Tuesday, October 19, 2010

बिहार, भुजबळ आणि ठाकरे

अगदी पुण्या-मुंबईच्या पत्रकार परिषदेला जशी गर्दी असेल तशी पत्रकारांची, कॆमे-याची आणि बूम्सची गर्दी पाटण्याच्या पटेल मार्गावरील राष्ट्रवादीच्या बिहार प्रदेश कार्यालयात असते.


आणि कॆमे-याच्या मागून मोठ्याने प्रश्न येतो.

"लेकिन ये बताईये भुजबल साब, वहां आपके के राज ठाकरे तो बिहारी मजदूरोंकी पिटाई कर रहे है...तो आप किस आधार पर यहां वोट मांगने आए है?"


छगन भुजबळ मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या नात्यानं नेहमीचं ठरलेलं उतर द्यायला तयार होतात. ऎसा नही है जैसा आप सोच रहे हो...महाराष्ट्र मे काम कर रहे बिहार के लोग सुरक्षित है...सरकार ने उनकी सुरक्षा की जिम्मेदारी उठायी है..."..


तेवढ्यात अजून एक प्रश्न. एका महिला पत्रकाराचा.


"अच्छा वह छोड दिजीये... बाल ठाकरे ने कल मुंबई मे अपने पोते को राजनीति में लॊंच किया...आपका क्या कहना है?


"मेरा कहना?" भुजबळ अचंबित.


"हां. हां. राजनीति मे आये परिवारवाद पर आपकी राय क्या है? ये ठाकरे का अब जो चल रहा है ना..."

"अब उस पर मेरी राय क्या होगी? वह उनका परिवार जाने...बिहार चुनाव के बारे मे हम यहां पर बात कर रहे है नां?" भुजबळांनी प्रश्न टोलवलाय पण वैताग मात्र कायम आहे. ठाकरे बिहार मध्ये सुद्धा काही पाठ सोडत नाहीत.


त्यांचा हा वैताग संध्याकाळीही कायम राहतो जेव्हा बिहार मध्ये आलेले मराठी पत्रकार त्यांना याबाबत विचारतात. राज ठाकरेंच्या भैय्या विरोधीआंदोलनानंतर त्यांना बिहारात कायम हा प्रश्न विचारला जातोय.


"ज्यावेळेस आपल्याकडे पार अराजक माजलंय असं चित्र रंगवलं जात होतं तेव्हाही मला सतत विचारलं जात होतं इकडून. बिहारच्या पंचवीस एक पत्रकारांना महाराष्ट्रात बोलावून मी खरं चित्र दाखवलं. म्हटलं, बघा, आहे की नाही सरकार त्यांच्या सुरक्षेसाठी." भुजबळ सांगतात.


अर्थात, त्यांना विचारली जाणारी ही ठाकरे प्रश्नावलीकाही संपत नाही. त्यात यंदाच्या निवडणूकांमध्ये राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे पुन्हा तापलेला बिहारमधून होणा-या स्थलांतराचा मुद्दा इथे सत्ताधारी आणि विरोधक, दोघांच्याही अजेंड्यावर आहे.


महाराष्ट्रातून बिहार मध्ये आलेले भुजबळ हे एकमेव स्टार प्रचारक आहेत. ’राष्ट्रवादीची नव्हे तर त्यांच्या महात्मा फ़ुले समता परिषदेची मोठी ओळख इकडे आहे. त्यानिमित्ताने जाणे येणे असल्याने, सभा होत असल्याने त्यांचा चेहरा इथे परिचित आहे. त्यामुळे दरभंगा-पूर्णिया हा शरद पवारांचा दौरा रद्द झाल्यावर राष्ट्रवादीकडे भुजबळांशिवाय दुसरं उत्तर नसतं.


अर्थात २४३ पैकी १७० जागा बिहारमध्ये स्वबळावर लढणा-या राष्ट्रवादीचं उपद्रवमूल्य नक्की किती हा वादाचा विषय आहे. एक आमदार होता त्यांचा, आता तोही मूळ पक्षात, म्हणजे कॊंग्रेसमध्ये, परत गेला. एकमेकांची मतं खाण्यासाठी इतक्या जागा लढवायची फ़ूस राष्ट्रवादीला कॊंग्रेसनं लावली की भाजपाने हा चर्चेचा विषय. महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे तारिक अन्वर हेच बिहारचं राष्ट्रवादीचं एकमेव नेतृत्व. त्यामुळे जेव्हा बिहारचे पत्रकार भुजबळांना पत्रकार परिषदेत अन्वरांना केंद्रात एखादं मंत्रिपद देणार का असं विचारतात तेव्हा भुजबळांना ठाकरे प्रश्नावलीसोपी वाटते.
-------------------------------------

"

"

"

"

"
"

"

No comments:

Post a Comment