातावरणाला सरावलेल्या, पण इथल्या माळावरच्या उन्हाच्या चटक्याला वैतागलेल्या चेह-यांचे फ़ोटो मोबाईलमध्ये काढायचे उद्योग सुरु होतात...
पुण्या-मुंबईतनं आलेले  चॅनलवाल्यांचे कैमेरे तर आपलं काम करताहेतच...

भैरोबाच्या पारावर एव्हाना सभा सुरु आहे...
त्याभोवती बी एम डब्ल्यू, स्कोडा, टोयोटा, टाटाच्या एस यू व्हीज चं कुंपण पडलं आहे...
आणि त्या कुंपणापलीकडे प्रत्येक घराच्या उंबरठ्याबाहेर हंड्यांच्या, बादल्यांच्या रांगा लागलेल्या आहेत..
उंबरठ्याबाहेर बाया-बापये वाट पाहताहेत की कधी भाषणं संपतात, आणि बादल्या टॆंकरला लावतोय...

पहिल्यांदा मग येतो ओल्या चा-याचा टेम्पो...आणि आख्खं गाव त्याच्याकडे धाव घेतं...
पोरं-सोरं-बाया-बापडे सगळे मिळेत तेवढ्या जागेतून चारा उपसायला लागतात...जोर इतका असतो की वाटतं कधीही हाणामारी सुरु होईल...काडीकाडीसाठी सगळे हातघाईवर येतात...

त्यातल्याच काही चा-याच्या काड्या मग मगाशी मुंबईकडच्यांना दाखवायला आणलेल्या जनावरांसाठी आणल्या जातात...
त्यांना चारा घालून फ़ोटो काढले जातात...
ते जर काढले नाहीत तर वाडीवर जाऊन वैनींनी काय केलं हे मुंबईला साहेबांना कळणार कसं?

चारा संपतो, मग पाणी...
पाण्याचे टैंकर्स पुढे येतात आणि एव्हाना शिस्तीत उभ्या असणा-या हंड्यांची आणि बादल्यांची रांग मोडते...
प्रत्येकजण पाईपाला हात घालतो...हातघाईवर येतो...
त्या गदरोळात पाईपातल्या पाण्याची एक धार जमिनीवर लागते...तापलेली माती तहान भागवून घेते...

फ़ोटोग्राफ़र्स कैमेरा गळयात मारून टैंकरवर चढतात...मुंबईकर खालून पोझ देतात...गावक-यांना पाणी मिळतं, मुंबईकरांना फ़ोटो...

काम आता संपलेलं असतं...

गाड्यांचे हॊर्न्स पुन्हा वाजायला लागतात...डोळ्यांवर गॊगल्स चढतात...ताफ़ा वस्तीबाहेर पडायला लागतो...एकच धूळ सगळीकडे उडते...ती खाली बसते तेव्हा पार आणि भोवतीचा चौक मोकळा झालेला असतो...
गोठ्यातल्या जनावरांपुढे दिवसाचा चारा पडलेला असतो...
दोन-चार दिवस पुरवता येईल इतकं पाणी जमा झालेलं असतं...
आता अजून कोणाच्या तरी दौ-याची वाट पहायची...
चा-यावर आणि पाण्यावर तर काही कोणत्या राजकीय पक्षाचा शिक्का नसतो...

पारापासच्या सतरंज्या झाडून घडी करायला घेतल्या जातात...
टेबलं, खुर्च्या ज्या घरातून आणल्या तिथं पोचवल्या जातात...
वैंनींना दाखवायला आणलेली सापळा झालेली जनावरं परत घरी न्यायला त्याचा मालक येतो...
त्याची बायको आजूबाजूला पडलेली जमिनीवरची काटकीन काटकी गोळा करते...तेवढ्यावर अजून काही दिवस जगतील ही जनावरं असं कदाचित तिचं गणित...

गाव पुन्हा शांत झालेलं असतं...दुष्काळातला अजून एक शुष्क दिवस संपलेला असतो...

व्हिडिओ पहायचा असल्यास लिंक:  http://starmajha.newsbullet.in/videos/maharashtra/16024-2012-05-11-12-11-33
-------------------------------------------------