Friday, October 29, 2010

जाता जाता नितीशबाबूंच्या घरी...

अगदी ध्यानी मनी नसतांनाही नितीशकुमारांच्या घरी गेलो. म्हणजे त्यांच्या पुश्तैनीघरी. फ़ार काही नाही, पण एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचं घर किती साधं असू शकतं याची कल्पनाही करता येत नाही.


नालंद्याहून पाटण्याला चाललो होतो. जाता जाता बख्तियारपूर लागलं. रात्रीचे आठ वाजून गेले होते. आमच्या गाडीचा ड्रायव्हर सुरिंदर हा एक अचाट वल्ली आहे. तासनतास पानाच्या ठेल्यावर वा चहाच्या टपरीशी उभं राहून लालू-नितीश का क्या होगाया चावून चोथा झालेल्या विषयावर जुनं पान परत रंगवावं तशी चर्चा करणा-या बिहारीसवयीचा तो परिपाक आहे. सांगण्याची शैली फ़क्त वेगळी, पण पत्रपंडितांची निरिक्षणं त्याच्यापेक्षा काही वेगळी नाहीत. नितीशनी चनाएक्स्प्रेस का सुरु केली याचं सुंदरगॊसिप तो आम्हाला ऎकवत होता. पत्रकारच व्हायचा, ड्रायव्हर झाला.


"वह है नं सर, नितीशजी का घर है..." गप्पांच्या ओघात एक वाक्य सुरिंदर बोलून गेला.


"क्या? किसका?" काही चुकीचं ऎकलं का असं वाटून मी विचारलं. हां. हां. नितीशजी का ही घर. यहीं तो रहता है उनका परिवार. सी एम बनने के बाद पटना चले गये ना "सुरिंदर म्हणाला.


"पिछे लो, पिछे लो, पिछे लो..." गाडीतले आम्ही सारे जवळजवळ किंचाळलोच.


नितीश कुमारांचं घर? मुख्यमंत्र्याचं घर? आत जाऊन पाहिलंच पाहिजे. रस्त्याच्या बाजूला जुन्या वाड्यासारखं दिसावं असं घर होतं. छोटं फ़ाटक ढकललं की लगेचच मुख्य खोलीत. इकडं सगळ्या घरांसमोर असतात असं प्रशस्त अंगण वगैरे काही नाही. आत दोन खोल्यात छोटे बल्ब मिणमिणत होते. त्या उजेडात दोन तीन माणसं एका बाजेवर जेवत बसली होती.


"क्या यह नितीशजी का घर है?" आम्ही विचारलं.हांजी. यही है?" लगेच उत्तर आलं एकाकडून. तो आप क्या उनके परिवार से है?"अरे नही भई. हम काहे के उनके परिवारवाले? हम पुलिसवाले है. यही पर बंदोबस्त के लिए रहते है." त्यातल्या एकानं सांगितलं.


हे सालं कसलं बंदोबस्तासाठी राहणं? स्वत:चं घर असल्यासारखंच वापरत होते, आणि तेही मुख्यमंत्र्याचं घर. सगळा पसारा होता. कपडे सगळीकडे पसरले होते. तिथंच एक मातीची चूल करून स्वयंपाकघर केलं होतं. लगतच्या खोलीत टेबल मध्यभागी ओढून मस्तपैकी गावक-यांचा गप्पांचा फ़ड लागला होता. डोकावून डोकावून अजून लोक त्यात येत होते.


तपशीलाचा भाग असा की, की मुख्यमंत्री होईस्तोवर नितीश कुमार इथंच रहात होते. आता येऊन जाऊन असतात. याच घरात त्यांचं लहानपण, जेपींच्या चळवळीनं भारावलेलं तारूण्य गेलं. हे त्यांचं पुश्तैनी, म्हणजे पिढीजात घर. त्यांचे वडील कविराज लखन सिंग यांनी, जे स्वातंत्र्यसिनिक होते, त्यांनी वाढवलं, जपलं. त्याच्या आई परमेश्वरी देवी, भाऊ सतीशकुमार अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत इथं रहायचे. आता त्यांचाही पत्ता सी एम हाऊस, सर्क्युलर रोड, पटनाअसा झालाय. त्यांचा मुलगाही तिकडेच असतो पाटण्याला. पण या घरातलं सगळं अजून असचं आहे. इकडचं काही घेऊन गेले नाहीत. अर्थात फ़ार मोठं घर नाहीच आहे. सुरुवातीच्या दर्शनी खोल्या संपल्या की एका बोळकांडातून छोटा जिना वर जातो. वर माडीवर दोन छोट्या खोल्या आहेत, बस्स. आणि हे घर बंदोबस्ताच्या नावाखाली असंच्या असं या पोलिसांना वापरायलाच दिलंय.


"लेकिन अक्सर आते जाते रहते है. ये फ़िलहाल चुनाव का मौसम है नं. इसिलिये  बहुत दिनों मे नही पधारे..." एक साधारण पन्नाशीचा, फ़ार गर्दी का झालीयं म्हणून डोकवायला आलेला माणूस माहिती पुरवतो. हे गोविंद ठाकूर. लहानपणापासून नितीशना ओळखतात. नाभिक समाजाचे आहेत.



"हमेशा मुझसेही बाल बनाते है. लेकिन अब हमेशा के लिए पटना चले गए इसलिये नही होता. मगर जब भी कोई पारिवारिक कार्यक्रम हो, यानी शादी, पूजा या कुछ भी, तो मुझेही बुलाते है यहां से." गोविंद ठाकूरांना अभिमान वाटत असतो. " अब वह तो यहां है रहते. तो यही पर ही मैने अपना सलून भी खुलवा दिया है, यही बगल में." गोविंद ठाकूर जागा दाखवतात.


अशक्य, मुख्यमंत्र्यांच्या घरात सलून! पटत नाही, पण ते असतं. लक्षात घ्या, की याच नितीश कुमारांनी इथं पिछ्डा-अतिपिछडा जातींचं पोलिटिकल इंजिनियरींगकेलंय आणि त्यातूनच या ३ टक्केच असलेल्या कुर्मी समाजातून आलेल्या नेत्यानं लालूंच्या यादव-मुस्लिम आणि इतरांच्या सवर्ण साम्राज्याला यशस्वी आव्हान दिलंय.


थोड्या वेळ गप्पा मारून आम्ही निघतो. जाणवतं ते फ़क्त इतकंच की नितीश कुमारांच्या साधेपणाबद्दल जे सारे बोलतात ते किमान त्यांचा या घरी जाऊन खरं वाटतं. नाहीतर स्वत:च्या गावी अक्षरश: गढ्या असलेले मुख्यमंत्र्यांची संख्या महाराष्ट्रात काही कमी आहेत काय? उभं राज्य लोड शेडिंगच्या नावाने बोंबा मारत असतांना फ़क्त आपल्याच गावाला चोवीस तास वीज देणारे ऊर्जामंत्र्यांची संख्याही कमी नाही. फ़ॊर रेकॊर्ड, जे काही १५-२० मिनीटं आम्ही नितीश कुमारांच्या घरात होतो, त्यात दोन वेळा वीज गेली आणि इथे चोवीस तासात ६ तासच वीज असते.


------------------------------------------------- 

2 comments:

  1. Gawatlya gharat ka hoina sadhepana ahe.. Surprising though..Maharashtratlya mukhyamantrayaa kiman he pahayla tari bihar dauryawar pathwaylach hawa..

    ReplyDelete
  2. प्रिय मयुरेश , अतिशय अप्रतिम लिखाण केलं आहेस! तू तिथे केवळ निरीक्षक म्हणून उपस्थित न्ह्वतास तर जाणून घ्याच्या उर्मीने सतत वावरला आहेस आणि गुंतुनही गेला आहेस अस वाटत. वाचन करताना चित्र डोळ्यासमोर उभं राहत पण शिवाय एक दृष्टीकोनही मिळतो. सर्वसामन्य माणसाच्या मनातील बिहार आणि बिहारींविषयीच्या कल्पना घेऊन तू तिकडे गेला असावास आणि दिसणारी दृश्य, भेटणाऱ्या व्यक्ती, घडणाऱ्या घटना इत्यादी मधून क्षणोक्षणी आश्चर्यचकित होत तुझी लेखणी चालू राहिली असणार. तो भाव घेऊनच मी वाचत गेलो. मी निवडणूक विश्लेषक म्हणून तुझ्या लिखाणावर कमेंट करू शकणार नाही. परंतु एक सुंदर अनुभव शब्दबद्ध करून माझ्या बरोबर शेअर केलास म्हणून आभार नक्की मानिन.

    ReplyDelete